भारतातील सर्वात प्राचीन असलेली सम्राट अशोकांची “धम्मलिपि”चा शोध व भारतीय शिलालेखांचे गूढ उकलल्या बद्दल जेम्स प्रिन्सेपला आदरपूर्वक नमन. (A respectful tribute to James Prinsep for discovering the “Dhammapi” of India's oldest emperor Ashoka and unraveling the mysteries of Indian inscriptions.)

Vidyanshnewslive
By -
0

भारतातील सर्वात प्राचीन असलेली सम्राट अशोकांची “धम्मलिपि”चा शोध व भारतीय शिलालेखांचे गूढ उकलल्या बद्दल जेम्स प्रिन्सेपला आदरपूर्वक नमन. (A respectful tribute to James Prinsep for discovering the “Dhammapi” of India's oldest emperor Ashoka and unraveling the mysteries of Indian inscriptions.)

वृत्तसेवा :- जेम्स प्रिन्सेप 1819 मधे जेव्हा भारतात आला तेव्हा तो 20 वर्षांचा होता. जेम्स हा जॉन व सोफिया यांचं १० वं अपत्य होता. 1771 मधे जेम्सचे वडील, जॉन यांनी भारतात येउन अमाप पैसा कमावला होता व भारतातील संधी पाहून आपल्या मुलांनाही भारतात पाठवले. जेम्सला इंजीनियरिंग व अर्कीटेक्ट या विषयात खूप आवड होती. वडिलांच्या ओळखीने जेम्सला भारतात, कलकत्ता येथील टांकसाळीत ‘अस्से मास्टर’ म्हणजे 'पारख करणारा' म्हणून काम मिळाले. वर्षभरातच त्याची वाराणसीच्या टांकसाळीत बदली करण्यात आली. त्याची कामाची प्रगती बघून थोड्याच अवधीत त्याला बढतीवर पुन्हा कलकत्त्याला बोलविण्यात आले. टांकसाळीत अस्से मास्टर म्हणून काम करताना त्याला अनेक नवीन प्रयोग करता आले व त्याने नवीन उपकरणांचा शोध घेतला. टांकसाळीतील प्रचंड मोठ्या भट्टीतील अचूक तापमान मोजण्याचे उपकरण किंवा 0.19 ग्रॅम एवढ्याशा धातूचे वजन करण्याचे तराजू हे त्यापैकी काही उपकरणे जेम्सने तयार केली. वाराणसी मधे असताना, जेम्स तेथील अनेक इमारतींच्या शिल्पकलेने भारावून गेला. वाराणसीच्या टांकसाळीचे डिझाईन, तेथील चर्च, वाराणसीला रोगराई पासून बचाव करण्यासाठी सांडपाणी वाहून नेणारी भूमिगत भुयारे, औरंगजेबच्या मिनारांची दुरुस्ती आणि दगडी पूल हे सर्व जेम्सच्या कल्पकतेची आजही साक्ष देतात.

     कलकत्त्याला आल्यानंतर जेम्सने नाणे संशोधनावर भर दिला. जेम्सला “जर्नल ऑफ एशियाटीक सोसायटी”चे संपादक करण्यात आले आणि त्यात त्याने रसायनशास्त्र, खनिज, नाणेशास्त्र, भारतातील प्राचीन वास्तू, स्थळे, हवामान बदल व पर्यावरणावर अनेक लेख प्रसिद्ध केले. मात्र जेम्स प्रिन्सेपची खरी ओळख जगाला झाली ती त्याच्या लिपि संशोधानामुळे. जेम्स तसा खऱ्या अर्थाने भाषातज्ञ किंवा लिपितज्ञ नव्हता, मात्र त्याला संशोधनाची आवड होती. प्रत्येक गोष्टीची सखोल माहिती तो मिळवायचा. प्राचीन नाण्यावर काम करीत असताना  त्यातील अक्षरे त्याला खुणवू लागली. त्या अक्षरांचे संशोधन तोपर्यंत सिमित होते. या अक्षरांमध्ये व अलाहाबादच्या स्तंभावरील अक्षरांमध्ये काहीतरी साम्य आहे असे वाटल्याने जेम्सने त्याचा पाठपुरावा करायचे ठरविले. ओरिसा मधील काही खडकांवर देखील त्याला काही अक्षर कोरल्याचे कळाले. बिहार मधील बेतिहा या ठिकाणाचे काही शिलालेखांचे ठसे त्याने मागविले. त्याने भारतातील अनेक संस्कृत पंडितांना याबद्दल विचारले मात्र कोणाला ते सांगता आले नाही. ब्याक्टेरिया आणि कुषाण यांची इंडो ग्रीक नाण्यांचा अभ्यासातून त्याने ‘खरोष्ठी’ या प्राचीन लिपिचा शोध लावला. त्याचा हा निबंध एशियाटीक सोसायटीच्या जर्नल मधे प्रसिध्द झाला आणि संपूर्ण भारतातून लोकांनी त्याच्याकडे अनेक शिलालेखांचे ठसे, नाणी, हस्तलिखिते  पाठवून दिली. एवढेच नव्हे तर महाराजा रणजीत सिंह यांचे फ्रेंच जनरल जें बाप्तीस्ते वेन्तुरा यांनी रावलपिंडी मधील उत्तखणनात सापडलेली काही शिलालेख पाठवून दिले. शिलालेखातील अभ्यासातून प्रिन्सेप यांनी सर्वात प्रथम शोध लावला तो "दानं" या शब्दाचा कारण अनेक शिलालेखांच्या शेवटी हा शब्द लिहिला होता. 1837 मध्ये प्रथमच भारतातील शिलालेखांमधील अक्षरांचा शोध  प्रिन्सेपने लावला. पुढे सम्राट अशोकाचे शिलालेख वाचताना त्यांच्या प्रत्येक वेळीस आलेला "देवानांपिय पियदस्सिन" हे कोणाला उद्देशून आहे हे कळत नव्हते. प्रिन्सेपला वाटले कि हा कोणी श्रीलंकेचा राजा असावा कारण “महावंस” मधून तेथील देवानांपिय राजाचे नाव मिळत होते. मात्र श्रीलंकेच्या राजाचे हे शिलालेख किंवा स्तंभलेख भारतात कसे काय हा प्रश्न प्रिन्सेपला पडला. सतत ६ आठवड्यांच्या अथक प्रयत्नानंतर, अनेक शिलालेख वाचल्यानंतर व त्यांचे मित्र जॉर्ज टर्नर यांनी श्रीलंकेतील पालि भाषेतील पाठविलेल्या काही संदर्भ ग्रंथावरून देवानांपिय पियदस्सिन म्हणजेच सम्राट अशोक असल्याचे प्रतिपादन प्रिन्सेपने केले. या सर्व शिलालेखांमधे सम्राट अशोकांच्या न्याय, नीती व लोक कल्याणाचा मार्ग हे समान सूत्र लिहिले आहे. 

