चंद्रपूर जिल्हाधिका-यांकडून सामान्य रुग्णालयातील आरोग्य व्यवस्थेची पाहणी (Inspection of Health System in General Hospital by Chandrapur District Collector)

Vidyanshnewslive
By -
0

चंद्रपूर जिल्हाधिका-यांकडून सामान्य रुग्णालयातील आरोग्य व्यवस्थेची पाहणी (Inspection of Health System in General Hospital by Chandrapur District Collector)

चंद्रपूर :- शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे परिचारिकेच्या झालेल्या मृत्युप्रकरणाची जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी गंभीर दखल घेऊन प्रशासनाला चौकशीचे आदेश दिले आहे. तसेच सामान्य रुग्णालयातील उणिवा, त्रृटी आदी बाबींमध्ये जिल्हाधिका-यांनी विशेष लक्ष देण्याच्या सुचना केल्या होत्या. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी बुधवारी (दि.30) जिल्हा सामान्य रुग्णालयातील आरोग्य व्यवस्थेची पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले, रुग्णालयात मिळणा-या आरोग्य सेवेबद्दल नागरिकांच्या तक्रारीसाठी लावण्यात आलेली तक्रारपेटी सुस्थितीत असणे आवश्यक आहे व त्याची नागरिकांना माहिती असावी. जिल्हा रुग्णालयातील औषध पुरवठा, साहित्य, उपकरणे, रिक्त जागा आदी बाबीं प्रत्येक महिन्याला शासनाला कळवाव्यात. तसेच त्याची एक प्रत जिल्हा प्रशासनाला उपलब्ध करून द्यावी. अतिदक्षता कक्ष चांगल्या स्थितीत असावा. देखभाल व दुरुस्ती करीता देण्यात आलेल्या निधीमध्ये अतिदक्षता कक्ष, संरक्षण भिंत, प्रवेशद्वार, पाण्याची टाकी याव्यतिरिक्त इतर बाबींचा समावेश करायचा असल्यास त्वरीत कळवावे.

         रुग्णालयात कोणत्या डॉक्टर्सची ड्यूटी आहे, ते कधी येतात, त्यांच्या येण्या-जाण्याच्या वेळा कोणत्या आहेत, याबाबत रुग्णालय प्रशासनाने अतिशय गांभिर्याने लक्ष द्यावे. यात कोणताही हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही. रुग्णाशी निगडीत असलेल्या व अत्यावश्यक बाबी जसे औषध पुरवठा, उपकरणे यांची मागणी त्वरीत करा. रुग्णालयातील सर्व विभाग प्रमुखांची बैठक घेऊन त्या-त्या विभागात कशाची आवश्यकता आहे, प्रथम प्राधान्य कोणते, त्याचे बजेट किती याबाबत अहवाल मागवून घ्या. रुग्णालयातील स्टाफ किती वाजता येतो, वेळेवर उपस्थित नसलेल्यांची नोंद घेणे, स्वाक्षरीची पडताळणी करण्यासाठी हस्ताक्षर तज्ञांकडे पाठविणे, बायोमेट्रीक मशीन असल्यास उपस्थितांची नोंद घेणे, अशा सुचनाही त्यांनी केल्या. जिल्हाधिकारी पुढे म्हणाले, रुग्णालयात औषधी पुरवठा व मागणी, उपकरणे, सर्जिकल साहित्य याचा गत तीन वर्षाचा रेकॉर्ड, त्यासाठी आलेला निधी याबाबत अहवाल सादर करावा. येथे उपलब्ध असलेले सीसीटीव्ही सर्व चालू स्थितीत असणे आवश्यक आहे. आणखी सीसीटीव्ही लागत असल्यास तसा प्रस्ताव सादर करा. डॉक्टरांची येण्या-जाण्याची वेळ नोंद होण्यासाठी रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर सीसीटीव्ही त्वरित लावा. त्याचा ॲक्सेस उपविभागीय अधिकारी यांना आय.पी.द्वारे द्यावा. इतर विभागापेक्षा नवजात बालक कक्ष, बालरोग विभाग, तेथील आयसीयू हे चांगल्या प्रकारे सुरू असले तरी बालकांची अदलाबदल, बाळ चोरीचे प्रकार घडणार नाही, यासाठी दक्ष रहा. रुग्णालयात रुग्णासोबत कमीतकमी नातेवाईक आत येण्यासाठी सुरक्षा रक्षकांकडून नियोजन करा, असेही निर्देश त्यांनी दिले. यावेळी जिल्हाधिका-यांनी टेलिमेडीसीन विभाग, अपघात विभाग, अतिदक्षता विभाग, लहान मुलांसाठी असलेला अतिदक्षता विभाग, ड्रेसिंग रूम, डिलिव्हरी रुम, डायलिसिस युनीट, थॅलेसमिया रुम व बाहृयरुग्ण विभाग आदींची पाहणी केली. याप्रसंगी सहाय्यक जिल्हाधिकारी मुरुगानंथम एम, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मिलींद फुलपाटील, बालरोग्य तज्ञ डॉ. मिलींद कांबळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे, डॉ. प्रशांत उईके, डॉ. मंगेश गुलवाडे, आयएमए चंद्रपूरच्या सचिव डॉ. कल्पना गुलवाडे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. हेमचंद कन्नाके, वैद्यकीय अधिक्षक डॉ. निवृत्ती जिवणे आदी उपस्थित होते.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)