महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात फूट ; अजित पवार यांनी घेतली उपमुख्यमंत्री पदाची शपथ, 8 नेत्यानीही घेतली शपथ (A big political earthquake in Maharashtra, split in the Nationalist Congress Party; Ajit Pawar took oath as Deputy Chief Minister, 8 leaders also took oath)

Vidyanshnewslive
By -
0

महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात फूट ; अजित पवार यांनी घेतली उपमुख्यमंत्री पदाची शपथ, 8 नेत्यानीही घेतली शपथ (A big political earthquake in Maharashtra, split in the Nationalist Congress Party;  Ajit Pawar took oath as Deputy Chief Minister, 8 leaders also took oath)

मुंबई :- महाराष्ट्राच्या राजकारणात रविवार मोठा भूकंप घडवणारा ठरला आहे. अजित पवार फक्त एका तासात विरोधी पक्षनेता पदावरुन थेट उपमुख्यमंत्री झाला आहेत. अजित पवार विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला असून शिंदे, फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले आहेत. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. अजित पवार यांच्यासह छगन भुजबळ धर्मरावबाबा आत्राम, सुनील बनसोडे, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रिफ, धनंजय मुंडे, आदिती सुनील तटकरे, अनिल पाटील यांनीही शपथ घेतली. शपथविधीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपाचे सर्व मंत्री उपस्थित होते. आश्चर्याची बाब म्हणजे, शरद पवारांचे निकटवर्तीय असणारे प्रफुल्ल पटेलही राजभवनात उपस्थित होते. रविवारी सकाळी इतक्या वेगाने घटना घडल्या की कोणाला काही कळायच्या आधीच अजित पवार राज्याचे नवे उपमुख्यमंत्री झाले होते. विशेष म्हणजे राजकीय वर्तुळात अनेकांना याची कल्पनाच नव्हती. अजित पवार बैठकीनंतर समर्थक आमदारांसह राजभवानात दाखल झाले आणि उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. महाराष्ट्राच्या राजकरणात आजचा रविवार कायमचा नोंदला जाईल. सकाळी लोकांना कळण्याआधीच अजित पवार आपल्या समर्थक आमदारांसह राजभवनासाठी निघाले होते. सर्वात आधी अजित पवारांनी समर्थक आमदारांसह आपल्या निवासस्थानी बैठक घेतली. यानंतर 17 आमदारांसह शिंदे सरकारला पाठिंबा देण्यासाठी राजभवनासाठी निघाले. अजित पवार पोहोचले तेव्हा राजभवनात एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांच्यासह इतरजण पोहोचले होते. शरद पवार यांनी अध्यक्षपद सोडत असल्याची घोषणा केल्यानंतर अजित पवार वगळता सर्वांनीच त्यांच्या निर्णयाला विरोध दर्शवला होता. तेव्हापासूनच अजित पवार यांच्या नाराजीची चर्चा सुरु झाली होती. दरम्यान, शरद पवार यांनी पक्षांतर्गत विरोधानंतर निर्णय़ मागे घेतला होता. त्यानंतर अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी आपली इच्छा नसताना विरोधी पक्षनेतेपद दिलं असून, आपल्याकडे पक्षांतर्गंत इतर जबाबदारी द्यावी अशी मागणी केली होती. तसंच आपल्याला प्रदेशाध्यक्षपदी काम करण्याची इच्छा असल्याचं सूचक विधान केलं होतं. यासाठी त्यांनी अल्टिमेटमही दिला होता. यानंतर अखेर आज त्यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकला आहे. आज सकाळी 11 वाजल्यापासूनच राज्यात वेगवान घडामोडी सुरु झाल्या होत्या. सर्वात आधी अजित पवारांचे पीए राजभवनात दाखल झाले होते. यानंतर देवेंद्र फडणवीसही सागर बंगल्यावरुन राजभवनासाठी निघाले. यामुळे एकच चर्चा सुरु झाली होती. काही वेळातच छगन भुजबळ आणि राष्ट्रावादीचे इतर आमदार पोहोचल्यानंतर चित्र स्पष्ट झालं. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे पोहोचल्यानंतर सर्वात शेवटी अजित पवार दाखल झाले आणि उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. अजित पवार यांच्यासह एकूण 8 आमदारांचा शपथविधी यावेळी पार पडला.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)