मुख्य समारंभासाठी प्रथम येणा-याला प्रथम प्राधान्याने प्रवेश सुरक्षेच्या दृष्टीने गर्दी टाळण्यासाठी नागरिकांसाठी बाहेर स्क्रीनची व्यवस्था, क्रीडा स्पर्धेनिमित्त आयोजित बाईक रॅलीला नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद

Vidyanshnewslive
By -
0
मुख्य समारंभासाठी प्रथम येणा-याला प्रथम प्राधान्याने प्रवेश सुरक्षेच्या दृष्टीने गर्दी टाळण्यासाठी नागरिकांसाठी बाहेर स्क्रीनची व्यवस्था, क्रीडा स्पर्धेनिमित्त आयोजित बाईक रॅलीला नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद (First-come, first-served entry for the main event Screening outside for citizens to avoid crowding in terms of security Enthusiastic response of citizens to the bike rally organized for the sports event)
चंद्रपूर :- बल्लारपूर येथील तालुका क्रीडा संकूल येथे होणा-या 67 व्या राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेचा ज्वर चांगलाच चढला आहे. विविध राज्यातून मोठ्या संख्येने खेळाडू चंद्रपुरात दाखल झाले आहेत. दि. 27 डिसेंबर 2023 रोजी या स्पर्धेचे उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत होणार असून भव्यदिव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचेसुध्दा आयोजन करण्यात आले आहे. सदर कार्यक्रमासाठी येणा-या अतिमहत्वाच्या व्यक्ती तसेच विविध राज्यातील मोठ्या प्रमाणात येणा-या खेळाडूंची संख्या लक्षात घेता मैदानातील गर्दी टाळण्यासाठी पहिल्या एक हजार व्यक्तिंनाच प्रवेश देण्यात येणार आहे. उद्घाटन कार्यक्रमासाठी प्रथम येणा-याला प्रथम प्राधान्य, या तत्वानुसार नागरिकांना मैदानात प्रवेश दिला जाईल. उर्वरीत नागरिकांना सदर कार्यक्रम बघता यावा, यासाठी प्रशासनाने स्टेडीयमच्या बाहेर मोठ्या स्क्रीनची व्यवस्था केली आहे. तेथे बसूनसुध्दा या कार्यक्रमाचा आस्वाद घेता येणार आहे. त्यामुळे ज्या नागरिकांना मैदानात प्रवेश मिळाला नाही, अशा नागरिकांनी स्क्रीनवर हा कार्यक्रम बघावा व प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासन व आयोजन समितीने केले आहे.
      राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नातून जिल्ह्यात राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन होत आहे. या निमित्ताने जिल्ह्यात विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातून खेळाडू येण्यास सुरवात झाली आहे. या खेळाडूंचा उत्साह वाढविण्यासाठी तसेच क्रीडा स्पर्धेचा ज्वर वाढवून वातावरण निर्मितीकरीता पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या सुचनेवरून जिल्हा प्रशासनाच्यावतीने आज (दि.25) चंद्रपूर व बल्लारपूर या शहरात बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. रॅलीत नागरिकांनी स्वत:हून मोठ्या प्रमाणात सहभागी होत उत्स्फुर्त प्रतिसाद नोंदविला. बाईक रॅलीला सुरवात होण्यापूर्वी जिल्हाधिकारी विनय गौडा म्हणाजे, दिनांक 26 ते 31 डिसेंबर या कालावधीत बल्लारपुर क्रीडा संकुलात होणाऱ्या राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धा जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब आहे. या क्रीडा स्पर्धेबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले असून चंद्रपूरचा नावलौकीक देशभरात होण्यासाठी या कार्यक्रमात सर्वांनी सहभागी होऊन स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रत्येकाने आपले योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
सदर रॅलीला जिल्हा क्रीडा संकुल येथून सुरूवात करण्यात आली. ही रॅली पुढे वरोरा नाका, प्रियदर्शनी चौक, जटपुरा गेट, माता महाकाली मंदिर, बल्लारपूर शहर, ब्राह्मणी फाटा या मार्गाने विसापूरपर्यंत पोहचली. तालुका क्रीडा संकुल बल्लारपूर येथे रॅलीचा समारोप झाला. यावेळी उपस्थितांनी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त बल्लारपूर येथील क्रीडा संकूलात असलेल्या वाजपेयी यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. रॅलीत जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्यासह जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, जिल्हा पोलिस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी, सहायक जिल्हाधिकारी मुरुगानंथम एम., उपवनसंरक्षक श्वेता बोड्डू, जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड, राहुल पावडे, डॉ. मंगेश गुलवाडे, ब्रिजभूषण पाझारे तसेच विविध विभागाचे अधिकारी-कर्मचारी व क्रीडा संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले होते.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)