२० मार्च १९२७ महाड संगर दिवस, मानवी हक्क दिवस (20th March 1927 Mahad Sangar Day, Satyagraha of Chavdar Lake, Human Rights Day)

Vidyanshnewslive
By -
0

२० मार्च १९२७ महाड संगर दिवस, मानवी हक्क दिवस (20th March 1927 Mahad Sangar Day, Satyagraha of Chavdar Lake, Human Rights Day)

नागपूर :- या दिवशी डॉ.बाबासाहेबांनी जनसमुदाय सोबत घेऊन चवदार तळ्याच्या पायऱ्या उतरून खाली गेले. खाली वाकले. तळ्यातील ओजळभर पाणी घेऊन प्राशन केले त्याचेच अनुकरण प्रचंड जनसमुदायाने केले. हाच तो दिवस माणसाला माणूस म्हणून मानवी अधिकार देण्याचा दिवस. नागरिक म्हणून मानवी हक्क मिळण्याचा दिवस. भारताच्या इतिहासातील सुवर्णाक्षरांनी नमूद करण्याचा दिवस. माणुसकीचा आणि समतेचा संदेश  भारताला देण्याचा सोन्याचा दिवस. हा दिवस म्हणजे बलढ्यावर कमकुवतांच्या विजयाचा दिवस, स्पृश्यांवर अस्पृश्यांचा विजय, अमानवी वृत्तीवर मानवतेचा विजय, विषमतेवर समतेचा विजय. शतकानुशतके स्पृश्य हिंदूंच्या दास्यात जडखडलेला अस्पृस्य समाज आपले मानवी हक्क प्रस्थापित करण्यासाठी स्पृश्य हिंदूंसमोर दंड थोपटून उभा राहिला. बंड करून उभा राहिला, स्वभामनाने, स्वावलंबनाने छाती ठोकून ताठ मानेने उभा राहिला. अन्यायी धर्माची अन्यायी बंधने ठाम पणे नाकारू लागला. ह्याच दिवशी डॉ.बाबासाहेबांनी संपूर्ण दिनदुबळ्या समाजाला माणसात आणून मानवी हक्कांची जाणीव करून दिली. महाड संगर दिवस हा फक्त एवढ्यावरच थांबत नाही. या दिवसाच्या अनुषंघाने दोन गोष्टी महत्वपूर्ण घडल्या. एक २० मार्च आधी व दुसरी २० मार्च नंतर.  पूर्वीची घटना म्हणजे महाड परिषदेच्या अगदी बरोबर पाच दिवस आधी म्हणजे १३ मार्च १९२७ रोजी समता सैनिक दलाची स्थापना*. दुसरी नंतरची  घटना म्हणजे बहिष्कृत भारत हे पाक्षिक ३ एप्रिल १९२७ रोजी बहिष्कृत हितकारणी सभेच्या वतीने सुरू केले.  स्वतः या पाक्षिकाचे संपादन केले आणि ह्या पक्षिकाला चळवळीचे स्वरून दिले. याच पाक्षिकात आत्मवृत्त नावाच्या सदरात महाड येथील सामाजिक क्रांतीचा वृत्तांत छापण्यात आला त्याच जोडीला डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे अध्यक्षीय भाषणही छापण्यात आले. त्यातल्या त्यात अतिशय महत्त्वाची म्हणजे आजकालचे प्रश्न  या स्तंभाखाली तीन विशेष अग्रलेख प्रकाशित केले..

१ महाड येथील धर्मसंगर आणि  व वरीष्ठ हिंदूंची जबाबदारी

२ महाड येथील धर्मसंगर आणि इंग्रज सरकारची जबाबदारी

३ महाड येथील परिषद व अस्पृस्य वर्गाचे कर्तव्य. 

वरील तीन स्तंभ लेखन करून सर्वाना त्यांच्या जबाबदारी ची जाणीव करून दिली. एवढेच नाही तर सर्वांनी आपल्या आपल्या जबाबदारी ने वागले तर कोणाचे शोषण होणार नाही याचा पाठ शिकवला. तीनही स्तंभ लेखन वाचण्यासारखे आहेत.

