बल्लारपुर येथे महर्षी कर्वे महिला सक्षमीकरण ज्ञानसंकुलाचे लोकार्पण व विविध अभ्यासक्रमांचा शुभारंभ, महर्षी कर्वे महिला ज्ञानसंकुलाच्या माध्यमातून महिलांचे सक्षमीकरण व सबलीकरण होईल - पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार (Inauguration of Maharshi Karve Women's Empowerment Knowledge Complex and launch of various courses at Ballarpur, women will be empowered and empowered through Maharshi Karve Women's Knowledge Center - Guardian Minister Sudhir Mungantiwar)

Vidyanshnewslive
By -
0

बल्लारपुर येथे महर्षी कर्वे महिला सक्षमीकरण ज्ञानसंकुलाचे लोकार्पण व विविध अभ्यासक्रमांचा शुभारंभ, महर्षी कर्वे महिला ज्ञानसंकुलाच्या माध्यमातून महिलांचे सक्षमीकरण व सबलीकरण होईल - पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार (Inauguration of Maharshi Karve Women's Empowerment Knowledge Complex and launch of various courses at Ballarpur, women will be empowered and empowered through Maharshi Karve Women's Knowledge Center - Guardian Minister Sudhir Mungantiwar)

चंद्रपूर :- आजची महिला ही कोणत्याही क्षेत्रात मागे नाही. देशाच्या प्रगतीमध्ये सर्वात जास्त योगदान महिलांचे आहे. महिलांचे शैक्षणिक आयुष्य उज्वल व्हावे. महिला आत्मनिर्भर व्हावी. स्वतःच्या ज्ञानावर रोजगार शोधू शकेल तसेच महिला फक्त जॉब सिकरच नव्हे तर जॉब क्रियेटर व्हावी, यादृष्टीने महर्षी कर्वे महिला सक्षमीकरण ज्ञानसंकुलाची निर्मिती करण्यात आली. या ज्ञानसंकुलाच्या माध्यमातून येथील महिलांचे सक्षमीकरण व सबलीकरण होईल, असा विश्वास राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला नेताजी सुभाषचंद्र बोस डिजीटल मुलींची शाळा, बल्लारपूर येथे श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ, मुंबई यांच्या माध्यमातून महर्षी कर्वे महिला सक्षमीकरण ज्ञानसंकुलाचे लोकार्पण व विविध अभ्यासक्रमाच्या शुभारंभ कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी वनविकास महामंडळाचे माजी अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा संध्याताई गुरनुले,भाजपा महानगर अध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, माजी नगराध्यक्ष हरीश शर्मा, भाजपा महिला मोर्चा अध्यक्ष अल्काताई आत्राम,जिल्हाधिकारी विनय गौडा, विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. उज्वला चक्रदेव, प्र-कुलगुरू डॉ. रुबी ओझा, बल्लारपूरच्या उपविभागीय अधिकारी डॉ. दीप्ती सूर्यवंशी,  तहसीलदार कांचन जगताप, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता अरुण गाडेगोणे, कुलसचिव विलास नांदावडेकर, सहाय्यक कुलसचिव डॉ. बाळू राठोड, विद्यापीठाचे विद्यार्थी अधिष्ठाता डॉ. नितीन तेंडूलकर, मुख्याधिकारी विशाल वाघ, आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

          श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ, मुंबई यांच्या माध्यमातून महर्षी कर्वे महिला सक्षमीकरण ज्ञानसंकुलाचे अधिकृत लोकार्पण बल्लारपूर शहराची गुणवंत विद्यार्थिनी आस्था सुरेश उमरे या विद्यार्थिनीच्या शुभहस्ते झाले. ही या कार्यक्रमाची विशेषता होती. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. उज्वला चक्रदेव यांनी तसेच त्यांच्या टीमने सातत्याने चंद्रपूरमध्ये भेटी दिल्यात. या ज्ञानसंकुलासाठी सकारात्मक भूमिका घेत महिलांचे शैक्षणिक आयुष्य उज्वल व्हावें हा ध्यास घेतला. विद्यापीठाच्या संकुलाची निर्मिती होईल, तेव्हा सिम्बॉयसिसच्या प्रमुखांना एकदा येथे भेट देण्याची इच्छा होईल, असे सुसज्‍ज संकुल विसापूर येथे उभे राहत आहे. जिल्ह्यातील व शहरातील विद्यार्थ्यांच्या ज्ञानसाधनेसाठी या संकुलाची निर्मिती करण्यात येत आहे. या ज्ञानसंकुलात स्किल डेव्हलपमेंटचे शिक्षण देण्यात येत असून महिला आत्मनिर्भर व्हावी. स्वतःच्या ज्ञानावर रोजगार शोधू शकेल असे ज्ञान या ठिकाणी देण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. पालकमंत्री मुनगंटीवार पुढे म्हणाले, बल्लारपूर-विसापूर रोडवर 50 एकर जागेमध्ये 560 कोटी रुपये खर्च करून, राज्यातीलच नव्हे तर देशातील महिलांना गौरव वाटेल, असे अप्रतिम विद्यापीठ तयार करण्यात येत आहे. ज्यांनी महिलांचा सन्मान वाढविला त्या सर्वांच्या ज्ञानाचा दीपस्तंभ प्रतिकाच्या रूपामध्ये त्या संकुलात लावण्यात येईल. तसेच महान महिलांची मार्गदर्शक मूल्ये पुतळ्यासह लावण्याची व्यवस्था देखील करण्यात येणार आहे. महिलांचे पारंपारिक खेळ आहेत. या पारंपारिक खेळांचे वातानुकुलीत इनडोअर स्टेडियम उभारण्यात येईल. अगोदरची महिला पिढी या खेळातून कशाप्रकारे आनंद प्राप्त करत होती, हा भाव आजच्या पिढीतील महिलांना कळेल. या जिल्ह्यात विकासाची अनेक कामे करण्याची संधी प्राप्त झाली. साधारणतः मध्यम आणि मोठी अशी 205 कामे मागील पाच वर्षाच्या कालावधीत पूर्ण केली.  रामसेतू, स्वर्गीय बाबा आमटे अभ्यासिका, डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालय, वनअकादमी, बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र, सैनिक शाळा, बल्लारपूर बसस्थानक, पोलीस स्टेशन, रस्ते, शाळांचे नूतनीकरण, जिल्हा परिषदेच्या 1500 शाळांना ई लर्निंगची व्यवस्था, 600 च्यावर अंगणवाडी आयएसओ प्रमाणित, टाटाच्या माध्यमातून पाच संगणक प्रशिक्षण वाहने, बल्लारपूर येथे पाणीपुरवठा योजनेसाठी निधी तसेच अनेक योजना दिल्या. यामाध्यमातून हा जिल्हा मागे राहता कामा नये हे ध्येय होते.

