अबब ! संकट आले की झाडेही रडतात, पाणीही मागतात, इस्रायलच्या तेल अविव विद्यापीठातील संशोधकाचा दावा (Abba ! When there is a crisis, even trees cry and ask for water, claims a researcher from Israel's Tel Aviv University.)

Vidyanshnewslive
By -
0

अबब ! संकट आले की झाडेही रडतात, पाणीही मागतात, इस्रायलच्या तेल अविव विद्यापीठातील संशोधकाचा दावा (Abba ! When there is a crisis, even trees cry and ask for water, claims a researcher from Israel's Tel Aviv University.)

वृत्तसेवा :- तहान लागली की झाडेही पाण्यासाठी टाहो  फोडतात, संकट ओढवले की रडतात, मदत मागतात… थोर भारतीय शास्त्रज्ञ जगदीशचंद्र बोस यांनी शंभर वर्षांपूर्वी लावलेल्या शोधावर आता इस्रायलच्या तेल अवीव विद्यापीठाच्या संशोधकांनी शिक्कामोर्तब केले आहे. झाडे आवाज काढतात हा तेल अवीव विद्यापीठाच्या संशोधकांनी लावलेला शोध सेल या प्रतिष्ठित सायंटिफिक जर्नलमध्ये गेल्या महिन्यात प्रसिद्ध झाला आहे. स्कूल ऑफ प्लांट सायन्सेस ऑफ फूड सिक्युरिटीच्या प्राध्यापिका लिलाच हेडनी यांच्या नेतृत्वात संशोधकांनी हा शोध लावला आहे. झाडे आवाज कसे काढतात याचे तंत्रज्ञान आणि त्याचा इतर सजीवांवर काय परिणाम होतो, याचाही अभ्यास हे संशोधक आता करणार आहेत. श्रीनिवासा रामानुजन, सी. व्ही. रमण किंवा सत्येंद्रनाथ बोस यांच्या किती तरी आधी जगदीशचंद्र बोस यांनी आधुनिक विज्ञानावर आपली छाप सोडली. जगदीशचंद्र बोस यांनी सुमारे शंभर वर्षांपूर्वी झाडांच्या नर्व्ह सिस्टीमविषयी संशोधन केले. वायरलेस ट्रान्समिशन ऑफ सिग्नल आणि झाडांचे मानसशास्त्र या दोन गोष्टींसाठी बोस ओळखले जातात. याचा अर्थ मुंबई मेट्रोसाठी एका रात्रीत 200 झाडे आरेच्या जंगलात कापून काढण्यात आली तेव्हा ती झाडे किती रडली, ओरडली असतील आणि त्यांचा आक्रोश कुणाच्याही कानी पोहोचला नाही, या आठवणीने कुणीही वृक्षप्रेमी आज व्याकूळ होऊन त्या झाडांसाठी दोन अश्रू ढाळल्याशिवाय राहणार नाही. केवळ झाडेच नव्हे तर जीव नसलेले घटकही प्रतिसाद देतात, असा त्यांचा दावा होता. झाडांबाबत त्यांनी लावलेले शोध तेव्हाच्या समाजात सहज पचणारे नव्हते. 1977 चे नोबेल पारितोषिक विजेते सर नेव्हल मॉट यांनी सांगितले होते की, बोस त्यांच्या काळापासून 60 वर्षे पुढे होते. बोस यांनी पी टाईप आणि एन टाईप सेमी कंडक्टरची फार पूर्वीच कल्पना केली होती. तेल अवीव विद्यापीठाच्या संशोधकांनी पहिल्यांदाच झाडांनी दिलेला अल्ट्रॉसॉनिक आवाज रेकॉर्ड केला. तणावात किंवा संकटात झाडे विशिष्ट प्रकारचा आवाज काढतात. वटवाघूळ, उंदीर आणि काही किडे यांच्यात हा झाडांचा आवाज पकडण्याची क्षमता असण्याची शक्यताही त्यांनी मांडली आहे. बाहेरील आवाजाच्या वातावरणातही वेगवेगळ्या प्रकारच्या झाडांनी काढलेला आवाज मशिन लर्निंग अल्गोरिदमच्या मदतीने पकडण्यात या संशोधकांना यश आले.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्यूज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)