चंद्रपूर :- खाद्यतेलाच्या सीमा शुल्कात प्रचंड वाढ - बहिणीच्या चुलीवरील फोडणी महागली राज्यातील महिलांचे आर्थिक मजबुतीकरण करण्याचा खोटा गाजावाजा करून राज्य सरकारने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर लोकसभा निवडणुकीतील मतांच्या झालेल्या कडकीमुळे लाडकी बहीण योजना अमलात आणली. राज्याच्या तिजोरीत ठणठणाट असताना केवळ सत्ता प्राप्तीसाठी महायुतीने चालविलेला हा केविलवाणा प्रयत्न अखेर सपेशल अपयशी ठरला असून काल रात्रीपासून खाद्य तेलाच्या सीमा शुल्कात केलेल्या प्रचंड वाढीमुळे राज्य सरकारच्या "लाडकी बहीण' योजनेचा बोजवारा निघाल्याची खरमरीत टीका खाद्यतेलाच्या प्रचंड भाव वाढीवरून महायुती सरकारचा खरपूस समाचार घेत राज्याचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. पुढे बोलताना विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत मतदारांनी गेल्या दहा वर्षाचा भाजप सरकारच्या कारकिर्दीचा आढावा लक्षात घेऊन मतदान केले. यात देशातील वाढलेली महागाई, महिला अत्याचार ,बेरोजगारी ,भ्रष्टाचार, नोकऱ्यांमधील खाजगीकरण शेतकरी आत्महत्या, वाढलेली गुन्हेगारी, देशावर वाढलेले कर्जाचे डोंगर या महत्त्वपूर्ण बाबींचा समावेश आहे. असे असतानाही देशात धार्मिक तेढ निर्माण करून अराजकता पसरवू पाहणाऱ्या भाजपाने राज्यात पक्ष फोडाफोडीचे राजकारण करून लोकसभा निवडणूक लढवली मात्र यात त्यांच्या पदरी अपयश पडले. आणि देशातील मतदारांनी इंडिया आघाडीला साथ देत संविधान बदलून पाहणाऱ्या मनुवाद्यांना जोरदार धक्का दिला. या अपयशाने खचलेले राज्यातील महायुती सरकारने विधानसभेत सत्ता प्राप्तीसाठी मध्य प्रदेशाच्या धरतीवर फोल ठरलेली राज्यात "लाडकी बहीण' योजना अस्तित्वात आणली. अगोदरच राज्याच्या तिजोरी ठणठणाट असताना तसेच अर्थसंकल्पात कुठलीही मोठी तरतूद नसताना केवळ आगामी काळात होऊ घातलेल्या निवडणुकांमध्ये विजयश्री मिळवण्यासाठी धडपड चालविली. आता लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे टाकायचे कुठून..? असा गंभीर प्रश्न सरकार पुढे उभा असताना सरकारने पुन्हा एकदा बहिणींच्याच घरात दरोडा टाकत खाद्यतेलाच्या सीमाशुलकात १२.५ टक्क्यावरुन ३२.५ टक्के एवढी प्रचंड वाढ केल्याने सध्याच्या व आगामी सणासुदीच्या दिवसात बहिणीच्या घरातील चुलीवरील फोडणी महागल्याने गृहिणी बहिणींचे आर्थिक बजेट पुर्णतः कोलमडणार असल्याचे वास्तव चित्र निर्माण झाले आहे. एकीकडे लाडकी बहीण म्हणून बहिणीच्या खात्यात पैसे जमा करून खोटा गाजावाजा करायचा आणि दुसरीकडे माञ बहिणीच्या घरातच दरोडा टाकून लुटायचे. अशा दुहेरी लुटारू भूमिकेमुळे राज्य सरकारच्या फसव्या लाडकी बहीण योजनेचे पितळ उघडे पडल्याची खरमरीत टीका विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राज्यातील महायुती सरकार वर केली आहे.अशा निष्ठूर व निर्दयी सरकारला आता धडा शिकविणे काळाची गरज ठरली आहे. म्हणुन राज्यातील लुटारू त्रिकूट सरकारला आगामी निवडणूकी मधे सत्तेतून पायउतार करा असे आवाहन राज्यातील जनतेला विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केले आहे.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो.9421717068
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या