Advertisement

Responsive Advertisement

मला बुद्ध कधी भेटले ? - अनिल अवचट (When Did I Meet the Buddha? – Anil Awchat)

मला बुद्ध कधी भेटले ? - अनिल अवचट (When Did I Meet the Buddha? – Anil Awchat)

बुध्द जयंती विशेष 

वृत्तसेवा :- तरुणपणी बुद्धाविषयी काही काही कानावर पडायचं. तो पुनर्जन्म मानत नाही, तो जाती-वर्णभेदाच्या विरुद्ध आहे... असं काही. त्यामुळे आम्हा चळवळीतल्या मुलांना तो जवळचा वाटायचा. शिवाय डॉ. बाबासाहेबांनी तो धर्म स्वीकारला होता. बाबासाहेब म्हणजे आमचे हीरो. त्यामुळे बुद्ध आपल्या बाजूचा असं वाटायचं. पण म्हणजे तो कोण, तो नक्की काय म्हणत होता हे फारसं माहीत नव्हतं. पण अलीकडे त्याचं एक वाक्य वाचनात आलं. तीन शब्दांचं वाक्य. एकदम चमकलोच जसा. ते वाक्य म्हणजे, 'अत्त दीप भव.' म्हणजे, तुझा तूच प्रकाश हो. कसं व्हायचं असतं आपला प्रकाश आपणच? त्या प्रकाशात काही पाहायचं, की त्यापेक्षा आपणच प्रकाश व्हायचं? स्वतः उजळून निघायचं? पुढे बुद्धावर वाचायचा सपाटाच लावला. त्यानंतर मग 'अत्त दीप भव'चं विस्तृत रूप सापडत गेलं. 'तुम्हीच तुमचा दिवा व्हा. तुम्हीच स्वतःचा आधार व्हा. आत्मनिर्भर व्हा. दुसऱ्या कुणाचा आधार घेऊ नका. दुसऱ्या कुणाचे आश्रित होऊ नका. फक्त सत्याचा आश्रय घ्या,' हे बुद्धाचं म्हणणं समजत गेलं. मी खूष झालो. कारण हा माणूस माझ्या धर्माला किंवा मला माना, माझ्या धर्माचं आचरण करा, असं म्हणतच नाही. उलट, 'तुम्हीच तुमचा आधार व्हा' म्हणतोय. आधार इतर कुणाचा नाही, फक्त सत्याचा घ्या, म्हणतोय. हे अजब आहे. मी पूर्वी बुद्धाचं चरित्र वाचलेलं होतं. घरातून कसा बाहेर पडला; सर्व प्रकारचे संन्यास, योग मार्ग, हठयोग वगैरे करून पाहिलं पण त्याला शांती मिळाली नाही; मग त्याला बोधीवृक्षाखाली ज्ञान प्राप्त झालं, वगैरे. पण ते ज्ञान काय हे कुठे माहीत होतं? आता वाचत होतो आणि चकित होत होतो.
       वाचता वाचता बुद्धाने त्याच्या शिष्यांशी साधलेला संवाद वाचायला मिळाला आणि झटक्यात बुद्ध काय सांगू पाहतो आहे याचा अंदाज आला. बुद्ध शिष्यांना सांगतोय, 'तुम्ही जे काही ऐकलं आहे त्यावर विश्वास ठेवू नका. कित्येक पिढ्या, परंपरा तुमच्यापर्यंत चालत आलेल्या आहेत म्हणून त्यांच्यावरही विश्वास ठेवू नका. अनेक लोकांनी सांगितलं आहे, म्हटलं आहे किंवा त्यांच्या ऐकिवात आहे म्हणून कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवू नका. एखाद्या वृद्ध ऋषीचं लिखित वचन तुमच्यासमोर ठेवलं आहे म्हणून ते मान्य करू नका. केवळ अंदाजावर विश्वास ठेवू नका. तुमचे गुरू आणि वडील माणसं यांनी काही सांगितलं आहे ते खरं समजून स्वीकारू नका. स्वतः निरीक्षण व विश्लेषण केल्यावर जेव्हा तुमच्या बुद्धीला पटेल आणि सर्वांच्या हिताला पोषक व संवर्धक ठरेल तेव्हाच त्याचा स्वीकार करा आणि तंतोतंत त्याप्रमाणे जगा. ते आचरणात आणा.' 