राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा संप मागे, चर्चा यशस्वी, तीन महिन्यात मागण्या पुर्ण करण्याचं आश्वासन (State government employees' strike called off, talks successful, promise to fulfill demands in three months)

Vidyanshnewslive
By -
0

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा संप मागे, चर्चा यशस्वी, तीन महिन्यात मागण्या पुर्ण करण्याचं आश्वासन (State government employees' strike called off, talks successful, promise to fulfill demands in three months)

मुंबई :- राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेण्याची घोषणा केली आहे. त्यांची सरकार सोबतची चर्चा यशस्वी झाली आहे. जुन्या पेन्शन योजनेसाठी मागील सात दिवसांपासून राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा संप सुरु होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संपकऱ्यांच्या शिष्टमंडळासोबत आज चर्चा केली. या चर्चेमध्ये तोडगा निघाला असून उद्यापासून संप मागे घेण्याचा निर्णय संपकऱ्यांनी घेतला आहे. तीन महिन्यांमध्ये सरकार मागण्या पूर्ण करेल, त्यामुळे उद्यापासून संप मागे घेत आहोत असं संपकऱ्यांच्या वतीने समन्वयक विश्वास काटकर यांनी माध्यमांना सांगितलं. उद्यापासून कर्मचाऱ्यांनी कामावर हजर होण्याचं आवाहन काटकर यांनी केलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलावलेल्या शिष्टमंडळामध्ये १६ सदस्य होते. मागील काही वेळापासून संपकरी आणि सरकारसोबत चर्चा सुरु होती. ही चर्चा यशस्वी झाल्याची माहिती आहे. सरकार संपकऱ्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक असल्याचं काटकर यांनी सांगितलं. जुनी पेन्शन योजना लागू करण्याचं सरकारने आश्वासन दिल्याचं काटकर म्हणाले. विशेष म्हणजे विधान परिषदेतले आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी विधान परिषद सभापतींना पत्र लिहून पेन्शन नाकारत असल्याचं म्हटलं आहे. शिक्षकांना जुनी पेन्शन मिळत नसल्याने आणि शासनाकडे पाठपुरावा करण्याच्या मोहीमेमध्ये सहभागी होत त्यांना पेन्शन घेण्यास नकार दिलेला आहे. ज्ञानेश्वर म्हात्रे हे कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाचे आमदार आहेत. त्यांनी शिक्षकांच्या मागण्यांसाठी पेन्शन नाकारली आहे. शिक्षकांनी जुनी पेन्शन मिळावी, अशी त्यांची मागणी आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)