बुध्द पौर्णिमेच्या पर्वावर ताडोबा- अंधारी व्याघ्र प्रकल्पात प्राणी गणना, एकूण १ हजार ९१७ वन्यप्राण्यांची नोंद (Animal census in Tadoba-Andhari Tiger Reserve on the occasion of Buddha Purnima, total 1 thousand 917 wild animals recorded)
चंद्रपूर :- ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमध्ये सहा वनपरिक्षेत्रात बुद्ध पौर्णिमेला चंद्राच्या लख्ख प्रकाशात झालेल्या प्राणी गणना अर्थात निसर्ग अनुभव उपक्रमात २६ पट्टेदार वाघ, ८ बिबट, ४०३ चितळ, ३४४ रानगवे, ३६३ रान डुक्कर, ३४० वानर असे एकूण १ हजार ९१७ वन्यप्राण्यांची नोंद घेण्यात आली. बुद्ध पौर्णिमेला गुरुवार 23 मे रोजी सायंकाळी चार वाजता निसर्गप्रेमींना जिप्सीद्वारे मचाणाजवळ सोडून देण्यात आले. त्यानंतर शुक्रवार २४ मे रोजी सकाळी सहा वाजता या सर्वांना मचाणाजवळून पुन्हा जिप्सीत बसवून मुख्य प्रवेशद्वारावर सोडून देण्यात आले. ताडोबा व्यवस्थापनाच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या नोंदीनुसार या उपक्रमात सहभागी झालेल्या निसर्गप्रेमींना २६ पट्टेदार वाघ व ८ बिबट्यांनी दर्शन दिले. यामध्ये मुल व शिवनी वन परिक्षेत्रमध्ये प्रत्येकी ७ वाघाची नोंद घेण्यात आली. मोहूर्लीमध्ये ४, खडसांगी २ व पळसगावमध्ये एका वाघाची नोंद घेतल्या गेली. सर्वाधिक २१ नर वाघ नोंदविण्यात आले. त्यानंतर ३ मादी, १ छावा व एक वाघाचे लिंग ओळखता आले नाही. तसेच केवळ ८ बिबट्याची नोंद घेतली गेली. त्यानंतर ४०३ चितळ, ३४४ रानगवे, ३६३ रान डुक्कर, ३४० वानर, सांबर १६६, चोशिंगा ८, भेडकी १८, नीलगाय ३४, रानकुत्रे १७, अस्वल ३४, जवादी मांजर २, उद मांजर ४, रान मांजर ३, सायळ १, मुंगूस १०, मोर ९७, खवल्या मांजर ९ व इतर वन्यप्राणी ३२ अशी नोंद घेण्यात आली. कोल्हा, तडस व चिंकारा याची नोंद घेतल्या गेली नाही. एकूण १ हजार ९१७ वन्य प्राण्यांच्या नोंदी या उपक्रमअंतर्गत घेण्यात आल्या. यामध्ये खडसंगी वन परिक्षेत्रमध्ये सर्वाधिक ५११ वन्य प्राण्यांच्या नोंदी घेतल्या गेल्या. त्यानंतर मोहुरली ४८१, मुल ३४१, शिवणी २१६, पळसगाव १२२, चंद्रपूर १४६ वन्य प्राणी नोंद घेण्यात आली. ताडोबा 'बफर' क्षेत्रातील चंद्रपूर, मूल, मोहर्ली, खडसंगी, पळसगाव व शिवणी या सहा वनपरिक्षेत्रातील मचाणांवर प्राणिगणना अर्थात निसर्ग अनुभव हा उपक्रम राबवण्यात आला. यासाठी ताडोबा बफर क्षेत्रातील ७९ मचाणांवर प्रत्येकी दोन निसर्गप्रेमींना संधी देण्यात आली होती. 'माय ताडोबा' या संकेतस्थळावर निसर्ग अनुभव उपक्रमासाठी नोंदणी केलेले १६० निसर्गप्रेमीं व ८० गाईड या उपक्रमात सहभागी झाले होते. या उपक्रमात सहभागी झालेल्या प्रत्येकांकडून चार हजार पाचशे रुपये शुल्क आकारण्यात आले होते.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या