अजिंठा लेणी पुढच्या पिढीला दाखवायची असेल तर... (If we want to show the Ajanta Caves to the next generation...)
वृत्तसेवा :- अजिंठा लेणी ही महाराष्ट्रातील प्राचीन लेणी, शैलगृहे व भिंतीचित्रे याचे एक जगप्रसिद्ध स्थळ आहे. येथे एकूण ३० लेणी असून, लेणी क्र. ९, १०, ११, २६ व २९ ही चैत्यगृहे, उर्वरित २५ विहार आहेत. हीनयान व महायान या दोन्ही पंथांशी संबंधित कलाकृती येथे आपल्याला दिसून येतात. वाकाटक वंशातील शेवटचा राजा हरिषेण यांच्या कालखंडात ही लेणी कोरली गेली आहेत. प्रारंभीच्या काळात सातवाहन राजे व सामान्य व्यक्तींनी चैत्यविहारासाठी दिलेल्या दानातून या लेणी कोरली गेली. लेणीची सध्याची स्थिती गळतीमुळे पावसाळ्यात डोंगरातून पाणी अजिंठा लेणीमध्ये ओलावा व पाणी झिरपल्यामुळे भिंतीवरील मौल्यवान चित्राचे थर हळूहळू निघून जात आहेत. दमट हवामानामुळे लेण्यांच्या भिंतीवर बुरशी व इतर सूक्ष्मजीवांची वाढ होऊन चित्राचे नुकसान होत आहे. लेण्यांमध्ये वटवाघुळांमुळे होणारी घाण चित्रांसाठी अत्यंत हानिकारक ठरते आहे. एवढेच नव्हे तर मोठ्या संख्येने येणाऱ्या पर्यटकांमुळेही लेणीवर दूरगामी परिणाम होतो आहे. पर्यटकांच्या श्वासापासून बाहेर पडणाऱ्या कार्बन डायऑक्साईडपासून आतील तापमानात बदल होऊन चित्रांना हानी पोहोचते आहे. काही लेण्यांमध्ये खडक व खांब कमकुवत झाले असून, त्यांच्या पडझडीचा धोका निर्माण झाला आहे. ३० लेण्या अजिंठा येथे आहेत. छत्रपती संभाजीनगरच्या भारतीय पुरातत्त्व खात्यांतर्गत भारतातील रासायनिक प्रक्रिया करणारी प्रयोगशाळा आहे. तिच्या माध्यमातून रासायनिक प्रक्रिया करून बुरशी व त्याचे डाग काढले पाहिजेत. ही प्रक्रिया निरंतर झाली पाहिजे. परंतु, प्रक्रियेतील वेळकाढूपणा लेण्यांचे आयुष्य घटवण्यास कारणीभूत ठरू शकतो. गळती पाणी थांबवण्यासाठी डोंगराच्या वरच्या बाजूला वॉटरप्रूफिंग करणे आवश्यक आहे. पर्यटकांच्या संख्येवर मर्यादा आणणे हा एक उत्तम उपाय असून, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून लेण्यांच्या रचनेत होणाऱ्या सूक्ष्म बदलांचे नियमित निरीक्षण करणे आवश्यक आहे. संवर्धन आवश्यक पुरातत्त्व व वन विभागाच्या समन्वयातून लेणी संवर्धन आवश्यक आहे. पर्यटकांना लेणी पाहण्यासाठी सुसह्य सुयोग्य वाट करून देणे आवश्यक आहे. वेगवेगळ्या सामाजिक व खासगी संस्थांचे यासाठी सहकार्य घ्यावे. नाहीतर, पुढील पिढ्यांना अजिंठा लेणी फक्त फोटोमध्ये पाहता येईल. सामूहिक जबाबदारीतून ही लेणी वाचली पाहिजे, यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.
संकलन :- डॉ. संजय पाईकराव इतिहास व पुरातत्त्व शास्त्राचे अभ्यासक
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
0 टिप्पण्या