अपघातात कायदा ठार....! नियम धाब्यावर बसवले (Law killed in an accident....! The rules were laid down)

Vidyanshnewslive
By -
0
अपघातात कायदा ठार....! नियम धाब्यावर बसवले (Law killed in an accident....! The rules were laid down)


पुणे :- रविवार दिनांक १९ मे च्या पहाटे २ च्या सुमारास पुण्यातील येरवडा परिसरात झालेल्या एका भीषण अपघातात मोटरबाईकवरून जाणाऱ्या एक तरुण आणि एका तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघाताचे कारण ठरलेल्या कार चालक हा अल्पवयीन होता, आणि तो मद्यप्राशन करून होता अशी माहिती आहे. एकूणच अपघाताबाबत जी माहिती पुढे येते आहे, ती बघता आपल्या देशात असलेल्या कायद्याचा धाक शिल्लक राहिला आहे किंवा नाही अशी शंका घेण्यास निश्चित वाव आहे. मध्यरात्री २ च्या सुमारास २ कोटी रुपयाच्या महागड्या कारमध्ये येणाऱ्या या अल्पवयीन कारचालकाने हा अपघात केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार कारचालकाचे वय १७ वर्ष ८ महिने इतके आहे. आपल्या देशातील विद्यमान कायद्यानुसार स्वयंचलित चारचाकी वाहन चालवण्यासाठी परवाना आवश्यक असतो. हा परवाना घेण्यासाठी वयाची १८ वर्ष पूर्ण केलेली असावी लागतात. हे बघता सदर अल्पवयीन कार चालका कडे कोणताही परवाना नव्हता हे स्पष्ट दिसते आहे. अशावेळी या कारचालकाला कार चालवू देणारे कारचे मालक हे देखील तितकेच दोषी ठरतात. मिळालेल्या माहितीनुसार अपघातग्रस्त कार ही पुण्यातील प्रसिद्ध बिल्डर विशाल अग्रवाल यांची आहे. आणि कार चालवणारा त्यांचा अल्पवयीन हा विशाल अग्रवाल यांचा मुलगाच होता. त्यामुळे अल्पवयीन मुलाला परवाना नसताना कार चालवायला देणारे पालक हे देखील या प्रकरणात तितकेच दोषी आहेत. ज्या कारने अपघात झाला त्या कारला दोन्ही बाजूंनी नंबर प्लेट्स नव्हत्या अशी माहिती मिळाली आहे. हे बघता त्या कारची नोंदणी प्रादेशिक परिवहन कार्यालयात झालीच नसावी असा निष्कर्ष काढता येतो. बरेचदा नवीन वाहन घेतल्यावर त्यांची नोंदणी होईपर्यंत देखील वाहन खरेदीदाराला दिले जाते, मात्र अशावेळी अस्थाई नोंदणी क्रमांक वाहनाला दिला जातो, आणि असा क्रमांक वाहनावर लिहिणे गरजेचे असते. सदर प्रकरणात तसेही झालेले दिसत नाही. म्हणजेच हे वाहन देखील बेकायदेशीररित्या रस्त्यावर आणलेले असू शकते. सदर कारचालक हा मद्य प्राशन करून होता अशी माहिती मिळते आहे. हा कारचालक आणि त्याचे दोन मित्र रात्री उशिरापर्यंत कोणत्यातरी बार मध्ये किंवा पब मध्ये बसून मद्य प्राशन करीत होते आणि रात्री उशिरा मद्य प्राशन करून ते वाहन चालवत निघाले असेही बोलले जाते. त्यामुळेच रात्री दोन वाजता हा अपघात घडला. सध्याच्या कायद्यानुसार रात्री १२ नंतर हॉटेल बार किंवा पब चालू ठेवण्यास परवानगी नाही. तरीही रात्री उशिरापर्यंत सदर बार किंवा पब कसे चालू राहिले हा देखील प्रश्न इथे उपस्थित होतो. विद्यमान कायद्यानुसार कोणत्याही बार किंवा पब मध्ये ग्राहकाने मद्य मागीतल्यास त्याच्याकडे मद्य बाळगण्याचा किंवा प्राशन करण्याचा परवाना आहे किंवा नाही हे तपासण्याचे आणि नसल्यास मध्य नाकारण्याचे अधिकार बारमालाकाला आहेत. अल्पवयींनांना मद्य देऊ नये अशाही स्पष्ट सूचना आहेत. तरीही या अल्पवयीनाला मद्य कसे दिले गेले हा देखील प्रश्न इथे उपस्थित होतो. 
