मानव-वन्यजीव संघर्ष रोखण्यासाठी 'एआय' वापरासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी " मन की बात " मधून ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचा केला गौरव (Prime Minister Narendra Modi praises Tadoba-Andhari Tiger Reserve in "Mann Ki Baat" for use of 'AI' to prevent human - wildlife conflict)

Vidyanshnewslive
By -
0
मानव-वन्यजीव संघर्ष रोखण्यासाठी 'एआय' वापरासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी " मन की बात " मधून ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचा केला गौरव (Prime Minister Narendra Modi praises Tadoba-Andhari Tiger Reserve in "Mann Ki Baat" for use of 'AI' to prevent human - wildlife conflict)
चंद्रपूर :- देशवासियांशी संवाद साधण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेला ‘मन की बात’ हा कार्यक्रम देशभरात लोकप्रिय झाला आहे. देशभरातील अनेक नागरिकांना, उपक्रमांचा, शहरांचा मोदी यांनी या कार्यक्रमाच्या माध्यमातून आतापर्यंत गौरवपूर्ण उल्लेख केला आहे. आता मोदी यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी केलेल्या ‘मन की बात’मध्ये महाराष्ट्राच्या चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचा गौरवपूर्ण उल्लेख केला आहे. राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून त्यांच्याच मतदारसंघात असलेल्या जगविख्यात ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात ही प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. चंद्रपुरात वाघांची संख्या ही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. वाघांसोबतच बिबट, अस्वल आदी वन्यजीवांची संख्याही बऱ्यापैकी आहे. त्यामुळे या भागांमध्ये मानव-वन्यजीव संघर्ष सातत्याने घडतो. यातून अनेकदा ग्रामीण नागरिकांना आपला जीव गमवावा लागतो. प्रसंगी वन्यजीव हानीही होते. नेमक्या याच समस्येवर तोडगा शोधून काढण्यात आला आहे. पुढील महिन्यात 3 मार्चला विश्व वन्यजीव दिवस साजरा करण्यात येणार आहे. हा दिन विशेष लक्षात ठेवत नरेंद्र मोदी यांनी ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील एका प्रणालीचा आवर्जुन उल्लेख केला.
           ताडोबा-अंधारी प्रकल्पात कार्यान्वित झालेल्या या सतर्कता प्रणालीमुळे जंगलाला लागून असलेल्या गावांमधील ग्रामस्थांवर होणाऱ्या वन्यजीवांचे हल्ले रोखण्याचा प्रयत्न केला जात आहे. महाराष्ट्र वन विभागाने राबविलेला उपक्रम व विश्व वन्यजीव दिवसाचा संदर्भ जोडत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यंदाच्या ‘मन की बात’मध्ये वनक्षेत्रात सुरू झालेल्या ‘एआय’ वापराची स्तुती केली. पंतप्रधान म्हणाले की, तंत्रज्ञानाचा वापर वाढत जाणार आहे. सिमेंटच्या जंगलाचे प्रमाण वाढले तर त्याचा परिणाम वन्यजीव आणि जैवविविधतेवर होणार आहे. अशात वन्यजीव आणि वन संवर्धन काळाची गरज आहे. वन आणि वन्यजीव यांचे संवर्धन करताना निर्माण होणारा मानव-वन्यजीव संघर्ष अलीकडच्या काळात मोठी समस्या बनली आहे. अशात ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात वापरण्यात येत असलेली ‘एआय’ प्रणाली मोलाची ठरत आहे. प्रत्येक व्यक्तीने तंत्रज्ञानाचा मानव कल्याणासाठी व देशहितासाठी वापर केल्यास त्यातून संभाव्य संकटांवर वेळीच मात करणे शक्य होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आतापर्यंतच्या ‘मन की बात’मध्ये अनेकदा महाराष्ट्रातील विविध प्रकल्पांचा, व्यक्तींचा गौरवपूर्ण उल्लेख केला आहे. त्यातील विदर्भातील अनेक प्रकल्प व व्यक्तांचा समावेश आहे. यंदाच्या ‘मन की बात’मध्ये पुन्हा एकदा महाराष्ट्राने व त्यातल्या त्यात विदर्भाने आपला डंका कायम ठेवला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या परिसरात वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पुढाकार घेत वन विभागाला कृत्रिम बुद्धीमत्तेचा अर्थात ‘आर्टिफिशिअल इंटेलिजन्स’चा वापर करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार व्याघ्र प्रकल्पाच्या आसपास असलेल्या 13 गावांसाठी ‘एआय अलर्ट सिस्टिम’ कार्यान्वित करण्यात आली आहे. या प्रणालीमध्ये बसविण्यात आलेल्या कॅमेऱ्यांच्या आधारावर कोणताही हिंस्र वन्यजीव गावांच्या आसपास येत असल्यास ‘एआय’च्या माध्यमातून ग्रामस्थांना तत्काळ मोबाइलवर सतर्कतेचा एसएमएस मिळतो. ‘गुगल मॅप’ची मदत यासाठी ही ‘एआय’ प्रणाली घेते.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)