महात्मा फुले जनआरोग्य योजना आता व्यापक स्वरूपात लागू होणार, राज्यातील सर्व शिधापत्रिकाधारक व अधिवास प्रमाणपत्रधारक नागरिकांना लाभ मिळणार (Mahatma Phule Jan Arogya Yojana will now be widely implemented, all ration card holders and domicile certificate holders of the state will get benefits.)

Vidyanshnewslive
By -
0

महात्मा फुले जनआरोग्य योजना आता व्यापक स्वरूपात लागू होणार, राज्यातील सर्व शिधापत्रिकाधारक व अधिवास प्रमाणपत्रधारक नागरिकांना लाभ मिळणार (Mahatma Phule Jan Arogya Yojana will now be widely implemented, all ration card holders and domicile certificate holders of the state will get benefits.)

वृत्तसेवा :- गोरगरीबांना संजीवनी ठरलेली महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना राज्य सरकारने आता आणखी व्यापक केली असून, या योजनेचा लाभ आता राज्यातील सर्व शिधापत्रिकाधारक व अधिवास प्रमाणपत्रधारक नागरिकांना मिळणार आहे. महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ राज्यात यापूर्वी केशरी व अंत्योदय शिधापत्रिकाधारकांनाच मिळत होता. आता राज्यातील सर्व शिधापत्रिकाधारक, अधिवास प्रमाणपत्रप्राप्त नागरिकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. केंद्र सरकारच्या आयुष्मान भारत योजनेतून नागरिकांना पाच लाख रुपयांपर्यंतचे आरोग्य कवच मिळते. महात्मा फुले योजनेची ही मर्यादा दीड लाख रुपये होती. सुधारित योजनेत राज्य सरकारनेदेखील ही मर्यादा प्रतिकुटुंब प्रतिवर्ष पाच लाख रुपये केली आहे. या दोन्ही योजनांच्या एकत्रित अंमलबजावणीमुळे दोन्ही योजनांतील समाविष्ट आजारांवरील उपचारांचा लाभ रुग्णांना मिळणार आहे. एवढेच नाही, तर सर्व लाभार्थी नागरिकांचे आरोग्य कवचही दीड लाख रुपयांऐवजी पाच लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात आले आहे. राज्य मंत्रिमंडळाने या निर्णयाला गेल्या महिन्यातच मंजुरी दिली असली, तरी सार्वजनिक आरोग्य विभागाने याबाबतचा तपशीलवार शासन निर्णय नुकताच जाहीर केला आहे. सध्या फुले योजनेत ९९६ आजारांवर, तर पंतप्रधान योजनेत एक हजार २०९ आजारांवर उपचार होतात. राज्य सरकारने आजारांच्या संख्येतही वाढ केल्याने आता दोन्ही योजनांतून प्रत्येकी एक हजार ३५६ आजारांवर उपचार मिळणार आहेत. त्यातील ११९ आजारांवर मात्र शासकीय रुग्णालयांतूनच उपचार मिळणार आहेत. या योजनांतून लाभ मिळणाऱ्या राज्यातील अंगिकृत रुग्णालयांची एकूण संख्या एक हजार आहे. यात कर्नाटक सीमाभागातील रुग्णालयांचा समावेश केल्याने ही संख्या १३५० वर गेली आहे. महात्मा फुले योजनेचा लाभ याआधीच महाराष्ट्र-कर्नाटक सीमेलगतच्या आठ जिल्ह्यांत १४० आणि कर्नाटक राज्यातील दहा अतिरिक्त रुग्णालयांतून देण्याचा निर्णय झाला आहे. याव्यतिरिक्त आणखी दोनशे रुग्णालये अंगिकृत करण्यास मान्यता दिली आहे. तसेच यापुढे मागास भागात नव्याने सुरू होणारी सर्व रुग्णालयेही त्यांची इच्छा असल्यास एकत्रित योजनेत अंगिकृत केली जाणार आहेत. विशेष म्हणजे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजनेचा महात्मा फुले जनआरोग्य योजनेत समावेश करण्यात आला आहे. तसेच रस्ते अपघाताबाबतच्या उपचारांची संख्या ७४ वरून १८४ करण्यात आली आहे. उपचाराच्या खर्च मर्यादेतही प्रतिरुग्ण ३० हजार रुपयांवरून एक लाख रुपये, अशी वाढ करण्यात आली आहे. यात राज्याच्या भौगोलिक क्षेत्रातील रस्ते अपघातांत जखमी झालेल्या, राज्यातील व देशातील रुग्णांचा समावेश होणार आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)