अतिवृष्टीनेग्रस्त व आपत्तीनेग्रस्ताच्या मदतीत दुपट्टीने वाढ, मुख्यमंत्र्याची घोषणा (Chief Minister announces two-fold increase in aid to flood victims and disaster victims)

Vidyanshnewslive
By -
0

अतिवृष्टीनेग्रस्त व आपत्तीनेग्रस्ताच्या मदतीत दुपट्टीने वाढ, मुख्यमंत्र्याची घोषणा (Chief Minister announces two-fold increase in aid to flood victims and disaster victims)

मुंबई :- अतिवृष्टी, महापूर, दरड कोसळणे यांसारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल्या आपत्तीग्रस्तांना राज्य सरकारकडून मिळणाऱ्या मदतीत दुपटीने वाढ करण्यात आली आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या पूरग्रस्तांना यापूर्वी ५ हजार रूपये इतकी नुकसान भरपाई म्हणून आर्थिक मदत राज्य सरकारकडून केली जात होती. त्यामध्ये वाढ करून आता १० हजार रूपये देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. पावसामुळे झालेल्या नुकसानीवर आज विधानसभेत चर्चा झाली. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी नैसर्गिक आपत्तीतील नुकसानग्रस्त आणि शेतकऱ्यांच्या हितासाठीचे काही निर्णय पावसाळी अधिवेशनादरम्यान विधानसभेत आज मांडले. आपत्तीग्रस्तांना आता १० हजार रूपये आर्थिक मदत केली जाणार आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज (दि.२८ जुलै) विधानसभेत बोलताना स्पष्ट केले. नैसर्गिक आपत्तींमुळे झालेल्या नुकसानीत दुकानदारांना राज्य आपत्ती निधीत कुठलीही मदत होत नाही, त्यांना कुठलाही दिलासा मिळत नाही, ही बाब लक्षात घेऊन शासनाने त्यांनाही आर्थिक मदतीचा निर्णय घेतला आहे. दुकान पाण्यात बुडालेले असल्यास, दुकान पूर्णत: वाहून गेले असल्यास किंवा दुकानांचे संपूर्ण नुकसान झाले असल्यास अशा दुकानदारांना पंचनाम्याच्या आधारे नुकसानीच्या ७५ टक्के रक्कम किंवा जास्तीत जास्त ५० हजार रुपयांपर्यंत विशेष बाब म्हणून आर्थिक मदत देण्यात येईल. जे स्थानिक रहिवाशी आहेत, ज्यांचे नाव स्थानिक मतदार यादीत आहे व जे रेशनकार्ड धारक आहेत अशा दुकानदारांपैकी अधिकृत दुकानदारांना ही मदत मिळेल असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले. तसेच छोट्या-छोट्या टपऱ्यांमधून व्यवसाय करणारे आणि कुटुंब चालवणारे अनेक जण आहेत. अशा नुकसानग्रस्त टपरीधारकांना राज्य आपत्ती निधीत कुठलीही मदत होत नाही. आता अशा टपरीधारकांना सुद्धा पंचनाम्याच्या आधारे प्रत्यक्ष नुकसानीच्या ७५ टक्के रक्कम किंवा जास्तीत जास्त १० हजार रुपयांपर्यंत विशेष बाब म्हणून आर्थिक मदत देण्यात येईल. जे स्थानिक रहिवाशी आहेत, ज्यांचे नाव स्थानिक मतदार यादीत आहे व जे रेशनकार्डधारक आहेत अशा अधिकृत नोंदणीकृत व परवानाधारक टपरीधारकांना ही मदत देण्यात येणार आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)