राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती विशेष, स्वामी विवेकानंद यांचे तथागत बुद्ध आणि बौद्ध धर्मा विषयीचे विचार (Rajamata Jijau and Swami Vivekananda Jayanti Special, Thoughts of Swami Vivekananda on Tathagata Buddha and Buddhism)

Vidyanshnewslive
By -
0
राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती विशेष, स्वामी विवेकानंद यांचे तथागत बुद्ध आणि बौद्ध धर्मा विषयीचे विचार (Rajamata Jijau and Swami Vivekananda Jayanti Special, Thoughts of Swami Vivekananda on Tathagata Buddha and Buddhism)
वृत्तसेवा :- जगात अनेक राण्या झाल्या, महाराण्या  झाल्या पण जिजाऊंसारखी राजमाता दुसरी झाली नाही. आपल्या पतीचं स्वराज्याचं स्वप्न ज्यांनी  पुत्र शिवबाच्या मनात पेरलं. नुसतं पेरलं नाही तर सुसंस्कारांच्या अमृतसिंचनाने ते फुलवलं. फुलवून वाढवलं. त्याला दृष्ट लागू नये म्हणून डोळ्यात तेल घालून जीवापाड जपलं. त्याला नवनवी पानं फुलं दिली. मुरार जगदेवने उद्ध्वस्त केलेले पुणे, दिमाखात वसवून त्याला नावलौकिक प्राप्त करुन दिला जिजाऊंनी. पती आणि पुत्राचा दररोज मृत्युशी चाललेला संघर्ष, उघड्या डोळ्यांनी बघुनही  सैरभैर न होता, व चिंतेची साधी रेघही चेहऱ्यावर  उमटू न देता, त्यांनी खंबीरपणे स्वराज्याची निगरानी केली. ब्राह्मणी धर्माच्या कर्मकांडांचा कधी त्यांनी निर्वाह केला नाही. तसेच शहाजी राजांच्या निर्वाणानंतर सती जायलाही त्यांनी नकार दिला. शिवरायांची आग्रा भेट, अटक, सुटका व राजगडी पुनरागमनापर्यंत स्वराज्याचा कारभारही समर्थपणे सांभाळला तो या राजमातेनेच. आजी झाल्यावर निवृत्तांसारखं पैलतीरी डोळे लावून न बसता, ज्यांनी नातू शंभूराजांच्या मनातही अंत:करणाची पेरणी करून, स्वराज्याभिमानाचं असं स्फुलिंग चेतविलं, की लोकांच्या मुखातून सहजोद़्गार प्रकटले,  'बापापेक्षा बेटा सवाई!' तीन पीढ्यांना स्वराज्याच्या ध्यासाने प्रेरित करणारी अशी राजमाता झाली नाही. तिच्या परिचयासाठी पती, पुत्र वा नातवाच्या ओळखीच्या पुस्तीची गरज नाही. राजमाता जिजाऊ म्हटलं की पुरे! नुसतं राजमाता म्हटलं तरी ओठांवर आपसूक जिजाऊ शब्द येतो. राजमाता आणि जिजाऊ हे शब्द म्हणजे जणु एका नाण्याच्या दोन बाजूच होय! स्वराज्य निर्मात्या या राजमातेला, आज त्यांच्या  जयंतीनिमित्त मानाचा मुजरा.                      स्वामी विवेकानंद यांचे तथागत बुद्ध आणि बौद्ध धर्मा विषयीचे विचार “बुद्धांच्या ह्रदयाचा एक लक्षांशही मला लाभला तर मी स्वत:ला धन्य मानले असते.” “अवघ्या जगामध्ये बुद्धच असे एकमेव महापुरूष आहेत की ज्यांनी यज्ञातील पशूहत्या थांबविण्यासाठी यज्ञात पशूच्या ऐवजी स्वत:चे जीवन बळी देण्याची तयारी दाखवली.” “बौद्ध धर्म हा जगातील पहिला प्रचारक धर्म होता आणि त्याने त्या काळातील सगळ्या सभ्य जगात प्रवेश केला, आणि तरीही या धर्माच्या प्रचारार्थ रक्ताचा एक थेंबही सांडावा लागला