१४ ऑक्टोबर, धम्मचक्र प्रवर्तन दिन म्हणजे " रक्ताचा एकही थेंब न सांडता झालेली धम्मक्रांति होय. " (October 14, Dhammachakra Pravartan Day means "Dhammakranti without shedding a single drop of blood.")

Vidyanshnewslive
By -
0

१४ ऑक्टोबर, धम्मचक्र प्रवर्तन दिन म्हणजे " रक्ताचा एकही थेंब न सांडता झालेली धम्मक्रांति होय. " (October 14, Dhammachakra Pravartan Day means "Dhammakranti without shedding a single drop of blood.")

वृत्तसेवा :- भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या अनुयायांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली. डॉ. बाबासाहेबांनी विजयादशमी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी धम्मचक्र प्रवर्तन घडविले. या दिवशी त्यांनी आपल्या पाच लाख अनुयायांसह भगवान गौतम बुद्धांच्या धम्माचा अंगीकार केला. त्या दिवशी विजयादशमी होती. त्यामुळे हा दिवस देशभर ‘धम्मचक्र प्रवर्तन दिन’ म्हणून साजरा केला जातो. विजयादशमीला देशभरातील बौद्ध बांधव धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करून, ‘तिमिरातुनी तेजाकडे’ झेपावण्याची कास धरून महामानवाला कोटी-कोटी प्रणाम करतात. बाबासाहेबांनी धर्मातराच्या सर्व भाषणांतून ख्रिस्ती किंवा मुसलमान धर्माची उदाहरणे घेतली असली तरी ख्रिस्त किंवा महम्मद पैगंबर यांचा आदर्श ठेवा असा उपदेश केलेला दिसून येत नाही. ‘कुणीही एकटय़ाने धर्मातर करू नये, जे करायचे ते सर्व मिळून करू’ असा सबुरीचा सल्ला त्यांनी १९२७-२८ च्या दरम्यान मुसलमान होऊ इच्छिणाऱ्या अस्पृश्यांना दिला. १३ ऑक्टोबर १९३५ रोजी नाशिक जिल्ह्यातील येवला येथे केलेल्या भाषणात 'मी हिंदू म्हणून जन्मलो असलो तरी हिंदू म्हणून मारणार नाही' अशी घोषणा केली. पण त्यावेळी ते नक्की कोणता धर्म स्वीकारणार आहेत हे त्यांनी सांगितले नाही. बाबासाहेबांनी धर्मांतरांच्या घोषणेनंतर सलग एकवीस वर्षे विविध धर्मांचा सखोल अभ्यास केला. अनेक धर्मगुरूंच्या प्रस्तावांचा राजगृहावर वर्षाव सुरु झाला. १९३५ च्या पूर्वी हिंदू पुढाऱ्यांशी झालेल्या भेटीगाठीत हिंदू संस्कृतीचे नुकसान होईल असा धर्म मी स्वीकारणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली होती.   ख्रिश्चनांचे धर्मगुरू बिशप ब्रेन्टन थॉबर्न ब्रॅडले व मुंबईच्या मेथॉडिस्ट एपिस्कोपल चर्चचे बिशप या दोघांनी बाबासाहेबाना ख्रिश्चन धर्म स्वीकारून आपल्या अस्पृश्य बांधवांचा उद्धार करून घ्यावा अशी विनंती केली. इस्लाम स्वीकारला तर देशाचे काय होईल याचा विचार बाबासाहेबांनी केला होता म्हणून मुस्लिम धर्मात येण्याचे आवाहन बाबासाहेबानी मनोधैर्य एकवटून मुस्लिम धर्मगुरूंच्या प्रलोभनांना नकार दिला व इस्लामचा मार्ग नाकारला. ३० व ३१ मे १९३६ रोजी 'मुंबई इलाखा महार परिषद' मुंबई येथे घेण्यात आली. या परिषदेत धर्मातराच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले. २ मे १९५० रोजी दिल्लीच्या बुद्ध विहारात वैशाखी पौर्णिमेनिमित्त भाषण करताना व पत्रकारांशी बोलताना त्यांनी बौद्ध धर्म घेण्याचा आपला विचार आहे असे सूचित केले होते. १९३७ साली ज्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या त्यापूर्वी डॉ.बाबासाहेबांनी स्वतंत्र मजूर पक्ष नावाचा राजकीय पक्ष स्थापन केला. 

