पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यामुळे कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर फुलले हास्य, पाठपुराव्यामुळे आरोग्य विभागात समावेशन,मनपातील ३३ कर्मचाऱ्यांना नियुक्तीपत्र (Guardian Minister Sudhir Mungantiwar brought smile on the face of the employees, inclusion in the health department due to follow-up, appointment letters were given to 33 employees of the municipality.)

Vidyanshnewslive
By -
0

पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यामुळे कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर फुलले हास्य, पाठपुराव्यामुळे आरोग्य विभागात समावेशन,मनपातील ३३ कर्मचाऱ्यांना नियुक्तीपत्र (Guardian Minister Sudhir Mungantiwar brought smile on the face of the employees, inclusion in the health department due to follow-up, appointment letters were given to 33 employees of the municipality.)

चंद्रपुर :- पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांमुळे आज ३३ कुटुंबांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले. बरेच दिवसांपासून रखडलेल्या विषयाचा पाठपुरावा करून ना. श्री.सुधीर मुनगंटीवार यांनी आरोग्य विभागातील समावेशनाचा प्रश्न मार्गी लावला आणि ३३ कर्मचाऱ्यांना नियुक्तीपत्र प्रदान केले. चंद्रपूर महानगरपालिकेत आरोग्य विभागाच्या आस्थापनेवर अधिसंख्य पदे निर्माण करून ४ वैद्यकीय अधिकारी व ३३ कर्मचाऱ्यांचे समावेशन करण्यासाठी वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला. ना .मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्याला यश प्राप्त झाले आणि समावेशन करण्यास शासनाने मंजुरी दिली. त्यानुसार मनपाच्या आस्थापनेवर समावेशन झालेल्या ३३ आरोग्य कर्मचाऱ्यांना पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता. सर्व कर्मचाऱ्यांनी पालकमंत्र्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करत आभार मानले. चंद्रपूर शहर महानगर पालिकेतील आरोग्य विभागात प्रजनन व बाल आरोग्य कार्यक्रम फेज -२ अंतर्गत सन २००६-०७ पासून ३७ कर्मचारी (४ वैद्यकीय अधिकारी व ३३ कर्मचारी) मानधन तत्वावर आरोग्य सेवा देत आहेत. मनपा आरोग्य विभाग मुख्यालय तसेच शहरातील ७ शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रात, गत १५ वर्षांपासून सदर कर्मचारी कार्यरत आहेत. कोविड – १९ कोरोना महामारीच्या काळातसुध्दा या कर्मचा-यांनी स्वत:च्या जीवाची पर्वा न करता नागरिकांना उत्तम आरोग्य सेवा प्रदान केली. राज्यातील इतर महानगर पालिकेत  प्रजनन व बाल आरोग्य कार्यक्रम फेज -२ मधील अधिकारी / कर्मचा-यांना मनपाच्या सेवेत सामावून घेण्यात आले होते. ही बाब आरोग्य कर्मचा-यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यामुळे शासनाच्या धोरणात्मक निर्णयानुसार चंद्रपूर मनपाच्या आस्थापनेवर आरोग्य कर्मचा-यांचे समावेशन करण्यासाठी श्री. मुनगंटीवार यांनी सातत्याने शासनाकडे पाठपुरावा केला. त्यानुसार चंद्रपूर मनपाच्या आस्थापनेवर ३७ कर्मचा-यांचे समावेशन करण्यासंदर्भात १६ जून २०२३ रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला. अधिसंख्य पदे निर्माण करून अखेर सोमवारी (दि.७) पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते 33 आरोग्य कर्मचा-यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. उर्वरीत ४ वैद्यकीय अधिका-यांना सेवाप्रवेश नियम मंजूर झाल्यानंतर त्यांचे समावेशन करण्यात येणार आहे. 

          चंद्रपूर महानगरपालिकेतील राष्ट्रीय प्रजनन व बाल संगोपन आरोग्य कार्यक्रम फेज -२ या कार्यक्रमांतर्गत मानधन तत्त्वावर कार्यरत असलेले व्यवस्थापक - १ पद, पी.एच.एन - २ पदे, ए.एन.एम - २२ पदे, अकाउंटंट कम डाटा एन्ट्री ऑपरेटर - १ पद, लिपिक कम डाटा एन्ट्री ऑपरेटर -४ व शिपाई - ३ पदे अशा एकूण ३३ कर्मचाऱ्यांसाठी महानगरपालिका स्तरावर अधिसंख्य पदे निर्माण करून त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मनपाच्या आस्थापनेवर समावेशन झालेल्या सर्व वैद्यकीय अधिकारी व कर्मचा-यांचे अभिनंदन केले. तसेच सर्वसामान्य नागरिकांना चांगली आणि वेळेवर आरोग्य सेवा देण्यासाठी कर्मचा-यांनी नेहमी कार्यत्पर राहावे. तुमच्या चेह-यावरचे हास्य हे उपचाराअंती रुग्णांच्या चेह-यावरसुध्दा दिसले पाहिजे,अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. कार्यक्रमाला जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, सहाय्यक जिल्हाधिकारी मरुगानंथम एम., महापालिका आयुक्त विपीन पालिवाल, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे, मनपाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. वनिता गर्गेलवार, डॉ. नयना उत्तरवार यांच्यासह आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. या आरोग्य कर्मचा-यांचे झाले समावेशन सरिता येरम, रंजना मडावी, उष्टाबाई गेडाम, राधा पेंदोर, पिंकी पेंढारकर, छाया आरके, सतिश अलोणे, ललिता निखाडे, संगिता साने, विद्या कुडे, अमिता अलोणे, मनिषा गुरुनुले, सरिता लोखंडे, स्मिता काकडे, संगिता जगताप, वैशाली येलमुले, करूणा गोंगले, रुपा खिरटकर, वर्षा सातपुते, निर्मला पुडके, सारिका चवरडोल, किरण धर्मपुरीवार, इंदिरा सातपुते, प्रवीण गुळघाणे, सीमा चहारे, सुनील वारुलवार, निलिमा ठेंगरे, नरेंद्र जनबंधू, शामल रामटेके, गणेश राखुंडे, रितीशा दुधे, अनिता कुडे, वैशाली मानोत यांना पालकमंत्र्यांच्या हस्ते समावेशन नियुक्तीपत्र देण्यात आले.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)