चंद्रपूर :- २० वर्षांपूर्वीचा अनुभव म्हणजे केवळ प्राणीगणना नव्हती, तर ते एक 'निसर्गव्रत' होते. बंडू धोतरे यांच्या भावना आणि आठवणींना उजाळा देणारा एक विशेष लेख… आज बुद्ध पौर्णिमा. आकाशात पूर्ण चंद्र आपल्या सोळा कळांनी डवरलेला असेल. पण आजच्या या लख्ख प्रकाशातही मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी ताडोबाच्या त्या जुन्या, घनदाट काळोखातील आठवणी गर्दी करत आहेत. आज प्राणीगणनेसाठी ऑनलाईन बुकिंग करावे लागते, पैसे मोजावे लागतात; पण दोन दशकांपूर्वीचा काळ वेगळा होता. तेव्हा हे 'पर्यटन' नव्हते, तर ती एक चळवळ होती. निसर्गाशी एकरूप होण्याची पर्वणी आमच्यासारख्या निसर्गवेड्या कार्यकर्त्यांसाठी बुद्ध पौर्णिमा म्हणजे एक मोठी पर्वणी असायची. ही केवळ प्राण्यांची संख्या मोजण्याची रात्र नव्हती, तर ती निसर्गासोबत 'निसर्ग' होण्याची रात्र होती. मचाणावर बसून चंद्राच्या शीतल प्रकाशात, झाडांच्या सावल्यांशी खेळत तासनतास डोळ्यात तेल टाकून पाणवठ्याकडे लक्ष ठेवणे, यात जे 'थ्रिल' होते ते आजच्या कोणत्याही सफारीत नाही. रात्रीची ती किर्र शांतता, मधूनच होणारी किड्यांची किरकिर आणि अचानक एखाद्या चितळ किंवा सांबराचा आलेला 'अलर्ट कॉल'! तो कॉल ऐकताच अंगावर सरसरून काटा यायचा. काळजाची धडधड वाढायची. "आता वाघ येणार..." या कल्पनेनेच डोळे पाणवठ्याकडे खिळून राहायचे. कधी तो वाघ दर्शन द्यायचा, तर कधी २०० मीटर पलीकडच्या नाल्यातून पाणी पिऊन शांतपणे निघून जायचा. कारण मे महिना सुरू झाला तरी जंगलातील नाल्यात काही ठिकाणी पाणी राहत होते, त्यातही पाणी प्यायला वन्यप्राणी जात असे, हा खेळ असाच चालायचा, यातून सहजीवन काय असते, हे त्या शांत रात्री आम्हाला ताडोबाने शिकवले. मचाण, वादळ आणि साहसी रोमांच कधीकधी निसर्ग आपली परीक्षा घ्यायचा. बुद्ध पौर्णिमेच्या रात्री अचानक वारा सुटायचा, ढग यायचे आणि पाहता पाहता चंद्रप्रकाश गायब व्हायचा. त्या किर्र अंधारात मचाण वाऱ्यासंगे डोलताना काळजाचा ठोका चुकायचा. पण विभागाने दिलेला सोबती स्थानिक गावकरी मित्राचा धीर आणि प्राणिगणना करीता येण्याचे धाडस यामुळे भीतीवर मात व्हायची. रात्रीच्या वेळी मचाणवरील सोबतीच्या डब्यातील त्या घरच्या गावाची चव... तो आनंद आजच्या महागड्या हॉटेल्समध्ये कुठे? रात्र सरू लागली की जेवणाची वेळ व्हायची आणि खऱ्या अर्थाने गावचा अस्सल स्वाद चाखण्याची मजा सुरू व्हायची. माझ्यासोबत असलेला तो स्थानिक गावकरी सुरुवातीला आपला डबा उघडायला प्रचंड लाजायचा. शहरात राहणाऱ्या माणसाला आपली साधी चव आवडेल की नाही, या शंकेपोटी तो आधी "नको, नको" म्हणायचा किंवा "तुम्हीच करा जेवण" म्हणून नकार द्यायचा. पण त्याला प्रेमाने राजी करून, दोन्ही डबे एकत्र उघडून सोबतीने जेवण्याचे सुख काही वेगळेच होते. किर्रर्र जंगलात, विजेरीच्या (टॉर्चच्या) त्या धूसर आणि हलक्या प्रकाशात हातावर घेतलेली ती चुलिवरची भाकरी, खमंग ठेचा आणि सोबतीला फोडलेला कच्चा कांदा! तो साधा आहार त्या शांत रात्री एखाद्या राजेशाही मेजवानीपेक्षाही चविष्ट लागायचा. निसर्गाच्या कुशीत बसून केलेली ती जेवणे आणि त्यातून निर्माण झालेले ते जिव्हाळ्याचे नाते... ही प्राणीगणनेची रात्र आणि तो मातीचा स्वाद काही केल्या विस्मरणात जात नाही. जेवण आटोपले आणि जंगलात पुन्हा एकदा निसर्गाचा गूढ खेळ सुरू झाला. पोटभर जेवण झाल्यामुळे शरीरावर थोडी सुस्ती चढू लागली होती आणि डोळ्यांवर झोपेची हलकी झापड येत होती. अशातच समोरच्या पाणवठ्यावर काहीतरी घडले. तोपर्यंत आम्हाला तिथे कोणाचे अस्तित्व जाणवलेच नव्हते, कारण तो किर्र अंधार आणि अस्वलाचा तो काळाशार रंग... त्या काळ्या पाषाणासारखी ती अस्वल शांतपणे पाणी पित होती. पण अचानक तिला कसलीतरी चाहूल लागली आणि शांतता भंग पावत अस्वलाचा तो विशिष्ट 'खेक-खेक' असा आवाज जंगलात घुमला. ती अस्वल वाऱ्याच्या वेगाने तिथून पळाली. ती नेमकी कुठून आणि कशी पळाली हे समजले तेव्हा आमच्या अंगावर सरसरून काटा आला; कारण ती चक्क आमच्या मचाणाखालूनच धावत गेली होती!
