2 मार्च नाशिकच्या काळाराम मंदिराचा सत्याग्रह, मानव मुक्तीची लढाई (March 2 Satyagraha of Nashik's Kalaram Temple, the battle for human liberation)

Vidyanshnewslive
By -
0
2 मार्च नाशिकच्या काळाराम मंदिराचा सत्याग्रह, मानव मुक्तीची लढाई (March 2 Satyagraha of Nashik's Kalaram Temple, the battle for human liberation)
बल्लारपूर :- काळाराम मंदिर प्रवेश हि त्याकाळी एक क्रांतिकारी घटना, तसेच ती एक मानव मुक्तीची लढाई होती. आणि ही लढाई होती अस्मितेची, ही लढाई होती स्वाभिमानाची. काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रहींच्या समतेच्या, धर्मयुद्धात अस्पृश्यांच्या धर्मसंकटाने मिळाली आणि नवीन इतिहास घडविला. मानवी हक्क मिळविण्यासाठी अस्पृश्य समाज २ मार्च १९३० रोजी स्वाभिमानाने, ताठ मानेने, अन्यायाचा परिहार करण्यासाठी दंड थोपटून धर्मसंकटात उभा राहिला. नाशिकच्या या काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रहाने ज्वलंत इतिहासाचे पान उघडले गेले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर दादासाहेब गायकवाड, रावबा ठेंगे, अमृतरावजी रणखांबे, तुळशीराम संभाजी काळे, शिवराम पाला मारू, पांडूरंग जीबाजी सबनीस, गणपत सज्जन कानडे, सावळेराम बापुजी दाणी, संभाजी रोकडे, भवानराव उमाजी बागूल, रंगनाथ शंकर भालेराव, लिंबाजी भिवाजी भालेराव, नाना रावबा चंद्रमोरे, महन्त ठाकूरदास बर्वे इत्यादी कार्यकर्त्यांशी केशव नारायण देव यांच्या अध्यक्षतेखाली विहीतगाव-देवळाली येथे प्रथम २९ डिसेंबर १९२९ रोजी विहीतगावच्या चावडीत झालेल्या बैठकीमध्ये मंदिर प्रवेशाची घोषणा केली. न्यायालयीन कामानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर १९२६ मध्ये नाशिकला आले होते. मुक्कामासाठी ते शाहू बोर्डिंगवर गेले. तेथे कर्मवीर दादासाहेब गायकवाड
अधीक्षक म्हणून काम पाहात होते. तेथेच बाबासाहेब व दादासाहेब यांची गाठभेट झाली होती. ही गुरु-शिष्याची पहिली भेट असल्याचे सांगितले जाते. नाशिक मधील विहितगाव-देवळाली हे गाव आमच्या समाजाचे पूर्वापार न्यायनिवाडा करणाऱ्या मेहतऱ्यांचे, न्याय प्रतिष्ठा सांभाळणारे गाव आहे. या गावच्या चावडीतील कोनाडय़ात समोर एक तक्या असायचा व त्यासमोर पाच दगडांचे गोटे असायचे. हिनयान बौद्ध पद्धतीमध्ये बुद्धांच्या परिनिर्वाणानंतर अशाच प्रकारे बुद्धांच्या गादीसमोर सर्व चावडय़ांमध्ये बसून वंदना म्हणत असत. त्याला धूनीसंघ म्हणत असत. कर्मवीर दादासाहेब गायकवाडांचे सत्याग्रहींचे कार्यालय गणेश गल्लीतील आर्य समाज मंदिरात रात्रंदिवस बसून त्याकाळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करीत आणि सत्याग्रहापूर्वी गांवोगावी दौरे आखीत असत. दोन मार्च सत्याग्रहाचा पहिला दिवस होता आणि त्याच काळात सिंहस्थ मेळाही होता.
