चंद्रपूर :- शाळाबाह्य, अनियमित व स्थलांतरीत मुलांना शाळेच्या प्रवाहात दाखल करण्यासाठी जिल्ह्यात 5 ते 20 जुलै 2024 या कालावधीत विशेष शोधमोहीम राबविण्यात येणार आहे. सदर मोहिमेची प्रभावी अंमलबजावाणी होण्याकरीता मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी जिल्हास्तरीय समितीचा आढावा घेतला. बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षण हक्क अधिनियम – 2009 या कायद्यानुसार 6 ते 14 वयोगटातील प्रत्येक बालकास मोफत व सक्तीचे शिक्षण घेण्याचा हक्क प्राप्त झाला आहे. राज्यात ब-याच जिल्ह्यातील कुटुंबे विविध व्यवसायाच्या निमित्ताने स्थलांतर करीत असतात. सदर कुटुंबे ही आर्थिक स्तर निम्न असलेल्या वंचित घटकातील, भुमीहिन अथवा अल्पभुधारक असतात. वीटभट्टी, दगडखाण मजूर, कोळसा खाणीतील मजूर, शेतमजुर, बांधकाम व्यवसाय, रस्ते, पूल, नाले, जिनिंग मील इत्यादी प्रकारच्या कामानिमित्त विविध कामगार स्थलांतरीत होत असल्याने तसेच तमाशा कलावंत व गावोगावी फिरणारे भटके विमुक्त यांच्या स्थलांतरीत मुलांना शिक्षण हमी कार्ड देण्याची तरतूद करण्यात आली आहे. त्यानुसार 3 ते 18 या वयोगटातील सर्व बालके शोधून शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी सदर मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करणे आवश्यक आहे.
शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणा – मुख्य कार्यकारी अधिकारी जॉन्सन शाळाबाह्य, अनियमित आणि स्थलांतरीत मुलांना शाळेच्या प्रवाहात आणण्यासाठी जिल्ह्यात 5 ते 20 जुलै या दरम्यान विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेच योग्य नियोजन करून जास्तीत जास्त शाळाबाह्य विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणा, अशा सुचना मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांनी दिल्या. पुढे ते म्हणाले, मोहिमेदरम्यान औद्योगिक क्षेत्रात एक स्वतंत्र टीम ठेवावी. केवळ मोहीम म्हणूनच नाही तर 15 दिवसांपेक्षा जास्त दिवस शाळेत गैरहजर असलेल्या विद्यार्थ्यांचीसुध्दा माहिती नियमित घ्यावी. अंगणवाडीमधील तसेच इतर ठिकाणचा दिव्यांग विद्यार्थी पुढील शिक्षणासाठी शाळेत जातो की नाही, याबाबतसुध्दा माहिती घेणे आवश्यक आहे. या मोहिमेसाठी संबंधित अधिका-यांना जबाबदारी वाटून द्यावी. तसा आदेश त्वरीत काढावा. प्रत्येक ग्रामसभेमध्ये हा विषय ठेवावा. जेणेकरून त्या परिसरातील शाळाबाह्य विद्यार्थी शाळेपासून वंचित राहणार नाही, अशा सुचना त्यांनी दिल्या. बैठकीला शिक्षणाधिकारी (प्राथ) अश्विनी सोनवणे, निकिता ठाकरे (माध्य.), राजकुमार हिवारे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी दीपक बानाईत, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बालविकास) संग्राम शिंदे, मोहिमेची उद्दिष्टे 1. शाळाबाह्य, अनियमित व स्थलांतरीत बालकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे, 2. बालकांचे पालकांसोबत होणारे स्थलांतर थांबविणे, 3. स्थलांतरीत बालकांना त्याच परिसरात शिक्षणाच्या प्रवाहात कायम ठेवणे, 4. स्थलांतरीत होऊन जाणा-या बालकांना शिक्षण हमी कार्ड देणे. कुठे होईल शोधमोहीम : शाळाबाह्य, अनियमित व स्थलांतरीत बालकांच्या नोंदी घरोघरी, बसस्थानक, रेल्वेस्थानक, सिग्नल्स, हॉटेल्स, सार्वजनिक ठिकाणे, बाजारतळ, वीटभट्ट्या, दगडखाणी, साखर कारखाने, बालमजूर असण्याची शक्यता असेल अशी ठिकाणे. स्थलांतरीत होऊन आलेली कुटुंबे ज्या ठिकाणी असण्याची शक्यता आहे, अशा सर्व ठिकाणी. सोबतच खेडी, वाड्या, वस्त्या, तांडे, पाडे, शेतमळे. महिला व बालविकास विभागांतर्गत बालगृहे, विशेष दत्तक संस्था, निरीक्षण गृहे.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या