1 जून पासून ड्रायविंग लायसन्स चे नियम बदलणार, आता RTO मध्ये जावून परिक्षा देण्याची सक्ती नसणार (Driving license rules to change from June 1, now there will be no compulsion to go to RTO)
चंद्रपूर :- आपल्या भारतात ड्रायव्हिंग लायसन्स म्हणजे वाहतूक परवाना मिळवण्याची प्रक्रिया अतिशय क्लिष्ट आणि कंटाळवाणी आहे. वाहतूक परवाना मिळविण्यासाठी सुरुवातीला अर्जदाराला एक परवाना काढण्यासाठी विविध एजन्सीना भेट द्यावी लागते, अनेक फॉर्म्स भरावे लागतात. या सर्व गोष्टींचा विचार करून, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने भारतातील सध्याच्या वाहतूक नियमांमध्ये महत्त्वपूर्ण बदल करण्याचा निर्णय घेतलेला आहे. ही बाब नागरिकांची सुरक्षा आणि परवाना मिळविण्याची प्रक्रिया सुलभ करण्याच्या दृष्टीने फायदेशीर ठरू शकते. हे बदल १ जूनपासून होणार आहेत. नेमक्या गोणत्या गोष्टींमध्ये बदल करण्यात येणार आहेत ते पाहू.
1) सध्या चालकांना वाहतूक परवाना मिळविण्यासाठी वैयक्तिक प्रादेशिक परिवहन कार्यालयांमध्ये (आरटीओ) जाऊन परीक्षा द्यावी लागते. मात्र, बदल करण्यात येणाऱ्या नियमांनुसार आता अर्जदार हे त्यांच्या पसंतीच्या आणि सर्वात जवळ असणाऱ्या केंद्रावर जाऊन ड्रायव्हिंग चाचणी देऊ शकतात. खासगी एजन्सीकडे ड्रायव्हिंग परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या परीक्षार्थींना देण्यासाठी सरकारकडून प्रमाणपत्रे देण्यात येतील; ज्याच्या मदतीने ते ड्रायव्हिंग परीक्षेचे व्यवस्थापन करू शकतील.
2). वैध परवान्याशिवाय वाहन चालविणाऱ्यांसाठी आता अधिक कडक कारवाई करण्यात येणार आहे. अशा चालकांना आता तब्बल दोन हजार रुपयांपर्यंत दंड भरावा लागू शकतो. तसेच, अल्पवयीन चालक पकडला गेल्यास २५ हजार रुपयांचा दंड आणि त्यांच्या पालकांवर कारवाई केली जाऊ शकते. तसेच त्या वाहनाचे नोंदणी प्रमाणपत्र रद्द करण्यात येऊ शकते.
3) परवाना मिळविण्यासाठी आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांमध्येदेखील सुलभता आणण्यासाठी नियम करण्यात आले आहेत. त्यासाठी अर्जदाराला कोणत्या पद्धतीचा परवाना हवा आहे आणि त्यासाठी त्याला कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता आहे, याबद्दलची यादी आधीच अर्जदाराला देण्यात येईल.
4) रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने साधारण नऊ हजार कालबाह्य झालेली सरकारी वाहने काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, इतर वाहनांच्या उत्सर्जनासंबंधीचा तपास करून, आपले महामार्ग पर्यावरणास अधिक अनुकूल करण्याकडे भर देण्यात येणार आहे.
5) असे बदल करण्यात आले असले तरीही ड्रायव्हिंग लायसन्ससाठी अर्ज सबमिट करण्याच्या प्रक्रियेत मात्र कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत. https://parivahan.gov.in/ या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाइटच्या मदतीने अर्जदार परवान्यासाठी अर्ज करू शकतात.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या