'स्वतः 'निरीक्षण आणि विश्लेषण' करायचं म्हणजे हा बुद्धिप्रामाण्यवादाचा पायाच की. बुद्ध हे कधी म्हणालाय? तर अडीच हजार वर्षांपूर्वी! जेव्हा ख्रिस्त नव्हता, महंमद नव्हता, कुठलेही वैज्ञानिक नव्हते. यज्ञयाग संस्कृती जोरात होती. यज्ञात बैल वगैरे पशू बळी दिले जात होते. जेव्हा जाती-वर्णव्यवस्थेची समाजावर घट्ट पकड होती तो हा काळ. पुढे हजार वर्षांनी आधुनिक विज्ञान आलं. संशोधकांनी निर्भीडपणे, चर्चला न जुमानता शोध, सिद्धांत मांडले; त्यासाठी शिक्षा भोगल्या, मृत्यू पत्करले. त्याला वैचारिक आधार दिलाय बुद्धाने, अडीच हजार वर्षांपूर्वी. आहात कुठे! त्या काळात 'बाबा वाक्यम् प्रमाणम्' या सूत्राची सद्दी होती. गुरूचं ऐकायचं. 'गुरुबिन कछु नाही' हे प्रचलित वेदांचं, धर्मग्रंथांचं प्रामाण्य. त्यात असेल ते आणि तेच खरं. त्या काळात बुद्ध निर्भीडपणे सांगतोय, ते प्रमाण मानू नका, स्वतःचं डोकं चालवा. मी स्वतः म्हणतोय म्हणूनही मान्य करू नका, असंही सांगतोय तो. पुढे वाचनात आलं, बुद्धाने शिष्यांना त्याची तपासणी करण्याचं सुचवलं. कोणते प्रश्न विचारायचे त्याची यादीही सुचवली. इतकं निर्भिड, पारदर्शी व्यक्तिमत्त्व. आणि नुसते निष्कर्ष काढून बौद्धिक आनंद घेणं त्याला मान्य नाही. त्या निष्कर्षांप्रमाणे तंतोतंत वागा, असं तो म्हणतोय. इथे शिष्यांची खरी परीक्षा होती. एकवेळ भोवतीचे, परंपरेचे प्रभाव नाकारणं, विश्लेषण करून निष्कर्ष काढणं सोपं, पण त्याप्रमाणे वागणं? अवघडच!
       आपल्याकडे भ्रष्टाचारी माणसं पुण्य कमावण्यासाठी काय काय करतात! यज्ञ करतात, पूजाअर्चा करतात, थाटामाटाने भोजनावळी घालतात, भजन-कीर्तन करतात; पण भ्रष्टाचार चुकीचा आहे, ते पाप आहे, आपण तसं वागता कामा नये असं चुकूनही त्यांच्या मनात येत नाही. बुद्ध म्हणतो, 'निष्कर्षावर थांबू नका. त्याप्रमाणे वागा.' ईश्वरप्राप्तीसाठी धर्मपालन, असं सर्वसाधारण समीकरण मानलं जातं; पण बुद्धाच्या तत्त्वज्ञानात हे बसत नाही. एकदा बुद्धाला त्याच्या शिष्याने विचारलं, "ईश्वर आहे काय?" बुद्धाने उत्तर दिलं, "नाही". परत शिष्याने विचारलं, "आत्मा आहे काय? आणि तो अविनाशी असतो काय?" तरी बुद्ध गप्प. शिष्य म्हणाला, "तुम्ही उत्तर का देत नाही?" यावर बुद्ध म्हणाला, "ईश्वर आहे की नाही, आत्मा असतो की नाही याविषयी विचार करायला माझ्यापाशी वेळ नाही. मला मानवी दुःखाचं मूळ शोधायचं आहे, त्यावर उपाय शोधायचा आहे." याबाबत त्याचे विचार किती स्वच्छ आणि स्पष्ट आहेत ! ईश्वर एक की अनेक, तो अवतार कधी घेतो, त्याचं स्वरूप कसं आहे, तो मनुष्यदेहधारी आहे की अमूर्त आहे, तो स्वर्गात राहतो की पृथ्वीवर... या चर्चेत बुद्धाला रस नाही. मेल्यानंतर काय होतं, पुनर्जन्म असतो का, काय केलं असता स्वर्गात प्रवेश मिळेल, तुमचा मृतदेह जाळावा की पुरावा, किती काळाने थडग्यातून देव तुम्हाला उठवणार आहे... कशाचीही चिंता तो करत नाही. मिळेल तो दिवस आपला, इतकंच तो जाणतो. मी कॉलेजात असतानाची गोष्ट. कसा कोण जाणे, मी एका स्वामीजींचा अनुग्रह घेतला होता. रोज रात्री ध्यान करायचो. आमच्या