पुरोगामी महाराष्ट्रात जात दाखवा, खत मिळवा! सरकारच्या तुघलकी फतव्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट (Show caste in progressive Maharashtra, get fertilizer! A wave of anger among farmers due to the government's Tughlaki fatwa)
मुंबई :- अवकाळी पावसामुळे आधीच मेटाकुटीला आलेल्या शेतकऱ्यांना आता जात दाखवून खत मिळत असल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. रासायनिक खत खरेदी करताना शेतकर्यांना पॉस मशिनवर आपली जात सांगावी लागतेय. अहो शेतकरी आमची जात आहे. खत खरेदी करताना शेतकऱ्यांना जात कसली विचारताय, असा संतप्त सवाल करत अजित पवार यांनी सरकारला सभागृहात विचारला. सांगली येथे रासायनिक खते खरेदी करताना जात विचारली जात असल्याचा मुद्दा अजित पवार यांनी उपस्थित केला व जातीवाद निर्माण करणार्या सरकारला चांगलेच खडेबोल सुनावले. त्यामुळे दुकानदार जात विचारुन खत देत असल्याने शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. हा मुद्दा विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात गाजला असून विरोधी पक्षनेते अजित पवार जातीच्या राजकारणावरुन सभागृहात आक्रमक झाले. रासायनिक खते खरेदी करताना शेतकऱ्यांना जात का सांगावी लागत आहे. ती का नोंदवावी लागते आहे असा सवालही अजित पवार यांनी केली. ई पॉस सॉफ्टवेअर मशीनमध्ये जातीचा रकाना टाकण्यात आला आहे. त्यात शेतकऱ्यांना जात सांगावी लागते आहे. त्यामुळे जातीचे लेबल लावण्याचा प्रकार पुरोगामी महाराष्ट्रात घडता कामा नये असेही अजित पवार यांनी खडसावून सरकारला सांगितले. दरम्यान, या प्रकरणात कनिष्ठ अधिकारी बळीचे बकरे ठरु नये. कोण यामध्ये सहभागी आहे त्याच्यावर कारवाई करावी आणि जातीचे लेबल बंद करावे व याकडे सरकारने गांभीर्याने लक्ष द्यावे अशी मागणीही अजित पवार यांनी केली. खत घेताना दुकानदारांकडून जातीची विचारणा होत असल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांनी केल्या आहेत. रासायनिक खत खरेदी करताना शेतकर्यांना आपली जात सांगावी लागत असल्याने शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केलीय. खत खरेदीसाठी गेल्यानंतर शेतकऱ्यांना नाव, मोबाईल क्रमांक, आधारकार्ड क्रमांक, पोत्यांची संख्या याची माहिती द्यावी लागते. त्यानंतर पॉस मशिनवर शेतकर्यांना अंगठा घेऊन खत दिले जाते. मात्र गेल्या काही दिवसांपूर्वी ई-पॉस मशीन या सॉप्टवेअर यंत्रणेमध्ये अपडेटस् आले आहेत. यासाठी शेतकर्यांना त्यांची जात विचारण्यात येत आहे.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो. 9421717068
Post a Comment
0Comments