महिला मार्गदर्शन मेळाव्यानिमित्त वाहतूक व्यवस्थेत बदल वरोरा नाका ते प्रियदर्शनी चौक हा मार्ग सकाळी 10 ते सायं. 6 वाजेपर्यंत बंद
चंद्रपूर :- ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना, महिला सशक्तीकरण योजना तसेच महिलांसाठी राबविण्यात येणा-या विविध योजनांची माहिती महिलांपर्यंत पोहचविण्यासाठी जिल्हा प्रशासन व जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाच्या वतीने 28 सप्टेंबर 2024 रोजी दुपारी 12 वाजता चांदा क्लब ग्राऊंड, चंद्रपूर येथे महिला मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे उद्घाटक राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार असून प्रमुख अतिथी म्हणून विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार, खासदार प्रतिभा धानोरकर, डॉ. नामदेव किरसान, आमदार सर्वश्री अभिजीत वंजारी, सुधाकर अडबाले, कीर्तिकुमार भांगडीया, सुभाष धोटे, किशोर जोरगेवार यांच्यासह जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, जिल्हा पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शन, मनपा आयुक्त विपीन पालीवाल आदी उपस्थित राहतील. यावेळी बचत गटांना सक्षम करण्यासाठी मुख्यमंत्री महिला सक्षमीकरण अभियान, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत प्राप्त होणा-या रकमेतून बचत गटामार्फत महिलांना आर्थिक स्थैर्य प्राप्त करणे, लखपती दिदी योजना, आर्थिक साक्षरता, महिला सक्षमीकरणासाठी महिलांचे संघटन, प्रशिक्षण व त्यांना स्वावलंबी करणा-या विविध योजना, महिलांसाठी सायबर सुरक्षा आदी विषयांवर मार्गदर्शन होणार आहे. जास्तीत जास्त महिलांनी सदर मार्गदर्शन मेळाव्याला उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासन तसेच जिल्हा महिला व बालविकास अधिकारी दीपक बानाईत आणि जिल्हा कार्यक्रम अधिकारी (महिला व बालविकास) भागवत तांबे यांनी केले आहे.
विशेष म्हणजे विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार ज्येष्ठ विधीज्ञ एड. उज्वल निकम एका कार्यक्रमाच्या निमित्ताने चंद्रपूरातील प्रियदर्शनी इंदिरा गांधी सभागृहात सकाळी 11:00 वाजता येणार आहे. मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण योजनेच्या अनुषंगाने 28 सप्टेंबर 2024 रोजी दुपारी 12 वाजतापासून चांदा क्लब ग्राउंड येथे मेळावा आयोजित करण्यात आला आहे. सदर मेळाव्यामध्ये अंदाजे 5 हजार महिला उपस्थित राहणार आहे. त्यामुळे मेळावा असलेल्या मार्गावर रहदारी सुरळीत चालावी, रहदारीस कुठल्याही प्रकारचा अडथळा निर्माण होऊ नये व जनतेची गैरसोय होऊ नये म्हणून वाहतूक व्यवस्थेमध्ये बदल करण्यात आला आहे. याबाबत प्रभारी पोलिस अधिक्षक रिना जनबंधू यांनी आदेश निर्गमीत केले आह. वरोरा नाका ते प्रियदर्शिनी चौक हा मार्ग 28 सप्टेंबर 2024 रोजी 10 वाजतापासून सायंकाळी 6 वाजतापर्यंत सर्व प्रकारच्या वाहतुकीस बंद राहील. तसेच सदरचा मार्ग हा “नो पार्कींग झोन” व “नो हॉकर्स झोन” म्हणून घोषित करण्यात येत आहे. दरम्यानच्या काळात पडोली कडून शहरामध्ये जाणारी वाहतूक डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेज - जटपुरा गेट या मार्गाचा किंवा सावरकर चौक- बस स्टॉप – प्रियदर्शनी चौक- जटपुरा गेट या मार्गाचा वापर करतील. वरिल निर्देशाचे पालन करून जनतेने प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन प्रभारी पोलिस अधिक्षक रिना जनबंधू यांनी केले आहे.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो.9421717068
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या