चंद्रपुरातील आझाद बागेच्या लोकार्पण सोहळ्यात रंगले राजकीय नाट्य, स्थानिक आमदार येण्यापूर्वीच पार पडला उदघाटन सोहळा !
चंद्रपूर :- चंद्रपूर महानगरपालिकेवर सत्ता असलेल्या भाजपने नैतिकतेचे आणि राजकीय शिष्टाचाराचे सर्व नियम धाब्यावर बसवत आझाद बागेच्या लोकार्पण सोहळ्याचे आयोजन केले. यात पालकमंत्री, खासदार, स्थानिक आमदार यांना निमंत्रण देखील देण्यात आले. त्यामुळे, अखेर यावर अपेक्षित असे वादंग उठले आणि ऐनवेळी भाजपची फजिती झाली. राजशिष्टाचाराचे संकेत पायदळी तुडवून भाजप पुरस्कृत कार्यक्रम घेण्याचा प्रयत्न विरोधकांनी हाणून पाडला. त्यामुळे, नवीन निमंत्रण पत्रिका आणि लोकार्पणाची कोनशिला मनपाला लावावी लागली. स्थानिक आमदार येण्यापूर्वी उद्घाटनाचा सोपस्कार पार पाडला. त्यामुळे, कार्यक्रमस्थळी चांगलाच तणाव निर्माण झाला. त्यामुळे, उद्घाटनानंतर लगेच काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर कार्यक्रमातून निघून गेले. संभाव्य राड्याची परिस्थिती लक्षात घेता कार्यक्रमस्थळी पोलिसांचा मोठा फौजफाटा आणि दंगा नियंत्रण पथक तैनात करण्यात आले होते. सहा कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या आझाद बगेच्या लोकार्पण सोहळ्याचे आयोजन भानापेठ प्रभागातील भाजपच्या तीन नगरसेवकांनी केले होते. या कार्यक्रमातून पालकमंत्री विजय वडेट्टीवार, स्थानिक आमदार किशोर जोरगेवार आणि खासदार बाळू धानोरकर यांना डावलण्यात आले. महापौर राखी कंचर्लावार आणि आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत लोकार्पण सोहळा काल शनिवारला आयोजित करण्यात आला. मात्र, या कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका हाती पडल्यानंतर खासदार धानोरकर आणि आमदार जोरगेवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली. जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ मनपा आयुक्त राजेश मोहिते यांना पत्र लिहिले. राजशिष्टाचाराची पायमल्ली होत आहे. कार्यक्रम झाल्यास आपण जबाबदार राहणार. कारवाई केली जाईल, असे लेखी कळविले. त्यानंतर सुत्रे हलली. दरम्यान, आयुक्त मोहिते यांनी कार्यक्रम कुणी आयोजित केला, याबाबत कानावर हात ठेवले. शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. दुसरीकडे आमदार किशोर जोरगेवार यांनी शहरात मी येणारच आहे, असे फलक लावले. त्यामुळे, पोलिसांनी भाजप नेत्यांना कार्यक्रम घेऊ नये, असे स्पष्टच सांगितले. कार्यक्रम रद्द करण्याची नामुष्की येण्याची चिन्हे दिसताच भाजपच्या नेत्यांनी काँग्रेस आणि जोरगेवार यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. नवी पत्रिका छापली. कोनशिला बदलविली. त्यावर पालकमंत्री, खासदार आणि जिल्ह्यातील सर्वच आमदारांच्या नावांचा उल्लेख करण्यात आला. सायंकाळी ५.३० वाजताचा लोकार्पण कार्यक्रम सायंकाळी सातपर्यंत सुरू झाला नव्हता. उद्घाटक आमदार सुधीर मुनगंटीवार आले. तोपर्यंत निमंत्रण पत्रिकेतील एकही लोकप्रतिनिधी पोहचला नव्हता. काही वेळानंतर खासदार धानोरकर आले. हीच संधी साधून महापौर कंचर्लावार यांनी आमदार जोरगेवार येण्यापूर्वीच उद्घाटनाचा सोपस्कार पार पाडला. त्यानंतर मोठी मिरवणूक घेवून जोरगेवार कार्यकर्त्यांसह कार्यक्रमस्थळी पोहचले. उद्घाटनातून डावलण्यात आल्याचे लक्षात येत्याच त्यांचे समर्थक चांगलेच संतप्त झाले. त्यामुळे, तणावाची स्थिती निर्माण झाली. त्यांच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी सुरू केली. ही परिस्थिती बघून खासदारांनी मंचावर जाणे टाळले आणि ते निघून गेले. शेवटी मंचावर जोरगेवार आणि मुनगंटीवारच राहिले. रात्री उशिरापर्यंत लोकापर्णाचा सोहळा सुरू होता. मात्र राजकीय मान-अपमानाच्या नावाखाली रंगणाऱ्या या प्रयोगाला जिल्ह्याच्या पालकमंत्र्यासह अनेक आमदारांनी पाठ फिरविल्याचे दिसून आले,
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो.9421717068


टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या