खरे तर, ती अस्वल तिथे बऱ्याच वेळापासून खालीच दबा धरून बसली होती, हे आम्हाला खूप उशिरा उमजले. जेवणानंतर पाणी पिण्यासाठी जेव्हा मी ग्लास विसळून पाणी खाली फेकले, तेव्हा त्या पाण्याच्या थेंबांनी तिचा 'एकांत' भंग पावाला असावा आणि ती दचकून तिथून सुसाट सुटली. त्या एका घटनेने डोळ्यांतील ती सुस्ती आणि झोप क्षणात उडून गेली. तो थरार असा काही होता की, त्यानंतर पहाटेपर्यंत आमची नजर पाणवठ्यावरून ढळलीच नाही. निसर्ग आपल्या किती जवळ असतो आणि आपण त्याच्या अस्तित्वाबाबत किती अनभिज्ञ असतो, याची जाणीव त्या रात्री पुन्हा एकदा झाली. बरेचदा दिवसाच्या वेळात पक्षाची मोठी गर्दी पाणवठ्यावर असते, हातात दुर्बीण असली की विविध पक्षी निरीक्षणात मोठा आनंद असतो. या पक्षी सोबत कधी कधी तर मचाणावर आमचे स्वागत करायला एखादा 'हरणटोळ' जातीचा हिरवा साप हजर असायचा. "माझी पण मोजणी करा," असं जणू तो सांगायचा. आम्ही सर्पमित्र असल्याने आम्हाला त्याचे नवल नव्हते, पण सोबत असलेल्या नागपूरच्या पाहुण्यांची मात्र तारांबळ उडायची! मग पुढच्या वर्षीच्या 'बुकिंग'साठी आमची सोबत हवी, म्हणून तिथेच शब्द घेतले जायचे. एक प्रक्रिया, एक संस्कार ही प्राणीगणना म्हणजे कार्यकर्ते घडविण्याची एक कार्यशाळा होती. तिथे संयम शिकायला मिळायचा, तिथे शिस्त कळायची आणि निसर्गाचे गुड उलगडायचे. तृणभक्षी आणि मांसाहारी प्राणी एकाच पाणवठ्यावर ठराविक अंतराने येणे, हा निसर्गाचा नियम आणि त्यांचा संघर्षरहित प्रवास आम्हाला जीवन जगण्याची नवी दृष्टी देऊन गेला. काळाची पावले आणि गरज आज परिस्थिती बदलली आहे. सर्व काही व्यावसायिक झाले आहे. आता आमची टीम एकत्र जात नाही, कारण "निसर्ग अनुभवणे" आता व्यवहाराच्या ताकदीवर मोजले जाऊ लागले आहे. पण आजही असे वाटते की, निसर्ग संवर्धनाची ही चळवळ जिवंत ठेवण्यासाठी पुन्हा त्याच जुन्या उर्जेची गरज आहे. प्राणीगणना ही केवळ कागदावरचे आकडे नसून, ती माणसाने निसर्गाच्या कुशीत विलीन होण्याची एक प्रक्रिया आहे. ताडोबाच्या त्या मातीचा गंध, मचाणावरचा तो झुलता अनुभव आणि निसर्गाचे ते अथांग गूढ आजही आम्हाला हाक मारत आहे. निसर्ग वाचन हे केवळ पुस्तकातून होत नाही, त्यासाठी त्या रात्री जागावव्या लागतात, त्या मातीत मिसळावे लागते. प्राणीगणना केवळ एक अनुभव नाही, तर संवर्धनाची जनचळवळ वर्षानुवर्षे बुद्ध पौर्णिमा आणि प्राणीगणना हे आमच्यासाठी एक अतूट समीकरण बनले होते. त्या एका रात्रीतून मिळणारी ऊर्जा 'इको-प्रो'च्या वर्षभराच्या वन्यजीव संरक्षण कार्यात सामावलेली असायची. जंगलाशी असलेले हे ऋणानुबंध दरवर्षी अधिक घट्ट होत गेले. यातूनच जंगल म्हणजे काय, त्याचे मानवी जीवनातील स्थान आणि वन्यप्राण्यांच्या अधिवासाचे महत्त्व आम्हाला उमजू लागले. निसर्गाच्या या सानिध्याने विचारात एक प्रकारची प्रगल्भता आणली. याच प्रगल्भतेतून जेव्हा ताडोबाच्या उंबरठ्यावर 'अदानी कोळसा खाणी'चे संकट उभे ठाकले, तेव्हा त्याविरोधात पेटून उठण्याची प्रेरणा आम्हाला याच चळवळीतून मिळाली. आमच्यासाठी ते केवळ झाडे किंवा वन्यप्राण्यांचे घर नव्हते, तर ती आमच्या अस्तित्वाची लढाई होती. प्राणीगणनेच्या या प्रक्रियेने आमच्यात एक आंतरिक चळवळ निर्माण केली होती, जिने आम्हाला ठणकावून सांगितले की—निसर्ग आणि जैवविविधता हा मानवी जीवनाचा पाया आहे. तो आपल्याला आणि भावी पिढीसाठी वाचवावाच लागेल; आणि म्हणूनच त्याकाळी खंबीरपणे 'अदानी गो बॅक'चा नारा बुलंद होऊ शकला.
