बल्लारपूर नगराध्यक्ष पदाचा कार्यभार ३० डिसेंबर २०२५ रोजी अल्का वाढई यांनी स्विकारला (Alka Wadhai assumed the office of Ballarpur Municipal Council President on December 30, 2025.)
उपमुख्याधिकारी संगीता उमरे यांनी नियमानुसार अध्यक्षपदाचा कार्यभार सोपविला
बल्लारपूर :- बल्लारपूर नगर परिषदेच्या कारभारात प्रशासकीय व्यवस्थेनंतर लोकनियुक्त नेतृत्वाचा नवा अध्याय सुरू झाला आहे. जिल्हाधिकारी चंद्रपूर यांच्या आदेशानुसार प्रशासक म्हणून कार्यरत असलेले विशाल वाघ, मुख्य अधिकारी, नगर परिषद बल्लारपूर यांचा कार्यकाळ २९ डिसेंबर २०२५ रोजी संपुष्टात आला. नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ ची प्रक्रिया २१ डिसेंबर २०२५ रोजी पूर्ण होऊन थेट नगराध्यक्षपदी अल्का अनिल वाढई यांची निवड झाली. त्यानुसार ३० डिसेंबर २०२५ रोजी अधिकृतरीत्या नगराध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारण्यात आला. मुख्य अधिकारी तथा प्रशासक विशाल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली उपमुख्याधिकारी संगीता उमरे यांनी नियमानुसार अध्यक्षपदाचा कार्यभार नवनिर्वाचित नगराध्यक्षांना सोपविला.
पदभार स्वीकार सोहळ्यानंतर नगर परिषद प्रशासनातर्फे नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवक-नगरसेविकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी नगरसेवक पवन मेश्राम, देवेंद्र आर्य, अब्दुल करीम, मुकद्दर सय्यद, इस्माईल ढाकवाला तसेच नगरसेविका छाया मडावी, वैष्णवी जुमडे, शिल्पा चुटे, अमकू भुक्या, मोना धानोरकर, वैशाली हुमणे, प्रियंका थुलकर, मेघा भाले, शारदा माकोडे, सुनीता जीवतोडे, करूणा रेब्बावार उपस्थित होते. विशेष म्हणजे यावेळी काँग्रेसच्या गटनेते पदी अब्दुल करीम यांची निवड करण्यात आल्याची माहिती आहे. या कार्यक्रमास डॉली मदन बांधकाम अभियंता, गजानन आत्राम कर निरीक्षक यांच्यासह नगर परिषद कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन किशोर डाखोरे, वरिष्ठ लिपिक यांनी केले.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068


टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या