तीन वर्षीय मुलीवर बिबट्याने झडप मारली, मात्र मुलीच्या आईच्या प्रतिकारामुळे व समयसूचकतेने बिबट्या जंगलात पळाला
नरभक्षक बिबट्याच्या बंदोबस्तासाठी वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यासह 5 कर्मचाऱ्यांना घरात डांबलं
चंद्रपूर :- चंद्रपूर शहरालगत असलेल्या दुर्गापूर येथे पुन्हा एकदा बिबट्याची दहशत बघायला मिळाली आहे. येथील नागरिकांना वारंवार हल्ला होत आहेत. आता एका तीन वर्षाच्या मुलीवर बिबट्याने हल्ला केल्यानंतर संतप्त नागरिकांनी वनरक्षकांना एका घरात कोंडून ठेवल्याचा प्रकार घडला आहे. जवळपास पाच तासांनंतर गावकऱ्यांनी डांबून ठेवलेल्या कर्मचाऱ्यांची सुटका करण्यात आली, काल मंगळवारी संध्याकाळच्या दरम्यान वॉर्ड क्र एक मध्ये अंगणात खेळत असलेल्या तीन वर्षीय आरक्षा जगजीवन पोप्पलवार या मुलीवर बिबट्याने हल्ला केला. बिबट्या मुलीला घेऊन जात असलेले पाहताच मुलीला बिबट्याच्या तावडीतून सोडवण्यासाठी मुलीच्या आईने काठीने बिबट्याचा प्रतिकार केला आणि बिबट्याला पळवून लावले. जखमी अवस्थेतील आरक्षा जगजीवन पोप्पलवार हिला चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. संतप्त ग्रामस्थांनी या हल्ल्यानंतर घटनास्थळी पोहोचलेल्या वनपरिक्षेत्राधिकारी आणि पाच अन्य कर्मचाऱ्यांना एका घरात डांबले. हल्लेखोर वाघ-बिबट्या यांचा बंदोबस्त झाल्याशिवाय या अधिकाऱ्यांना सोडणार नसल्याची भूमिका त्यांनी घेतली. स्थानिक नागरिकांच्या संतप्त भूमिकेमुळे दुर्गापूर परिसरात मोठा तणाव निर्माण झाला आहे. दरम्यान, दुर्गापूर-उर्जानगर भागात वाघ-बिबट्यांचे सातत्याने हल्ले होत असून गेल्या 2 वर्षात वाघ-बिबट्यांच्या हल्ल्यात किमान 10 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. दुर्गापूर परिसरात या आधी 1 मे रोजी गीता विठ्ठल मेश्राम या 47 वर्षीय महिलेचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला तर 30 मार्चला प्रतिक बावणे या 8 वर्षीय मुलाचा तर 17 फेब्रुवारीला राज भडके या 16 वर्षीय मुलाचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे. मात्र यावर वनविभागाने कुठलीही ठोस उपाययोजना केलेली नाही. त्यामुळेच नागरिकांनी संतप्त होत वनाधिकारी व कर्मचाऱ्यांना डांबले असे नागरिकांचे मत आहे. चंद्रपूर मुख्य वनसंरक्षक प्रकाश लोणकर यांनी सांगितलं की, या हल्ल्यानंतर नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. बिबट्याला ठार करा अशी मागणी त्यांनी केली आहे.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्यूज), मो. 9421717068
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या