खरे तर, प्राणीगणना म्हणजे केवळ आनंद देणारी किंवा वन्यजीव टिपणारी रात्र नाही, तर ती एक मोठी 'पाठशाळा' आहे. याच अनुभवांनी आम्हाला अन्नसाखळी, अधिवास, कॉरिडॉर आणि व्याघ्र प्रकल्पांच्या तांत्रिक संकल्पना सहज समजावून सांगितल्या. 'जीवो जीवस्य जीवनम्' हा निसर्गधर्म आम्ही तिथे प्रत्यक्ष अनुभवला. यातूनच पुढे सर्परक्षण आणि संकटग्रस्त वन्यजीवांच्या 'रेस्क्यू ऑपरेशन्स'मध्ये लागणारी आत्मीयता वाढत गेली. याच कार्याची दखल घेऊन पुढे वनविभागाने 'मानद वन्यजीव रक्षक' म्हणून सेवा करण्याची संधी दिली. या प्रवासाने स्थानिक गावकरी तसेच त्यांच्या अडचणी, निसर्ग संरक्षण आणि वनविभागाच्या बाजूने 'कायदेशीर संवर्धन व धोरणे' यांच्यातील दुवा म्हणून कार्य करण्याची एक नवी संधी उपलब्ध करून दिली. या चळवळीचा आणि अनुभवांचाच एक भाग म्हणून पुढे 'राज्य वन्यजीव सल्लागार मंडळाचा' सदस्य म्हणून धोरणात्मक पातळीवर काम करण्याची जबाबदारी पार पाडता आली. मात्र, आजही जेव्हा मी 'लोहारडोंगरी'चे जंगल वाचवण्यासाठी एका सामान्य कार्यकर्त्याच्या जिद्दीने संघर्ष करतो, तेव्हा त्या जुन्या प्राणीगणनेसारख्या निसर्ग अनुभवांचे महत्त्व प्रकर्षाने अधोरेखित होते. जंगलाशी असलेले हे आत्मिक नातेच आपल्याला लढण्याचे बळ देते. आपली भावी पिढी निसर्गसंपन्न व्हावी आणि त्यांच्यात पर्यावरण रक्षणाची ही जाणीव निर्माण व्हावी, यासाठी अशा कार्यक्रमांकडे केवळ 'पर्यटन' म्हणून न बघता, 'संस्कार' म्हणून विशेष लक्ष देण्याची आज नितांत गरज आहे. गेल्या दोन दशकांत या प्राणीगणनेने राज्यातील वन्यप्राणी समृद्ध असलेल्या जिल्ह्यामधून अनेक सक्षम पर्यावरण कार्यकर्ते घडवले आहेत. मात्र, आज या उपक्रमाचे बदललेले स्वरूप पाहून मन विषण्ण होते. जंगलसफारी गेट मोठ्या प्रमाणात उघडे केले जात आहे. अनेक लोक महागडी कॅमेरे रोखून वन्यप्राणी टिपत आहेत. अश्या या पर्यटनाला आज मोठी गर्दी होते, पर्यटकांना सुद्धा प्राणिगणना चे वेड आहे, आज तिथे प्रचंड गर्दी आहे, पण नव्या पिढीला पूर्वीसारखी संधी आणि सखोलता मिळेल का, हा प्रश्न आहे. झालेले व्यावसायिकीकरण आणि आर्थिक निकष यामुळे निसर्गाशी एकरूप होण्याची ती मूळ भावना कुठेतरी हरवत चालली आहे. जर ही प्रक्रिया केवळ 'इव्हेंट' बनून राहिली, तर भविष्यातील समर्पित निसर्गरक्षक कसे घडतील, ही आजची मोठी चिंता आहे.
संकलन :- बंडू धोतरे, अध्यक्ष इको-प्रो, चंद्रपूर (9370320746)
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
0 टिप्पण्या