विद्यापीठाशी संबधित कामे होणार आता स्थानिक ठिकाणीच, चिमूर येथे विद्यार्थी सुविधा केंद्राचे उद्घाटन, विद्यार्थी सुविधा केंद्रामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय टळणार - कुलगुरु डॉ. प्रशांत बोकारे (The works related to the university will now be done at the local place, the opening of the student facility center at Chimur, the inconvenience of the students will be avoided due to the student facility center - Chancellor Dr. Prashant Bokare)

Vidyanshnewslive
By -
0
विद्यापीठाशी संबधित कामे होणार आता स्थानिक ठिकाणीच, चिमूर येथे विद्यार्थी सुविधा केंद्राचे उद्घाटन, विद्यार्थी सुविधा केंद्रामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय टळणार - कुलगुरु डॉ. प्रशांत बोकारे (The works related to the university will now be done at the local place, the opening of the student facility center at Chimur, the inconvenience of the students will be avoided due to the student facility center - Chancellor Dr. Prashant Bokare)


गडचिरोली :- शिक्षण हे मानवी जीवन समृद्धीचे व समाज परिवर्तनाचे प्रभावी साधन असून विद्यार्थी हा शिक्षण व्यवस्थेचा केंद्रबिंदू आहे. विद्यार्थ्यांमुळेच विद्यापीठ, महाविद्यालये व शैक्षणिक संस्थाचे अस्तित्व आहे. विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास हे ध्येय डोळयासमोर ठेवून त्यांची होणारी शैक्षणिक गैरसोय व आर्थिक भार टाळण्यासाठी चिमूर येथे विद्यार्थी सुविधा केंद्र स्थापन करण्यात आले आहे. आता विद्यापीठाशी संबधित कामे स्थानिक ठिकाणीच होतील. त्यामुळे या परीसरातील विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय टळणार असल्याचे, प्रतिपादन गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. प्रशांत बोकारे यांनी केले. त्यासोबतच विद्यार्थी, पालक, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या तक्रारी व समस्यांचे निराकरण या केंद्रातून होईल,अशी ग्वाही गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. प्रशांत बोकारे यांनी दिली. चिमूर येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाविद्यालयात विद्यार्थी सुविधा केंद्राच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते.
          कार्यक्रमाला गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे, प्र- कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक दिनेश नरोटे, चिमूर, गांधी सेवा शिक्षण समितीचे अध्यक्ष डॉ. दीपक यावले, सचिव विनायकराव कापसे, कोषाध्यक्ष मारोतराव भोयर, सदस्य श्रीहरी गोहने, सहसचिव कुसुमराव कडवे, राष्ट्रसंत तुकडोजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अश्विन चंदेल तसेच चिमूर येथील प्रतिष्ठित नागरिक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. अध्यक्षीय भाषण करतांना कुलगुरु डॉ. बोकारे म्हणाले, वंदनीय राष्ट्रसंतांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे. थोर व्यक्तींनी त्यांच्या कार्याचे प्रयोजन उत्तमरीत्या करुन ठेवलेले असते. काळाच्या ओघामध्ये त्यांनी उचललेली पावले, त्यांनी आखलेली धोरणे, घेतलेले निर्णय व समाजाकडून करुन घेतलेले कार्य हे दूरगामी फळ देणारे असते. त्याचा प्रत्यय म्हणजे राष्ट्रसंत तुकडोजी महाविद्यालयाची वाटचाल आहे. सन 1952 रोजी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी चिमूर येथे गांधी सेवा शिक्षण समितीची स्थापना केली. तुकडोजी महाराजांनी त्या काळी उचललेली पावले व त्यांच्या उद्देशांची फलश्रुती आज विद्यार्थी सुविधा केंद्राच्या माध्यमातून होतांना दिसत असल्याचे ते म्हणाले. कुलगुरु डॉ. बोकारे पुढे म्हणाले, चिमूर परीसरातील विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक कामांसाठी विद्यापीठात यावे लागते. या परीसरातील विद्यार्थ्यांना गडचिरोली येथे जाण्या-येण्यास वाहनाची सुविधा नाही. तसेच त्यांची होणारी गैरसोय व आर्थिक भुर्दंड टाळण्याकरीता चिमूर येथे विद्यार्थी सुविधा केंद्र कार्यान्वीत करण्यात आले आहे. विद्यार्थी व महाविद्यालयांना या सुविधा केंद्राचा लाभ होईल. चंद्रपूर येथे विद्यापीठाचे उपकेंद्र तयार होत आहे. चंद्रपूर सारखेच उपकेंद्र चिमूर तालुक्याच्या ठिकाणी देखील होईल. या सुविधा केंद्रात येणारा विद्यार्थी, कार्यालयीन कामकाजाकरीता येणारा शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी या सर्वांची कामे या केंद्रातून होईल. हे सुविधा केंद्र विद्यापीठाचे मिनी केंद्र होईल, असा विश्वास कुलगुरु डॉ. बोकारे यांनी यावेळी व्यक्त केला. प्रास्ताविकेत बोलतांना प्र-कुलगुरु डॉ. श्रीराम कावळे म्हणाले, चिमूर व गडचिरोली हे अंतर लांब असून विद्यार्थ्यांना शैक्षणिक कामाकरीता विद्यापीठात यावे लागत होते. विद्यार्थ्यांच्या वेळ व पैशाची बचत व्हावी हा उद्देश समोर ठेवून 2021 मध्ये चंद्रपूर, तदनंतर अहेरी व आता राष्ट्रसंत तुकडोजी महाविद्यालय, चिमूर येथे हे सुविधा केंद्र कार्यान्वीत करण्यात आले आहे. त्यासोबतच, विद्यार्थी सुविधा केंद्र कार्यान्वीत करण्यामागची भुमिका विषद केली. कार्यक्रमाचे संचलन डॉ. नितीन कत्रोजवार तर आभार प्रा. आशुतोष पोपटे यांनी मानले. तत्पुर्वी, कार्यक्रमाची सुरुवात दिपप्रज्वलन तसेच वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करुन करण्यात आली.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)