       या शोधानंतर प्रथमच जगाला अशोक नावाच्या सम्राटाचे शोध लागला. अनेक शिलालेखांच्या अभ्यासातून प्रिन्सेपने सम्राट अशोकांचे सारे आयुष्य जगासमोर ठेवले. जवळपास 2200 वर्षे अशोक नावाचा कोणी सम्राट या देशात होऊन गेला याचे कोणा गावीही नव्हते. 1915 मधे कर्नाटकातील मस्की येथील शिलालेखात सम्राट अशोकांचे नाव दिसले आणि प्रिन्सेपच्या अचूक अभ्यासाची कल्पना आली. या सर्व शिलालेखांचे आणि प्रिन्सेपच्या कार्याचा गौरव साऱ्या जगाने केला. पुढे प्रिन्सेपने भारतातील शिलालेखांच्या संशोधनाला वाहिलेल्या "Corpus inscriptionium indicarium" या नावाची ग्रंथाची मालिका प्रकाशित करण्याचा सुतोवाच केला जो पुढे जाऊन सर अलेक्सझांडर  कन्निंगहमने 1877 ला प्रकाशित केला. जेम्स प्रिन्सेपच्या लिपि शोधामुळे भारतातील अन्तियोकोस आणि ग्रीक राजांच्या बरोबरच भारतातील अनेक राजांचा इतिहास कळाला. प्रिन्सेपने अफगानिस्तान मधील शिलालेखांचा देखील अभ्यास केला. शिलालेखांच्या अभ्यासावरून प्रिन्सेपने सम्राट अशोकांच्या प्रचंड राज्याची माहिती लोकांसमोर आणली. प्रिन्सेपने शिलालेखांच्या अभ्यासाचा धडाकाच लावला. दररोज 18 ते 20 तास त्याचे संशोधन चाले.

                अतिपरिश्रमामुळे प्रिन्सेपला प्रचंड डोकेदुखीचा त्रास होऊ लागला. हवाबदल व उपचारासाठी त्याला इंग्लंडला हलविण्यात आले, मात्र 22 एप्रिल 1840 साली उण्यापुऱ्या 41व्या वर्षी प्रिन्सेपचे निधन झाले. भारतीय शिलालेखातील सर्वात प्राचीन असलेली धम्मलिपि व खरोष्टी लिपि यांचा शोध आणि त्यातून सम्राट अशोक व त्यांचे कार्य जगासमोर येऊ शकले ते केवळ जेम्स प्रिन्सेप मुळेच. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण अर्थात A.S.I ची स्थापनेचे बीज प्रिन्सेपने रोवले होते. प्रिन्सेपने केलेल्या कामाची दाखल घेत कलकत्तावासियांनी त्याच्या स्मरणार्थ हुगली नदीकाठी “प्रिन्सेप घाट” बांधला तर इंग्लंड मधे सरकारच्या वतीने त्याच्या नावाचे मेडल बनविले. जॉन रोयाले नावाच्या जीवशास्त्रज्ञाने एका झाडाच्या प्रजातीचे नाव “प्रीन्सेपिया” ठेवले. एशियाटिक सोसायटीने त्याचा अर्धपुतळा बसविला. 1771 मधे पहिल्यांदा आलेल्या जॉन प्रिन्सेप नंतर प्रिन्सेप घराण्याच्या चार पिढ्यांनी भारतात वास्तव्य केले.  नुकतेच जेम्स प्रिन्सेपच्या चवथ्या पिढीतील मुलाने जेम्स प्रिन्सेपचे जपून ठेवलेले सारे हस्तलिखितांचे पेटारे अभ्यासासाठी भारत सरकारच्या हवाली केले. भारतातील सर्वात प्राचीन असलेली सम्राट अशोकांची “धम्मलिपि”चा शोध व भारतीय शिलालेखांचे गूढ उकलल्या बद्दल जेम्स प्रिन्सेपला आदरपूर्वक नमन.

अतुल मुरलीधर भोसेकर, संयुक्त लेणीं परिषद, ९५४५२७७४१०

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्यूज ), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)