VVPAT म्हणजे काय असते व निवडणूक प्रक्रियेत ते कसे काम करते (What is VVPAT and how it works in the electoral process)

Vidyanshnewslive
By -
0
VVPAT म्हणजे काय असते व निवडणूक प्रक्रियेत ते कसे काम करते (What is VVPAT and how it works in the electoral process)
वृत्तसेवा :- लोकसभेच्या महापर्वाला सुरुवाच झाली आहे. काही दिवसात पहिल्या टप्प्यासाठी मतदानप्रक्रिया पार पडणार आहे. देशभरात एकूण सात टप्पात होत असलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. अनेक नवनवीन राजकीय समीकरणं तयार होत आहेत. निवडणूक आयोगाकडून देखील या निवडणुकीची जोरदार तयारी सुरू आहे. लोकसभा निवडणुकीआधी ईव्हीएमवर देखील विरोधी पक्षाकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. विरोधी पक्षांकडून ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची मागणी होत आहे. त्यामुळे लोकांच्या मनात इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन (EVM) आणि व्होटर व्हेरिफायेबल पेपर ऑडिट ट्रेलबद्दल (VVPAT) उत्सुकता वाढत आहे. अशा परिस्थिती EVM मशीन कसे काम करते आणि VVPAT ची उपयुक्तता काय आहे? याबाबत अनेकांना जाणून घ्यायचे आहे. आज या लेखातून आपण VVPAT का महत्त्वाचे आहे आणि ते कसे काम करते हे समजून घेणार आहोत.
             निवडणुका प्रभावी आणि पारदर्शक व्हाव्यात या दृष्टीकोणातून सर्वोच्च न्यायालय देखील महत्त्वाची कारवाई करत असल्याचे आहे. इलेक्टोरल बाँडच्या मुद्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने आता व्हीव्हीपॅटबाबतही (VVPAT) मोठे पाऊल उचलले आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालादरम्यान ईव्हीएमसह सर्व व्हीव्हीपीएटी स्लिप्सची मोजणी करता येऊ शकते का? अशी नोटीस पाठवून सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोग आणि केंद्र सरकारकडून उत्तर मागितले आहे. निवडणूक आयोगाने निवडणूक प्रक्रिया सुलभ व्हावी यासाठी इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन (EVM) आणले. या ईव्हीएममुळे मतदान प्रक्रिया आणि मतमोजणी प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात वेळेची बचत होते. परंतु विरोधकांकडून त्याच्यात गडबड केली जात असल्याचा संशय व्यक्त केला गेला. त्यामुळे ईव्हीएमची विश्वासहार्ता वाढवण्यासाठी व्होटर व्हेरिफायेबल पेपर ऑडिट ट्रेल म्हणजेच (VVPAT) आणले गेले. व्हीव्हीपॅट हे ईव्हीएम मशीनला जोडलेले एक लहान बॉक्सच्या आकाराचे मशीन आहे. कोणताही मतदार जेव्हा ईव्हीएमचे बटण दाबतो तेव्हा व्हीव्हीपीएटी मशीनमधून एक पेपर स्लिप बाहेर येतो आणि त्यावर त्याने कोणाला मतदान केले हे पाहू शकतो. हा पेपर काही सेकंदासाठी दिसतो आणि नंतर तो पुन्हा व्हीव्हीपॅटमध्ये जमा होतो. निवडणूक आयोगाने 2010 मध्ये सर्व राजकीय पक्षांशी VVPAT च्या वापराबाबत चर्चा केली होती. VVPAT आणण्यामागे मतदारांची ईव्हीएमबाबत पारदर्शकता आणि विश्वास दृढ करणे हा होता. VVPAT बनवण्याची जबाबदारी भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL) आणि इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (ECIL) यांना देण्यात आली होती. या दोन्ही सार्वजनिक क्षेत्रातील युनिट्स आहेत. या दोन्ही कंपन्या ईव्हीएमही बनवतात. 2011 मध्ये लडाख, तिरुवनंतपुरम, चेरापुंजी, पूर्व दिल्ली आणि जैसलमेरमध्ये VVPAT संदर्भात चाचणी करण्यात आली. निवडणूक आयोगाने दोन वर्षे राजकीय पक्षांशी यावर चर्चा करून सूचना मागवल्या आणि त्यानंतर 2013 मध्ये व्हीव्हीपीएटीच्या रचनेबाबत तज्ञ समितीने संमती दिली. मतदाराने ईव्हीएमवर आपल्या पसंतीच्या मतदाराला मतदान केल्यानंतर VVPAT मध्ये काचेच्या मागे एक स्लिप मतदाराला दिसते. आपण दिलेले मत त्याच मतदाराला गेले आहे का हे मतदार पडताळून पाहू शकतो. ही स्लीप फक्त 7 सेकंदांसाठी दिसते. ही स्लिप ईव्हीएमला जोडलेल्या बॅलेट पेपरमधून बाहेर पडते आणि व्हीव्हीपीएटी बॉक्समध्ये येते. त्यावर तुम्ही निवडलेल्या उमेदवाराचा अनुक्रमांक, नाव आणि निवडणूक चिन्ह छापलेले असते.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)