अपघात घडताच सदर कारचालकाने तिथून कारसकट पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र घटनास्थळी जमलेल्या नागरिकांनी त्याला चांगला चोप दिला आणि पोलिसांच्या हवाली केले. पोलिसांनी त्याला अटक करून लगेचच न्यायालयासमोर उभे केले. सदर कारचालकावर पोलिसांनी ३०२ कलमान्वये गुन्हा दाखल केलेला असल्यामुळे त्याला बाल सुधार गृहात पाठवणे गरजेचे होते. मात्र गुन्हा घडल्याला बारा तास होण्यापूर्वीच त्याला जामीन मिळालेला आहे. या कथित अल्पवयीन आरोपीचे वडील प्रसिद्ध बिल्डर असल्यामुळे त्यांनी वकिलांची फौज उभी करून हा जामीन मिळवला असणार यात शंका नाही. मात्र त्यामुळे जनसामान्यात नाराजीची भावना निर्माण झाल्याचे बोलले जात आहे. सदर प्रकरणात अल्पवयीन आरोपीच्या पालकांनी एका राजकारणी नेत्याला हाताशी धरून प्रकरण दाबण्याचाही प्रयत्न केल्याचे बोलले जाते आहे. आरोपी कार चालवत नव्हता असे दाखवण्याचाही प्रयत्न होतो आहे अशीही माहिती मिळते.
                  सदर प्रकरणात आरोपी फक्त कारचालकच नाही तर कारचालकाचे पालक, त्याचबरोबर रात्री उशिरापर्यंत बार किंवा पब चालू ठेवणारे मालक, सदर अल्पवयीन कारचालकाला कोणताही परवाना नसताना मद्य देणारे आणि मद्यप्राशन करू देणारे बारचे मॅनेजर आणि वेटर हे देखीलस तितकेच या प्रकरणातील प्रमुख आरोपी ठरतात. यातील एकाने जरी शहाणपण दाखवले असते तर कदाचित हा अपघात टाळू शकला असता, आणि दोन निरपराधांचे प्राण वाचू शकले असते. आधी नमूद केल्याप्रमाणे आपल्या देशात प्रत्येक बाबींसाठी आवश्यक ते कायदे आहेत. स्वयंचलित वाहन चालवण्यासाठी परवाना हा आवश्यक असतो. मात्र आज किती लोक तो परवाना घेतात आणि किती विनापरवाना गाडी चालवतात याचा शोध घेतला तर भीषण वास्तव समोर येऊ शकते. १८ वर्षाचे वय होईपर्यंत परवाना दिला जात नाही. परवाना असेपर्यंत वाहन चालवता येत नाही. तरीही आज देशभरातील रस्त्यांवर कितीतरी अल्पवयीन विनापरवाना स्वयंचलित वाहने चालवताना दिसतात. अशा अल्पवयींनांना परवाना नसताना पालकांनी वाहन देणे बेकायदेशीर आहे. मात्र आम्हाला आमचे अल्पवयीन लेकरू स्कुटी किंवा कार कशी छान चालवते हे सांगण्यात अभिमान वाटतो. त्यावेळी आम्ही कायदा मोडतो आहोत हे आम्ही विसरतो. जो प्रकार वाहन चालविण्याचा आहे, तोच प्रकार मद्यप्राशन करण्याबाबतही आहे. मद्यप्राशन हे कायद्याने आणि सामाजिक संकेतानुसार निशिद्धच मानले गेले आहे. मात्र आज २१ व्या शतकात मद्य प्राशन हे प्रतिष्ठेचे लक्षण मानले गेले आहे. सुमारे ७०-७५ वर्षांपूर्वी बाहेरून मद्यप्राशन करून घरी आल्यावर तोंड लपवून घरात यावे लागत असे. आज परिस्थिती बदलली आहे. आज पालक मुलांसमोर घरातच मद्य प्राशन करतात आणि मुलांना बर्फ आणि चुना आणायला सांगतात.कित्येक ठिकाणी वडील आणि मुलगा सोबतच चिअर्स करण्यासाठी एकत्र बसतात. यावेळी आम्ही कायदा मोडतो आहोत आणि सामाजिक संकेतही पायदळी तुडवतो आहोत याचे आम्हाला भान नसते. हॉटेल, बियर बार, पब हे किती वेळ चालू ठेवावे यासाठी काही नियम आहेत. रात्री १२ नंतर हे चालू ठेवता येत नाहीत. मात्र हे नियम धाब्यावर बसवून आज देशातील सर्वच महानगरांमध्ये रात्री उशिरापर्यंत असे बार आणि पब सुरू असतात. महामार्गांवर तर हे हमखास दिसते, आणि याला पायबंद घालावा अशी अपेक्षा ज्यांच्याकडून ठेवतो ते पोलीस याकडे सर्रास दुर्लक्ष करतात. मिळालेल्या माहितीनुसार या मालकांकडून त्यांना नियमित हप्ताही मिळत असतो. महाराष्ट्रात उद्धव ठाकरे सरकार सत्तेत असताना एका पोलीस अधिकाऱ्याला मुंबईतल्या बारमालकांकडून दरमहा १०० कोटी रुपये वसूल करून आणण्याचे टार्गेट देण्यात आले होते असा आरोप झाला होता. त्यामुळे तत्कालीन गृहमंत्र्यांना पायउतार व्हावे लागले होते आणि वर्षभर तुरुंगातही बसावे लागले होते. इतके सर्व होऊनही. आजही उशिरापर्यंत बार आणि पब चालू राहतात. ही कायद्याची पायमल्ली नाही काय? 
