चंद्रपुरात आजपासून 3 दिवस आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलचे आयोजन (International Film Festival organized in Chandrapur for 3 days from today)
चंद्रपूर :- चंद्रपूरच्या भूमीत चित्रपटांची निर्मिती व्हावी, येथील कलावंतांना व्यासपीठ मिळावे या उद्देशाने सांस्कृतिक कार्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने चंद्रपुरात पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवलचे आयोजन होत असल्याने येथे प्रचंड उत्साह आहे. राज्य शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग आणि पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल (International Film Festival) यांच्या संयुक्त विद्यमाने 11 ते 13 मार्च या तीन दिवसात चंद्रपूर येथील मिराज सिनेमा येथे या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. 11 मार्च रोजी सांयकाळी 5 वाजता मुनगंटीवार यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन होणार आहे. यावेळी प्रसिध्द दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल आणि फिल्म अॅन्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे माजी अधिष्ठाता समर नखाते उपस्थित राहणार आहेत. स्थानिक भाषेतील चित्रपटांसोबतच आंतरराष्ट्रीय स्तरावरील चित्रपटांची निर्मिती कशी होते. ऑस्कर पुरस्कारासाठी निवडण्यात येणारे चित्रपटांचे विषय, त्यामागची प्रेरणा, त्याची मांडणी या सर्व बाबींची ओळख होऊन आपल्या भूमीतही फिल्म साक्षरता निर्माण व्हावी हा या 'फेस्टिवल'चा प्रमुख उद्देश आहे. प्रसिध्द अभिनेत्री माधुरी दीक्षित आणि श्रीराम नेने निर्मित तसेच जयंत जठार आणि राहुल आवटे दिग्दर्शित 'पंचक' या मराठी चित्रपटाने या फिल्म फेस्टिवलचे उद्घाटन होणार आहे. पुढे 12 आणि 13 मार्चला प्रत्येकी आठ-आठ चित्रपट दाखविण्यात येणार आहे. 17 देशी-विदेशी चित्रपटांची रेलचेल चंद्रपुरात राहणार आहे. (International Film Festival) यात सहा भारतीय चित्रपट आहेत. पंचक, मदार आणि टेरिटरी या तीन मराठी चित्रपटांचाही समावेश आहे. 'टेरिटरी' हा मराठी चित्रपट वाघांच्या अधिवासावर आधारित असून, चंद्रपूर येथील सचिन मुल्यमवार व स्थानिकांनी हा चित्रपट तयार केला आहे. इतर तीन भारतीय चित्रपटांमध्ये निहारिका (बंगाली), टोरांज हजबंड (आसामी) आणि बिगीनिंग (तामीळ) यांचा समावेश आहे. तसेच विदेशी चित्रपटांमध्ये जर्मनी, फ्रान्स, कतार, चिली, अर्जेंटिना, पॅलेस्टाईन, कॅनडा, बेल्जीयम, डेन्मार्क आणि इराण या देशातील चित्रपट त्यांच्या मूळ भाषेत आणि इंग्रजी भाषेसह दाखविण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे, हे सर्व 17 चित्रपट अप्रदर्शीत आहेत. त्यामुळे प्रदर्शित होण्यापूर्वीच चंद्रपुरच्या नागरिकांना या चित्रपटांचा आस्वाद घेता येणार आहे. जिल्ह्यातील चित्रपटप्रेमींनी तीन दिवसीय 'फिल्म फेस्टिवल'चा आनंद घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य विभागाने केले आहे.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो. 9421717068
Post a Comment
0Comments