स्मार्ट फोनच्या माध्यमातून करा सेल्फ-एन्युमरेशन' म्हणजेच 'स्व-गणना' तुमची जनगणना तुमच्या हातात (Do Self-Enumeration through Smart phone, 'Your census in your hands)
वृत्तसेवा :- देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच लोकसंख्येची मोजणी कागद-पेन सोडून डिजिटल अवतारात होणार आहे. 2026-27 ची जनगणना तुमच्यासाठी केवळ एक सरकारी प्रक्रिया नसून, ती आता तुमच्या स्मार्टफोनचा एक भाग होणार आहे. विशेष म्हणजे, तासनतास घराबाहेर उभे राहून सरकारी अधिकाऱ्यांच्या प्रश्नांना उत्तरे देण्याचा कंटाळवाणा प्रवास आता संपणार आहे. केंद्र सरकार 'सेल्फ-एन्युमरेशन' म्हणजेच 'स्व-गणना' हा नवा पर्याय घेऊन येत आहे, ज्यामध्ये तुम्ही स्वतःची माहिती स्वतःच भरू शकाल. सोप्या भाषेत सांगायचे तर, जसे तुम्ही ऑनलाइन रेल्वे तिकीट बुक करता किंवा एखादी वस्तू ऑर्डर करता, अगदी तसेच आता तुम्हाला तुमच्या कुटुंबाची माहिती ऑनलाइन पोर्टलवर भरता येईल. यापूर्वी जनगणना अधिकारी घरी यायचे आणि लांबलचक प्रश्न विचारायचे. आता मात्र सरकार तुम्हाला 'सेल्फ-एन्युमरेशन पोर्टल'ची चावी देणार आहे. तुम्ही स्वतःच्या सोयीनुसार माहिती भरली की, सिस्टिम तुमच्यासाठी 11 अंकी एक खास 'SE ID' तयार करेल. जेव्हा अधिकारी तुमच्या घरी येतील, तेव्हा तुम्हाला फक्त हा आयडी दाखवायचा आहे. तुमची जनगणना काही सेकंदात पूर्ण होईल. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, हे पोर्टल एकूण 16 भाषांमध्ये उपलब्ध असेल, त्यामुळे तुम्ही तुमच्या आवडीची भाषा निवडू शकता. यामध्ये मॅपचा पर्याय देखील असेल, जिथे तुम्ही तुमच्या घराचे अचूक लोकेशन मार्क करू शकाल. सर्व माहिती भरून 'फायनल सबमिट' केल्यावर तुमच्या मोबाईलवर एसएमएसद्वारे 11 अंकी SE ID पाठवला जाईल. हे पोर्टल वापरणे सोशल मीडिया अकाउंट लॉगिन करण्याइतकेच सोपे असणार आहे. तुम्हाला फक्त (se.census.gov.in) या पोर्टलवर जायचे आहे. कुटुंबाचा प्रमुख स्वतःच्या मोबाईल नंबरने लॉगिन करेल, ज्याची पडताळणी ओटीपी (OTP) द्वारे केली जाईल. अनेकदा मनात शंका येते की प्रत्येक राज्यासाठी वेगळी वेबसाईट असेल का? तर त्याचे उत्तर 'नाही' असे आहे. संपूर्ण देशासाठी एकच 'नॅशनल सेल्फ-एन्युमरेशन पोर्टल' असेल. तुमच्या राज्यात जेव्हा प्रत्यक्ष जनगणना सुरू होणार असेल, त्याच्या बरोबर 15 दिवस आधी हे पोर्टल तुमच्यासाठी खुले केले जाईल. यामुळे वेबसाईटवर एकाच वेळी ताण येणार नाही आणि नागरिकांनाही शांतपणे माहिती भरता येईल. माहिती ऑनलाइन भरली तरी अधिकारी घरी का येणार? हा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. खरं तर हे एक 'हायब्रिड मॉडेल' आहे, जे तुमच्या माहितीची सुरक्षा आणि अचूकता तपासण्यासाठी डिझाइन केले आहे. अधिकारी तुमच्या घरी येतील, तेव्हा ते फक्त तुमचा SE ID त्यांच्या मोबाईल ॲपमध्ये टाकतील. तुम्ही भरलेली माहिती त्यांच्यासमोर आधीच असेल, ती फक्त एकदा 'क्रॉस-चेक' केली जाईल. जर काही बदल करायचा असेल, तर तो तिथेच अपडेट केला जाईल. यामुळे कागदी कामात होणाऱ्या चुका टाळल्या जातील आणि देशाकडे भविष्यातील धोरणे आखण्यासाठी एक भक्कम आणि विश्वसनीय डेटा तयार होईल.