             हे सर्व मुद्दे लक्षात घेतले तर आपल्या देशात कायद्याचा काहीही धाक राहिलेला नाही हा निष्कर्ष निश्चित काढता येतो. कायदा काहीही असो, तुमच्या जवळचा पैसा, तुमची समाजातील प्रतिष्ठा, आणि सत्तेशी तुमचे असलेले संबंध यांच्या जोरावर तुम्ही कायदा केव्हाही आणि कसाही धाब्यावर बसवू शकता हे इथे स्पष्ट दिसते आहे. महाराष्ट्रातील एक थोर विचारवंत आणि माजी न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी यांना एकदा नागपुरात एका मित्राने विचारले की नागपुरात तुमची प्रतिष्ठा किती आहे? ज्या काळात हा प्रश्न विचारला त्या काळात नागपुरात रात्रीच्या वेळी सायकलने फिरायचे असेल तर सायकलला दिवा किंवा टॉर्च लावून लावावा लागत असे. असा दिवा नसलेली सायकल घेऊन निघालात तर पोलीस तुम्हाला चालन करत असत. त्या काळात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना धर्माधिकारी म्हणाले होते की नागपुरात रात्रभर मी कुठेही सायकलला दिवा न लावता फिरलो तरी कोणताही पोलीस मला पकडणार नाही, आणि पकडले तरी त्याच्या वरच्या साहेबाला सांगून मी निर्दोष सुटेन. हा किस्सा सांगून धर्माधिकारी सांगायचे की आपल्या देशात कायदा पाळण्यापेक्षा तुम्ही कायदा किती मोडू शकता यावर तुमची प्रतिष्ठा ठरत असते हे या देशाचे दुर्दैवच म्हणावे लागेल. न्यायमूर्ती धर्माधिकारींनी अनेक भाषणांमध्ये हा किस्सा सांगितलेला आहे. खाजगी बैठकीतही बोलताना ते सांगायचे की आपण कायदा पाळायला आणि कायद्याचा सन्मान करायला कधी शिकायचे हे ठरवण्याची वेळ आली आहे. पुण्यात मध्यरात्री घडलेला हा अपघात आणि त्या संदर्भात आलेल्या बातम्या आणि कानावर आलेल्या चर्चा हे सर्व लक्षात घेतले तर न्यायमूर्ती धर्माधिकारींच्या या व्यथेतून त्यांनी व्यक्त केलेली खंत आजही सुजाण नागरिकांना जाणवू शकते. आज आपल्या देशात कायदे आहेत, पण त्याला पळवाटही आहेत. कायदा काहीही असला तरी पैशाच्या जोरावर आणि सत्तेच्या मदतीने काहीही घडवून आणता येते. सामान्य माणसाला कायद्याचा धाक वाटायला हवा. मात्र आज कोणालाच तो धाक वाटत नाही. कायदा मोडण्यात सर्वसामान्य नागरिकांना भूषण वाटते. ही परिस्थिती कितपत भूषणावह म्हणता येईल ? आपल्या देशाला २०४७ पर्यंत जागतिक महासत्ता बनवण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा संकल्प आहे. हा संकल्प जर सिद्ध करायचा असेल तर सर्वप्रथम या देशात कायद्याचा सन्मान करणारा नागरीक घडवणे ही प्राथमिकता ठेवावी लागेल. आज निवडणुकीच्या गोंधळात सर्वच राजकीय पक्ष आणि राजकीय नेते एकमेकांवर संविधान संपवण्याचा आरोप करत असतात. मात्र त्यांच्याच पक्षातले किती नेते कायद्याने वागतात याचा कधीतरी शोध ते घेतात का याचाही विचार व्हायला हवा. हा देश जर खरोखरी जागतिक महासत्ता बनवायचा असेल तर इथे जन्माला येणारा प्रत्येक माणूस हा कायद्याने वागणाराच असायला हवा. ही काळजी घेतली गेली पाहिजे. तसे झाले तरच आम्ही प्रगती करू शकू. अन्यथा हा देश जागतिक महासत्ता न बनता अराजकाकडे वाटचाल करेल हा धोका लक्षात घ्यायला हवा. पुण्यात झालेल्या अपघाताच्या घपनाक्रमातूनहाच बोध येऊ शकतो. 

अतिथी मार्गदर्शक :- अविनाश पाठक
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)