20 मार्च महाडच्या चवदार तळ्याचा सत्याग्रह, मानवी समानतेच्या लढ्याची सुरुवात (20th March Satyagraha of Mahad's Tadda Talay, the beginning of the struggle for human equality)

Vidyanshnewslive
By -
0

20 मार्च महाडच्या चवदार तळ्याचा सत्याग्रह, मानवी समानतेच्या लढ्याची सुरुवात (20th March Satyagraha of Mahad's Tadda Talay, the beginning of the struggle for human equality)

बल्लारपूर :- आज २० मार्च. आज बँक हॉलिडे नाही, इलेक्ट्रॉनिक किंवा प्रिंट मिडीयाने ‘हवा’ तयार केलेला कुठलाही इव्हेंट नाही, कुठल्याही पाश्चात्य पद्धतीचा ‘डे’ नाही. मग आजच्या दिवसाचे दिनविशेष काय? असा जर प्रश्न विचारला तर किती लोक उत्तर देऊ शकतील? इतरांसाठी आजच्या दिवसाचे कदाचित काही महत्व नसेल परंतु एका वर्गसमुहासाठी आजच्या दिवसाचे अनन्यसाधारण महत्व आहे. महाराष्ट्रात जेव्हा भीषण दुष्काळ असतो. पाण्याविना लोकांची ससेहोलपट चाललेली असते. त्यावेळी प्रत्येकजण आपापल्यापरीने ‘पाणी’ वाचविण्याचे आवाहन करत असतो. फेसबुकवरही या आशयाच्या बऱ्याच पोस्ट बघावयास मिळतात कारण प्रत्येकाला पाण्याचे महत्व माहीत आहे. पाणी जर उपलब्ध नसेल तर लोकांची परिस्थिती किती भीषण होऊ शकते , त्याची दाहकता आपल्याला जाणवते पण मुबलक पाणी उपलब्ध असताना केवळ धर्म, परंपरा आणि संस्कृतीच्या नावाखाली एखाद्या वर्गसमुहाला जर ‘पाणी’ देणे नाकारले जात असेल तर त्या वर्गसमुहाचे जीवन किती भीषण असेल याची कधी आपल्याला जाणीव झालीय का? पाणी, शिक्षण आणि जगण्याचे सर्वच मुलभूत हक्क नाकारले जाणे म्हणजे त्या समाजाचे मनुष्य म्हणून अस्तित्वच नाकारण्यासारखे आहे. हा तथाकथित धर्ममान्य नकार कुठल्यातरी एखाद्या घटनेपुरता नव्हता तर पिढ्यानपिढ्यांचा होता. त्यामुळे अस्पृश्य समाज सर्वच प्रकारच्या गुलामगिरीत खितपत पडला होता. गुलामगिरी ही त्या समाजाची मानसिकता झाली होती. एक छोटीशी गोष्ट आठवली. एकदा एक छोटा मुलगा आपल्या वडिलांबरोबर प्राणीसंग्रहालयात जातो. तेथे फिरत असताना तो हत्तींजवळ येतो. तेथे हत्ती साखळदंडाने बांधलेले असतात. तो पाहतो कि हत्तींचे एक पिल्लू त्याला बांधलेल्या साखळदंडातून मुक्त होण्यासाठी धडपडत असते. तो मुलगा त्याच्या वडिलांना विचारतो, “ बाबा, हे पिल्लू लहान आहे म्हणून ते ती लोखंडाची साखळी तोडू शकत नाही  पण त्याच्या शेजारी असलेली त्याची आई किती शक्तिशाली आहे. ती तर एका झटक्यात साखळी तोडू शकते. मग ती साखळी तोडत का नाही?” त्याचा प्रश्न हत्तींची निगा राखणाऱ्या एका म्हाताऱ्या कामगाराच्या कानावर पडतो. तो म्हणतो,” बाळा, तुझे म्हणणे बरोबर आहे. ही हत्तीण  ही  साखळी अगदी सहज तोडू शकते. तिला जेव्हा या प्राणीसंग्रहालयात आणले तेव्हा ती या पिलाएव्हढीच होती. त्यावेळी तिनेही असाच प्रयत्न केला होता पण त्यावेळी ती अयशस्वी ठरली. तिला कळले की हा साखळदंड खूप मजबूत आहे. यातून आपली मुक्तता होऊ शकत नाही. पुढे तिचा शारीरिक विकास झाला, ताकद वाढली पण मानसिकता मात्र तीच राहिली. त्यामुळे आजही ती या साखळदंडात बंदिस्त आहे” पिढ्यानपिढ्याच्या गुलामगिरीमुळे अस्पृश्य समाजाची मानसिकताही अशीच झाली होती. त्यामुळे तत्कालीन प्रस्थापित व्यवस्थेविरोधात बंड करणे आणि त्यासाठी अस्पृश्य समाजाला उद्युक्त करणे अशी दुहेरी आणि महाकठीण जबाबदारी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्वीकारली. ‘गुलामाला त्याच्या गुलामीची जाणीव करून द्या म्हणजे तो बंड करून उठेल’ या बाबासाहेबांच्या तत्वानुसार २० मार्च १९२७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली महाड येथे चवदार तळ्यावर अस्पृश्य समाजाने ऐतिहासिक सत्याग्रह केला.