1 ते 15 मे या कालावधीत स्वयंगणना करण्याची सोय जिल्हाधिका-यांनी घेतला यंत्रणेचा आढावा सन 2011 च्या जनगणनेनंतर तब्बल 15 वर्षांनी 1 मे 2026 पासून जनगणनेला सुरवात होत आहे. देशातील ही पहिलीच डिजीटल जनगणना असून 1 ते 15 मे या कालावधीत नागरिकांना स्वयंगणना करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात जनगणना शुभारंभाच्या पार्श्वभुमीवर जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी गुरुवारी (दि. 30) सर्व यंत्रणेचा आढावा घेऊन सुचना केल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित या बैठकीला मनपा आयुक्त अकुनुरी नरेश, निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार, उपविभागीय अधिकारी विशालकुमार मेश्राम, पालिका प्रशासन अधिकारी डॉ. विद्या गायकवाड, तहसीलदार विजय पवार, प्रभारी नियोजन अधिकारी सुभाष कुमरे यांच्यासह दूरदृष्यप्रणालीद्वारे जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, सर्व तहसीलदार, सर्व मुख्याधिकारी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी पंत म्हणाल्या, जनगणना हे राष्ट्रीय कार्य आहे. विविध यंत्रणांनी आपापल्या क्षेत्रातील खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी, सभापती आदींची स्वयं गणना करावी. तसेच नागरिकांनासुध्दा स्वयं गणनेसाठी प्रवृत्त करावे. अधिकारी – कर्मचा-यांचे प्रशिक्षण व्यवस्थित घ्यावे. जनगणनेबाबत शासन स्तरावरून रोजच आढावा घेण्यात येणार आहे. त्यामुळे सर्वांनी आपली जबाबदारी गांभिर्याने पार पाडावी, अशा सूचना त्यांनी दिल्या. अशी राहील स्वयंगणनेची प्रक्रिया :
1) संकेतस्थळाचा वापर आणि लॉगिन https://se.census.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या. राज्य / केंद्रशासित प्रदेश निवडा. कॅप्चा प्रविष्ट करा.
2) कुटुंब नोंदणी कुटुंब प्रमुखाचे नाव. 10 अंकी मोबाईल क्रमांक. ई- मेल आयडी असल्यास प्रविष्ट करा. कुटुंब प्रमुखाचे नाव नंतर बदलता येणार नाही. प्रत्येक कुटुंबासाठी फक्त एकच मोबाईल क्रमांक वापरावा. एकदा नोंदणी झाल्यावर तोच क्रमांक इतर कोणत्याही कुटुंबासाठी वापरता येणार नाही.
3) भाषा आणि ओटीपी पडताळणी पसंतीची भाषा निवडा आणि नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर पाठवलेला ओटीपी प्रविष्ट करा. निवडलेली भाषा नंतर बदलता येणार नाही.
4) स्थानाचा तपशील द्या जिल्हा निवडा आणि परिसर / गाव / नगर व पीन कोड प्रविष्ट करा.
5) नकाशावर आपले निवासस्थान शोधा आपली अचूक निवासी इमारत ओळखण्यासाठी आणि स्थानाची पुष्टी करण्यासाठी नकाशावरील लाल मार्कर ड्रॅग करा.
6) प्रश्नावली पूर्ण करा टूलटिप्स, वारंवार विचारले जाणारे प्रश्न (एफएक्यूज) आणि आवश्यक माहिती टिपांच्या मार्गदर्शनानुसार घरसुची आणि गृह गणना प्रश्नावली भरा.
7) पूर्वावलोकन आणि पुनरावलोकन प्रविष्ट केलेला सर्व डेटा तपासण्यासाठी पुर्वावलोकन स्क्रीनचा वापर करा. तुम्ही नोंदी संपादीत करू शकता. नंतर सादर करण्यासाठी मसुदा जतन करू शकता किंवा अंतिमरित्या सादर करू शकता.
8) अंतिम सादर करणे तुमचा डेटा लॉक करण्यासाठी ‘अंतिम सादर करा’ वर क्लिक करा. अंतिम सादर केल्यानंतर कोणतेही बदल करता येणार नाहीत. सादर केल्यानंतर 11 अंकी एस.ई आयडी (एसएमएस) आणि ईमेल दिले असल्यास त्यावर येईल.
9) गणकाची भेट जेव्हा जनगणना गणक तुमच्या घरी भेट देईल, तेव्हा तुमचा एस.ई. आयडी त्यांना सांगा. जर एस.ई. आयडी विद्यमान नोंदीशी जुळला तर तपशील निश्चित करून सादर केले जातात. अन्यथा गणक नव्याने डेटा गोळा करेल. प्रशासनाचे नागरिकांना आवाहन नागरिकांनी दिलेली माहिती गुप्त ठेवली जाईल व केवळ जनगणना कार्यासाठीच वापरली जाईल. त्यामुळे नागरिकांनी अचूक माहिती भरावी. तसेच 15 मे नंतर घरी आलेल्या प्रगणकाला सहकार्य करून या राष्ट्रीय कार्यात योगदान द्यावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

0 टिप्पण्या