चंद्रपूर :- लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचा ज्वर चांगलाच चढला आहे. 13 - चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक पहिल्या टप्प्यात म्हणजे 19 एप्रिल 2024 रोजी होणार असून या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्याचे ध्येय जिल्हा प्रशासनाने ठेवले आहे. त्याचाच एक भाग म्हणून नागरिकांच्या घरापर्यंत पोहचून ‘मतदार माहिती चिठ्ठी’ चे वाटप प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे. जिल्ह्यासाठी 4 लक्ष 39 हजार ‘मतदार माहिती चिठ्ठी’ उपलब्ध झाल्या असून प्रत्येक विधानसभा मतदारसंघात सदर चिठ्ठी पोहचविण्यात आली आहे. याबाबत जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी नुकताच आढावा घेऊन सुचना दिल्या. श्री. गौडा म्हणाले, बी. एल. ओ. मार्फत ‘मतदार माहिती चिठ्ठी’ लोकांपर्यंत पोहचल्या पाहिजे. ज्या क्षेत्रात मतदार माहिती चिठ्ठ्यांचे वाटप होते, त्या क्षेत्रात मतदानाची टक्केवारी वाढण्याची शक्यता असते. कारण आपले नाव मतदार यादीत आहे, याबाबत नागरिकांना खात्री होते. त्यामुळे ‘मतदार माहिती चिठ्ठी’चे नियमित वाटप करा. अधिका-यांनीसुध्दा क्रॉस चेकिंग करून मतदारांपर्यंत माहिती चिठ्ठी पोहोचले की नाही, याची पडताळणी करावी, अशा सूचना जिल्हाधिका-यांनी दिल्या.
विधानसभा मतदारसंघनिहाय ‘मतदार माहिती चिठ्ठी’ चे वाटप चंद्रपूर जिल्ह्यासाठी एकूण 4 लक्ष 39 हजार ‘मतदार माहिती चिठ्ठी’ उपलब्ध झाल्या असून यापैकी 4 लक्ष 35 हजार चिठ्ठ्या विधानसभा मतदारसंघात पोहचविण्यात आल्या आहेत. यात राजुरा विधानसभा मतदारसंघात 73 हजार, चंद्रपूर विधानसभा मतदारसंघात 86 हजार, बल्लारपूर मतदारसंघात 76 हजार, ब्रम्हपूरी 65 हजार, चिमूर 65 हजार आणि वरोरा विधानसभा मतदारसंघात 70 हजार चिठ्ठ्या देण्यात आल्या आहेत. प्रत्येक विधानसभा मतदारसंघातून आता बी.एल.ओ. मार्फत घरोघरी ‘मतदार माहिती चिठ्ठ्यांचे’ वाटप करण्यात येत आहे. उर्वरीत चार हजार मतदार माहिती चिठ्ठी चंद्रपूर मुख्यालयात राखीव ठेवण्यात आल्याचे प्रशासनाने कळविले आहे.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
Post a Comment
0Comments