           सत्याग्रह कमिटीचे दादासाहेब गायकवाड हे सेक्रेटरी होते, जातीव्यवस्थेच्या बुरुजाला सुरुंग लावण्याचे काम या मंदिर प्रवेशाने केले. काळाराम मंदिर सत्याग्रह निमित्त दादासाहेब गायकवाड यांचा बाबासाहेबांशी खूप जवळून संबंध आला. या सत्याग्रहामुळे पुजा-यांचे, भटा-भिक्षुकांचे खूप मोठे नुकसान होऊ लागले होते, म्हणून त्यांनी सत्याग्रह कमिटी सोबत एक तडजोड घडवून आणली, ही तडजोड म्हणजे एक डाव होता, रथाची मिरवणूक अरुंद जागेत येताच अस्पृश्यांच्या पुढा-यावर म्हणजे बाबासाहेबांवर हल्ला करायचा आणि त्याला या जगातून नाहीसा करायचा. दादासाहेबांना या कटाची अगोदर पासून कल्पना होती, म्हणून त्यांनी बाबासाहेबांना मिरवणुकी बरोबर न येण्याची विनंती केली. बाबासाहेब म्हणाले, "मी सुभेदाराचा मुलगा आहे, स्वतःचा जीव वाचविण्यकरता मी या सत्याग्रहाच्या रणांगणातून पळून जाऊन माझे चरित्र कलंकित करेल काय ? ते शक्य नाही, तुम्हा सत्याग्रहींपेक्षा माझा जीव अधिक मोलाचा नाही, तुमचे जे होईल ते माझे होईल. येणाऱ्या संकटाला न घाबरता तोंड द्यायला तयार राहा आणि आपण कोण आहोत याची चुणूक स्पृश्यांना कळू द्या." मंदिरा समोरच विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण झाले. कार्यकर्त्यांनी बाबासाहेबांच्या डोक्यावर छत्र धरले होते, सभोवती सत्याग्रहीं कोट करून उभे होते, तरी बाबांना दगडाचा मार बसलाच, त्यावेळी झालेल्या दगडफेकीत पायाला दगड लागून बाबासाहेब रक्तबंबाळ झाले होते, तर कित्येक बाबासाहेबांच्या अनुयायींनी आपले रक्त सांडले होते, बाबांनी प्रथम सत्याग्रहींना दवाखान्यात नेवून औषधोपचार केले आणि नंतर स्वतःवर केले. नाशिक काळाराम मंदिर सत्याग्रह नंतर बाबासाहेबांना नाशिकच्या अनुयायांबद्दल इतकी आपुलकी निर्माण झाली होती कि, त्यांनी एकदा त्यांचे सहकारी भाऊराव गायकवाडांना म्हणाले कि, "माझ्या मुलाला म्हणजे यशवंतला नाशिकचीच मुलगी बघा, मी नाशिक सोबत नातं जोडू इच्छितो", इतकं प्रेम बाबासाहेबांना नाशिक बद्दल होतं. ज्या भूमीच्या जागेवर हा सत्याग्रह झाला व तेथेच किर्तीमान शिलालेखाची प्राणप्रतिष्ठा केली आहे, म्हणून हा सुप्रसिद्ध शिलालेख आमच्या शौर्यशाली इतिहासाचे मानाचे पान आहे व उपरोक्त सत्याग्रही आमच्या या इतिहासाचे मानकरी आहेत. नाशिकच्या सहजीवनाचा खरा अर्थ या पवित्र क्षेत्री पुन्हा उजागार झाला, तो किर्तीमान शिलालेखामुळे. ‘कीर्तिमान शिलालेख’ एक हिंदू मंदिरावर लावताना म्हणजे श्रीक्षेत्र काळाराम मंदिराच्या भींतीवर लावणे हेच मूळ क्रांतिकारी पाऊल आहे. नाशिक म्हणजे सनातन्यांचे अत्यंत महत्वाचे तिर्थस्थान. इथले सनातनी पराकोटीचे जातियवादी. या लोकांच्याच छाताडावर बसून बुक्क्या मारण्याचा निर्धार बाबासाहेबांनी केला होता. काळाराम मंदिराच्या धर्माचा श्वासच कोंडवून सोडायला एकंदरीत आराखडा रचून काळाराम मंदिरात प्रवेश करणाऱ्या महामानव बाबासाहेबांना व त्यांच्या सहकाऱ्यांना विनम्र अभिवादन.

संकलन : मिलिंद पंडित, कल्याण
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)