         मानवी समानतेच्या लढ्याची सुरुवात बाबासाहेबांनी या सत्याग्रहाने केली. हा लढा एका दिवसापुरता मर्यादित नव्हता. चवदार तळ्याच्या सत्याग्रहानंतर महाडच्या सनातनी लोकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधात महाडच्या दिवाणी न्यायालयात दावा दाखल केला. बाबासाहेबांनी या खटल्यात स्वतः बाजू मांडली व ते जिंकले. यानंतर सनातनी आणखीच भडकले. त्यांनी ठाण्याच्या जिल्हा न्यायालयात याचिका दाखल केली. तेथेही डॉ. बाबासाहेब आंबेडकरच जिंकले. त्यानंतरही नरहरी दामोदर वैद्य, रामनारायण गिरीधारी मारवाडी, गणपत भिकू गांधी, बाळकृष्ण नारायण बागडे, नारायण आनंदराव देशपांडे, रामचंद्र धर्माजी जाधव, मारुती सीताराम वडके, रामचंद्र आत्माराम शेट्टे  या  सनातन्यांनी डॉ. बाबासाहेब  आंबेडकर व त्यांच्या सहकाऱ्यांविरुद्ध मुंबईच्या हायकोर्टात दावा दाखल केला. दोन न्यायमूर्तींच्या खंडपीठाने १७ मार्च १९३७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाजूनेच निकाल दिला. म्हणजे हा पाण्याचा लढा तब्बल दहा वर्षे चालला. बाबासाहेबांनी सांगितले की हा संगर पाण्यासाठी नसून समस्त मानवी मुलभूत हक्कांसाठी आहे. या सत्याग्रहापासून सुरु झालेल्या या लढ्याला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्वातंत्र्य, समता व बंधुता या तत्त्वांवर आधारित देशाचे संविधान देऊन पूर्णत्वाला नेले. गेल्या शतकात आपल्या देशात एका मोठ्या वर्गसमुहाला (एखाद्या जातीला नव्हे) पाण्यासाठी एवढा मोठा लढा द्यावा लागला याची आम्हाला खंत  वाटते का? दक्षिण आफ्रिकेतील नेल्सन मंडेला यांच्या वर्णभेदाविरुद्धच्या लढ्याची आपण जाहीर चर्चा करतो, त्या लढ्याचे समर्थन करतो मग आपल्या देशातील, नव्हे राज्यातील, एव्हढ्या मोठया लढ्याची चर्चा का होत नाही? कुठलाही मिडिया किंवा ज्यांना भारतीय राज्यघटनेने भांडवलशाही , जातीव्यवस्थेविरोधात  ताकदीने उभे राहण्यासाठी समानतेचे (One Man, One Vote, One Value) बळ दिले ते भारताचे तथाकथित प्रगत नागरिक या लढ्याचे खुले समर्थन का करत नाहीत? आजच्या या क्रांतीदिनाची दखल का घेत नाहीत? याचे कारण ऐहिक आणि शैक्षणिकदृष्ट्या आम्ही कितीही प्रगत झालो तरी आम्ही आमचा जातीय अहंकार सोडलेला नाही. आमच्यावरील संस्कारातून जोपासला गेलेला हा जातीय अहंकार बुद्धिप्रामाण्यवादावर मात करतो म्हणूनच आम्ही सर्व महापुरुषांना आणि त्यांच्या विचारधारेला जातीय चष्म्यातून पाहण्याची परंपरागत चुक करतो.

विद्यांश न्युजच्या वतीने स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या तत्वांवर श्रद्धा असणाऱ्या सर्व देशबांधवांना आजच्या चवदार तळे क्रांतीदिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!!

अतिथी मार्गदर्शक :- आयु. भास्कर भगत, बल्लारपूर 

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)