नाही.” “बुद्ध हे इतर सर्व धर्माचार्यांपेक्षा अधिक साहसी, अधिक प्रांजळ होते. ते म्हणाले होते की, "कोणत्याही शास्त्रावर विश्वास ठेवू नका. वेद हे थापाडे आहेत. शास्त्रे जर माझ्या अनुभूतींशी वा उपलब्धींशी जुळतील तर ते त्या शास्त्रांचेच भाग्य. सर्वात श्रेष्ठ शास्त्र स्वत: मीच आहे. यागयज्ञ आणि देवदेवतार्चन निष्फळ होय'' जगाला सर्वांग सुंदर नीतिशास्त्रीची शिकवण देणारे बुद्ध हेच पहिले मानव होते.” “बुद्ध हे एक थोर समाज सुधारक होते. भारतातील थोर तत्त्वज्ञांमध्ये बुद्ध हेच असे एकमेव होते की ज्यांना जातिभेद मान्य नव्हता... इतर सर्वच दार्शनिकांनी वा तत्त्वज्ञांनी थोड्याबहूत प्रमाणात सामाजिक अंधविश्वासांना कुरवाळलेच आहे. समाजाच्या खुळचट समजुतींची खुशामत केली आहे.” “भगवान बुद्धांसारखा त्यागी महापुरूष या अवनीतलावर अन्य कुणी झाला नाही.” “मानवा मानवातच काय पण मनुष्य आणि पशू यांमध्ये देखील जी विषमता आढळते तिचा बुद्धांनी निषेध केला. ‘सर्व जीव समान आहेत’ असा उपदेश बुद्ध करीत. बुद्धांनीच सर्वप्रथम मद्यपान निर्षधाचा पुरस्कार केला आहे.”“जगातील सर्व आचार्यांमध्ये वा धर्म संस्थापकांमध्ये बुद्ध हे एकटेच असे आहेत की ज्यांच्या कार्याला बाहेरील कोणताही हेतू प्रेरक नव्हता. इतर सर्वांनीच आपण ईश्वरावतार, ईश्वरदूत, ईश्वरपुत्र आहोत अशी घोषणा केलेली आहे, आणि ते असेही सांगून गेले आहेत की, त्यांच्यावर जो विश्वास ठेवील तोच स्वर्गी जाईल, मुक्त होईल. पण बुद्ध मृत्यूच्या अगदी शेवटच्या क्षणापर्यंत हेच म्हणत असत, “कुणीही तुम्हाला मुक्त होण्यासाठी साहाय्य करू शकणार नाही. स्वत:च स्वत:ला साहाय्य करा, स्वत:च्याच प्रयत्नांची मुक्तिलाभाची कास धरा.” स्वत: संबंधी ते म्हणत, "बुद्ध या शब्दाचा अर्थ आहे आकाशाप्रमाणे अनंत ज्ञानसंपन्न; मी सिद्धार्थ गौतमाने ती अवस्था प्राप्त करून घेतली आहे. तुम्हीही जर तिच्यासाठी प्राण पणास लावून प्रयत्न कराल तर तुम्हालीही ‘बुद्धत्व’ प्राप्ती होऊ शकेल." “भारतात आज हे जे संन्याशांचे मठ वैगरे दिसतात ते सारे बौद्ध धर्माच्या अधिकाराखाली होते. हिंदूनी आता त्या साऱ्यांना आपल्या रंगाने रंगवून स्वत:चे करून घेतले आहे. बुद्धांपासूनच यथार्थ संन्यासाश्राचा पाया रचला गेला. त्यांनीच संन्यासाश्राच्या मृत सांगड्यात प्राण ओतले.”
“बुद्धांचा हजारावा अंश माझ्यात असता तर मी स्वत: ला धन्य समजलो असतो.” “बुद्धांनी प्रचंड शक्तीशाली सत्याची शिकवण दिली. सर्व जगाला त्यांनी भेदभाव न करता शिकवले, कारण ‘मानवाची समानता’ हा त्यांच्या महान संदेशांपैकी एक संदेश होता. सर्व मानसे समान आहे, याला काही अपवाद नाही.” “बुद्ध हे समतेचे महान उपदेशक होते. आध्यात्मिकता प्राप्त करून घेण्याचा प्रत्येक पुरूषाला व स्त्रीला सारखाच हक्क आहे. ही त्यांची शिकवण होती.”

संदर्भ - भगवान बुद्ध आणि त्यांची शिकवण 
लेखक - स्वामी विवेकानंद
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)