डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ऐतिहासिक धम्मदीक्षा ; डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्माची दीक्षा का घेतली ? Historical Dhammadiksha of Dr. Babasaheb Ambedkar; Why did Dr. Babasaheb Ambedkar initiate Buddhism?

Vidyanshnewslive
By -
0

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ऐतिहासिक धम्मदीक्षा ; डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्माची दीक्षा का घेतली ? Historical Dhammadiksha of Dr.  Babasaheb Ambedkar;  Why did Dr. Babasaheb Ambedkar initiate Buddhism?

वृत्तसेवा :- १४ ऑक्टोबर १९५६ हा दिवस दलित समाजाच्या इतिहासातील एक महत्त्वाचा दिवस आहे. या दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या लक्षावधी अनुयायांसह हिंदू धर्मातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आणि बौद्ध धम्म स्वीकारला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेणे हा क्षण भारताच्या इतिहासही अत्यंत महत्त्वाचा क्षण होता. या क्षणामुळे देशातील दलित समाजाला एक नवी प्रेरणा मिळाली, एक आवाज मिळाला, जो आजवर हिंदू धर्मातील चातुर्वर्ण व्यवस्थेमुळे दडपला गेला होता. १९३६ सालच्या मे महिन्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मुंबईत महार जातीच्या एका मोठ्या मेळाव्याला संबोधित केले होते, या मेळाव्यातील भाषणामध्ये त्यांनी आपले धर्मांतराबद्दलचे विचार जाहीर केले. तसेच धर्मांतर हाच मार्ग मुक्तीचा सर्वोत्तम मार्ग असे त्यांनी सांगितले. ते म्हणाले "मी तुम्हा सर्वांना अगदी स्पष्टपणे सांगतो, 'धर्म हा माणसासाठी असतो, माणूस धर्मासाठी नाही'. माणसासारखी वागणूक मिळवण्यासाठी स्वतःचे धर्मांतर करा. डॉ. आंबेडकर हे हिंदू धर्माच्या मूलभूत तत्त्वांमुळे फार पूर्वीपासून निराश झाले होते. त्यांनी हिंदू धर्मातील अंगभूत वैशिष्ट्ये, विशेषत: 'जातिव्यवस्था' ही ब्रिटिशांपेक्षा भारतीय समाजाच्या स्वातंत्र्यासाठी मोठा धोका असल्याचे मानले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मते दलित समाजाला भारतीय समाजात स्वत:साठी स्थान मिळवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे 'धर्मांतर' हा होता, तर त्याच वेळी चातुर्वर्ण्य व्यवस्थेत सुधारणा करून पुढे गेले पाहिजे, असे गांधीजींचे मत होते

        असे असले तरी प्रारंभिक कालखंडात बौद्ध धर्माकडे वळणे हे बाबासाहेबांसाठी फारसे उत्स्फूर्त नव्हते. त्यांनी पुढील २० वर्षे कोणता धर्म त्यांच्या गरजेनुसार अनुकूल होईल यावर सखोल विचार केला. तसेच इस्लाम किंवा ख्रिश्चन धर्म त्यांच्याशी संलग्न असलेल्या परकीयतेमुळे स्वीकारण्याचा विचार फेटाळून लावला. प्रोफेसर गौरी विश्वनाथन यांनी स्पष्ट केल्याप्रमाणे, बाबासाहेबांनी वेगळ्या धर्मात धर्मांतर करण्याचा निर्णय घेतला तरीही त्यांना आपल्या मूळच्या 'भारतीयत्वा'चा त्याग करायचा नव्हता. कोणता धर्म योग्य या विषयावरील प्रदीर्घ चिंतनानंतर त्यांनी बौद्ध धम्माची निवड केली, यानंतर प्रत्यक्षात बौद्ध धम्माची त्यांची स्वतःची आवृत्ती पुढे आली, जिथे त्यांनी तर्कसंगत नसणाऱ्या बौद्ध धर्माच्या काही पैलूंमध्ये सुधारणा केली. दुर्दैवाने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे निर्वाण लगेचच झाले. त्यामुळे ते फार काळासाठी बौद्ध धम्माच्या तत्त्वज्ञानाचे पालन करू शकले नाहीत. त्यांच्या निर्वाणानंतर आजतागायत बरेच अभ्यासक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्माची दीक्षा का घेतली याची कारणमीमांसा धुंडाळण्याचा प्रयत्न करत आहेत. प्रस्तुत विश्लेषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्म का स्वीकारला, यामागे वेगवेगळ्या अभ्यासकांनी दिलेल्या तीन कारणांचा आढावा घेतला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना जातीवर आधारित वेगळेपणाचा पहिला अनुभव ते शाळेत असताना आला. तेव्हापासून ते जगभरातील अनेक ठिकाणांहून शैक्षणिक पात्रता संपादन करून आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर जातिव्यवस्थेच्या अत्याचारांशी झुंज देत मोठे झाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे बौद्ध धम्मातील धर्मांतर हे त्यांच्या जीवनानुभवाचे आणि त्यांच्यावरील सांस्कृतिक प्रभावांचा परिणाम म्हणून पाहिले जाणे आवश्यक आहे असे अनेक इतिहासकारांचे मत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवर प्रभाव पाडणारी आणखी एक ऐतिहासिक व्यक्ती म्हणजे मौर्य राजा सम्राट अशोक, ज्याचे कलिंगाच्या युद्धानंतर मतपरिवर्तन होऊन बौद्ध धम्माचा स्वीकार केला, त्याचे हे परिवर्तन सहिष्णुता आणि मानवतेच्या युगाची सुरुवात मानली जाते. हिंदू धर्म मूलभूत मानवी हक्क मिळवण्यात अपयशी ठरला आहे. हिंदू समाज समानतेची वागणूक देत नाही, परंतु धर्मांतराने ते सहज साध्य होते,” असे मत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मुंबईतील भाषणात व्यक्त केले होते. पुढे, येणाऱ्या वर्षांमध्ये, त्यांच्या निर्णयावर प्रभाव टाकणारी अनेक सांस्कृतिक प्रतिके पुढे आली.  मूलतः डॉ. आंबेडकरांची बौद्ध धम्माची कल्पना ही बौद्ध धम्माच्या प्राचीन स्वरूपापेक्षा अधिक आधुनिक मानली जात होती. १९९६ साली ख्रिस्तोफर क्वीन यांनी नमूद केल्याप्रमाणे, "आंबेडकरांच्या उत्तरार्धात बौद्ध धम्म प्राचीन बौद्ध धर्माच्या मध्यवर्ती तत्त्वांची पुनरावृत्ती करतो. त्यांनी बौद्ध धम्मातील काही भाग नाकारले, विशेषत: चार आर्य सत्ये, त्यांच्या नुसार हिंदू धर्माच्या प्रभावामुळे या आर्य सत्यांची बुद्धाच्या शिकवणींमध्ये भर पडली. काही विद्वानांनी असा युक्तिवाद केला आहे की, डॉ.आंबेडकरांची बौद्ध धर्माची कल्पना ही फ्रेंच क्रांतीशी संबंधित 'स्वातंत्र्य, समता आणि बंधुता' या मूल्यांशी संबंधित आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)