        नुकतेच बल्लारपूर येथे 11.30 कोटी रुपये स्वर्गीय सुषमा स्वराज स्किल डेव्हलपमेंट केंद्रासाठी उपलब्‍ध करून दिले. सदर केंद्राची इमारत एक वर्षात पूर्णत्वास येईल. येथील महिलांना स्वर्गीय सुषमा स्वराज स्किल डेव्हलपमेंट केंद्रातून त्यांच्यातील कला तंत्रज्ञानाच्या दृष्टीने विकसित करता येईल. तसेच उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मूल येथे महिला महाविद्यालयाला मंजुरी दिली. हे विद्यापीठ ऑक्सफर्ड विद्यापीठासोबत दोन वर्षात एमओयु करून ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीत न जाता मुलमध्येच महिलांना उत्तम शिक्षण घेता येईल. यासाठी प्रयत्न केल्या जात आहे. शिक्षणापासून कोणीही वंचित राहू नये, यासाठी चंद्रपूरमध्ये नुकतेच रात्रपाळीच्या महाविद्यालयाला मान्यता आणली. महाराष्ट्रात 1 कोटी 75 लक्ष निरक्षर आहे. यात सर्वाधिक महिला आहेत. यासाठी  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी बेटी बचाओ बेटी पढाओ हा मंत्र दिला. 9 वर्षात ‘’बेटी बचाओ बेटी पढाओ’’ चा फायदा झाला. 1 हजार  पुरुषाच्या मागे 1 हजार 20 महिला झाल्यात. देशाच्या प्रगतीमध्ये सर्वात जास्त योगदान महिलांचे राहिले आहे. जिल्ह्यात अनेक शैक्षणिक व्यवस्था उत्तम करण्यात येत आहेत. जिल्हा वेगाने पुढे जात आहे. त्यासोबतच तीनही स्मार्ट सिंथेटिक ट्रॅक चंद्रपूरच्या वाघाच्या भूमीत आहेत. कुटुंबात ज्या मुली शिक्षण घेत आहे. त्या मुलींनी या ठिकाणी भेट द्यावी व अभ्यासक्रमाची माहिती घेत या ठिकाणी शिक्षणासाठी यावे असे आवाहन ना.मुनगंटीवार यांनी केले. कुलगुरू डॉ. उज्वला चक्रदेव म्हणाल्या, या ज्ञानसंकुलाच्या माध्यमातून महर्षी कर्वे यांचे स्वप्न पूर्ण होत आहे. प्रत्येक मुलीपर्यंत पोहोचून त्या मुलीला शिक्षित करणे व ती मुलगी शिक्षणासाठी विद्यापीठापर्यंत येत नसेल तर तिच्यापर्यंत पोहोचणे हे महर्षी कर्वे यांचे स्वप्न होते. 107 वर्षांपूर्वी म्हणजेच सन 1916 मध्ये या विद्यापीठाची स्थापना झाली. महर्षी कर्वे यांनी घरोघरी जाऊन दरमहा एक रुपया गोळा करून विद्यापीठाला सक्षम केले. पहिले कॅम्पस पुणे येथे सुरू झाले. त्यानंतर मुंबई, श्रीवर्धन व आता चंद्रपूरमध्ये ज्ञानसंकुल सुरू करण्यात आले आहे. पालकमंत्री श्री. मुनगंटीवार यांच्या अथक प्रयत्नाने, पाठिंब्याने व पाठपुराव्यामुळे हे शक्य झाले आहे. जादूची कांडी फिरावी त्याप्रमाणेच अतिशय कमी कालावधीत हे केंद्र सुरू झाले असल्याचे त्या म्हणाल्या. ना. मुनगंटीवारांचे त्‍यांनी तोंड भरून कौतुक केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यापीठाच्या प्र. कुलगुरू डॉ. रुबी ओझा यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन ऐश्वर्या भालेराव तर आभार विद्यापीठाचे कुलसचिव विलास नांदावडेकर यांनी मानले. यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते विद्यापिठाच्या माहिती पुस्तीकेचे विमोचन करण्यात आले. त्यासोबतच  10 वी व 12 वी परीक्षेत उत्तीर्ण बल्लारपूर येथील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला. यामध्ये आस्था उमरे, सतीश मिश्रा, प्राची वर्मा, मंथन आवळे, गौरव आकरे, तृप्ती देवगडे, जानवी पाटील आदी विद्यार्थ्यांचा समावेश आहे. तत्पूर्वी, पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी नेताजी सुभाष चंद्र बोस डिजिटल मुलींची शाळा येथे सुरू करण्यात आलेल्या महर्षी कर्वे महिला ज्ञान संकुलाची पाहणी केली.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)