बरोबरचे काही शिष्य स्वामीजींचे लाडके होते; पण स्वामीजींचं शिष्यत्व पत्करूनही माणूस म्हणून त्यांच्यात काही फरक पडला नव्हता. व्यापारी होते, ते भेसळ करायचे. कंपनी अधिकारी नकोशा कामगाराविरुद्ध केस उभी करून त्याला काढून टाकायचे. मग मला प्रश्न पडायचा, या आध्यात्मिक प्रगतीचा काय उपयोग? मला चांगला माणूस व्हायचं होतं. मी रात्री बसून दिवसभरातले दोष हुडकायचो. दुसऱ्या दिवशी ते सुधारण्याचा प्रयत्न करायचो. त्या त्या माणसांची क्षमाही मागायचो. कुणी विचारायचं, "आस्तिक की नास्तिक?" मी म्हणायचो, "मला त्यातलं कळत नाही; पण एवढं कळतं, की माझ्यात अजून भरपूर दोष आहेत, ते मला दूर करायचे आहेत." ही भूमिका माझ्या नकळत बुद्धाच्या जवळ जाणारी होती. जे करायचं (सुधारणा वगैरे) ते करण्याची मला ओढ वाटू लागली. वेळेच्या बाबतीत परत बुद्ध मदतीला आला. त्याचं एक वाक्य पाहा: 'ज्योत जळते तेव्हा ती प्रत्येक क्षणी नवीच असते.' किती अप्रतिम उपमा आहे ही। आधीचा कण जळून गेलेला, नंतरचा कण यायचाय, अशा अवस्थेत जगायचं. सुनंदाला कॅन्सर झाला तेव्हा ती तर म्हणायची, हा क्षण माझा आहे, तो मी छान जगणार आहे. 'मुक्तांगण' मध्येही व्यसनी मित्रांना हेच सांगितलं जातं, आजवर झालं ते होऊन गेलं. भूतकाळाचं ओझं बाळगू नका. भविष्यकाळ अजून यायचाय. त्याची चिंता करू नका. आजचा दिवस आपला माना. बुद्धाचं एक वाक्य आहे, 'जो ईश्वर आहे का असं विचारतो तो चूक करतो आणि त्याला उत्तर देतो, तोही चूकच करत असतो.' आपले तुकोबा म्हणतात, 'तो लटिक्यामाजी भला। म्हणे देव म्यां पाहिला' (मी देव पाहिला असं म्हणतो तो खोट्यातला खोटा). बुद्धाची भूमिका याबाबत अगदी कुठलाही आडपडदा नसलेली, स्वच्छ आहे.
           बोधीवृक्षाखाली बुद्धाला काय ज्ञान झालं? 'जग हे दुःखाने भरलेलं आहे' हे एक विधान. 'दुःख' याचा अर्थ 'समस्या' असा मी घेतो. माणसाला आयुष्यभर नाना त-हेच्या समस्या असतात. चिंता, काळजीने त्याचं मन व्यापलेलं असतं. आणि त्या दुःखाचं मूळ तृष्णा आहे. इथे 'तृष्णा' याचा अर्थ मी नुसता 'तहान' असा घेत नाही, तर 'वखवख' असा घेतो. सतत असंतुष्ट अवस्था म्हणजे तृष्णा. तृष्णेमागोमाग क्रोध, लोभ, हेवा, मत्सर अशी अवगुणांची रांगच येते. बुद्धाने म्हटलं आहे, 'क्षमेने क्रोधाला जिंकावं. असाधूला साधुत्वाने जिंकावं आणि लबाडाला सत्याने जिंकावं. ज्यांच्याकडे आपल्यापेक्षा काही विशेष आहे, त्यांचा हेवा न करता, ज्यांच्याकडे आपल्यापेक्षा काही कमी आहे, त्यांचा अवमान न करता आणि जे आपल्या समान आहेत त्यांच्याशी स्पर्धा न करता जगलास तर तू जगामध्ये श्रेष्ठत्वाकडे गेलास.' तर स्वभावदोषांविषयी सांगत होतो... यावर बुद्धाची काही वाक्यं माझी खास आवडती, 'युद्धात हजारो माणसांना जिंकणाऱ्या योद्ध्यापेक्षा स्वतःला जिंकणाऱ्यास मी खरा योद्धा समजतो.' स्वतःला जिंकणं म्हणजे काय ? स्वतःच्या मनातल्या अनाठायी मोहावर विजय मिळवणं.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या