      तथापि पक्षाच्या जाहीरनाम्यात धर्मातरितांना कोणत्याही विशेष सवलती त्यांनी जाहीर केल्या नाहीत. मतदारांना केलेल्या आवाहनात ‘धर्मातराचा प्रश्न वेगळा असून विधान मंडळात निवडून जाण्याशी त्याचा काहीच संबंध नसल्याचे’ स्पष्ट केले. धर्मातराचा वापर करून अस्पृश्य समाजाला सत्ता व संपत्तीत वाटा मिळवून देणे शक्य असूनही डॉ.बाबासाहेबांनी ते टाळले. त्यांनी भारत देश व हिंदू समाज यांच्याशी बेइमानी न करता, राजकारणात आपल्या नीतिमूल्य, तत्त्वांचा व्यापार केला नाही. 14 ऑक्‍टोबर १९५६ ची पहाट उगवली. माईसाहेब आणि नानकचंद रत्तू यांच्या मदतीने बाबासाहेब तयार झाले. दीक्षाविधीसाठी आणलेला विशेष पोशाख त्यांनी परिधान केला. पांढरा सदरा, पांढरा बंद गळ्याचा कोट, कोइम्बतूरहून आणलेले पांढरे तलम रेशमी धोतर बाबासाहेबांनी घातले. सकाळचे नऊ वाजले होते. बाबासाहेब आणि माईसाहेब बुद्धमूर्तीकडे तोंड करून उभे राहिले. बाबासाहेब आणि माईच्या हाती कमळाचे पुष्पहार होते. भंते चंद्रमणी महास्थवीर यांनी त्रिशरण पंचशील दिले. बुद्ध, धम्म आणि संघ शरणम्‌ गच्छामि वदवून घेतले. धम्म स्वीकारताना बाबासाहेब म्हणाले होते, "मी बौद्ध धम्म स्वीकारला म्हणून तुम्ही स्वीकारलाच पाहिजे असे नाही. बुद्ध धम्म पचवण्यास खूप अवघड आहे. यातील नियम खूप कडक आहेत. जमत असेल तर स्वीकारा." कारण बाबासाहेबांनी अगोदरच ओळखले होते, आपली भोळी, अडाणी जनता हा धम्म पचवू शकत नाही. पण हा विज्ञानवादी धम्मच या जनतेला तारू शकतो. दुसऱ्या धर्मात गेलो तर 'आगीतून उठून फुफाट्यात' पडल्या सारखे होईल. तब्बल दोन तास चाललेल्या आपल्या प्रभावी, अर्थपूर्ण भाषणाचा समारोप करताना डॉ. बाबासाहेबांनी उपस्थितांना बजावले की, ‘‘तुमची जबाबदारी मोठी आहे. तुमच्याबद्दल इतर लोकांना आदर वाटेल, मान-सन्मान वाटेल अशी तुम्ही कृती केली पाहिजे. बौद्ध धर्माच्या दृष्टीने भारताची भूमी सध्या शून्यवत आहे. म्हणून आपण उत्तम रीतीने धर्म पाळण्याचा निर्धार केला पाहिजे. हे आपल्याला साधले तर आपण आपल्याबरोबर देशाचा, इतकेच नव्हे तर जगाचाही उद्धार करू शकू.’’ अशा तऱ्हेने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या १३ ऑक्टोबर १९३५ रोजी सुरू झालेल्या ‘धम्म’ प्रवासाची सांगता १४ ऑक्टोबर १९५६ रोजी झाली.

संकलन : मिलिंद पंडित, कल्याण (मुंबई )

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज ), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)