           बाबासाहेबांनी शिक्षण पूर्ण करून भारतात आले. उच्च दर्जाचे विदेशी शिक्षण घेऊन भारतात आले तरीही त्यांना जातीयवादाचा चटके सोसावे लागले. त्यांचे मन विव्हळले. आणि माझ्या समाजबांधवांना या शोषणातून मुक्त करण्याचे कार्य हाती घेतले. खऱ्या अर्थाने मानव मुक्तीचे आंदोलन हाती घेतले. त्या काळी इंग्रजी राजवट असली तरी मनुस्मृतीचा कायदा अस्तित्वात होता. माणसाला माणसासम वागणून कल्पनातीत सुद्धा नव्हते. 1920 ची  बहिष्कृत वर्गाची माणगाव परिषद  ज्याचे अध्यक्षपदाचे नियोजित अध्यक्षपद डॉ.  बाबासाहेब आंबेडकरांना होते. या परिषदेच्या दुसऱ्या दिवशीच्या भाषणात राजश्री शाहू महाराज म्हणतात, तुम्ही तुमचा खरा नेता शोधून काढला.  अस्पृश्यांचा खरा नेता सापडला. आंबेडकरच अस्पृश्यांना खरा नेता होय. ते या समाजाचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाहीत, इतकेच नव्हे तर अशी वेळ येईल किबते सर्व हिंदुस्थानात चे पुढारी होतील. या शब्दात बाबासाहेबांचे कौतुक केले. बाबासाहेबांची कौन्सिल मध्ये निवड झाल्यानंतर सरकारी खर्चावर चालणारे पाणवठे, मंदिरे सर्वच जातीधर्मातील लोकांना वापरण्यास खुला करावा असा आग्रह धरून लावला. यात बाबासाहेबांना यश सुद्धा आले. कौन्सिल ने तसा वटहुकूम सुद्धा काढला. तरीही सवर्ण हिंदूंनी त्याला न जुमानता कोणी सरकारी पाणवठ्यांवर एखादा अस्पृश्य पाणी पिण्यास गेला तर विटाळ झाला म्हणून त्याला मारहाण होत असे, त्याला शिक्षा दिली जात असे, त्याचा अमानुष छळ होत असे. गुरे-जनावरे पाणी पिऊ शकत होते, मंदिरात जाऊ शकत असत मात्र अस्पृश्य माणूस असून मंदिरात जाऊ शकत नसे. ही अशी अस्पृश्यांना  अमानवी  वागणूक मिळत असल्याचे बघून कुलाबा जिल्ह्यात परिषद घेण्याचे ठरले व त्याचे अध्यक्षपद बाबासाहेबांनी भूषवावे असा आग्रह तेथील कार्यकर्त्यांनी केला. परिषद झाली. अनेक महत्वपूर्ण ठराव पारित झालेत. अनंतराव चित्रे यांची एक सूचना महाड तलावावर जाऊन तलावाचे पाणी ओंजळीत घ्यावे आणि आपला हक्क बजावल्या जावा. ठराव लगेच मजूर झाला आणि सर्व शिस्तबद्ध तलावाकडे निघाले बाबासाहेब पुढे त्यांचा पाठीमागे सर्व कार्यकर्ते. बाबासाहेब  काही पायऱ्या खाली उतरले आणि पाणी ओंजळीत घेतले नाही तर प्राशन केले. ही गग्टन लहानशी वाटते परंतु न भूतो न भविष्यती अशी घटना आहे. जगाच्या पाठीवर कधीही न घडू शकणारी घटना म्हणावी लागेल. निसर्गाच्या पाण्यासाठी असलेला हा पहिलाच सत्याग्रह म्हणावा लागेल. हा सत्याग्रह नसून दुबळ्यांचा सबळांशी , गुलामांचा प्रस्थापितांशी, असलेला लढा होता. 

        गुलाम आपल्या बरोबर येतील या भीतीने सवर्ण हादरले आणि सभामंडपात येऊन अस्पृश्य बांधव पंगतीत जेवण करीतच होते तेवढ्यात त्यांच्यावर हल्ला केला. कोणी जखमी तर कोणी बेहोष पडले. बाबासाहेबांचे हे चित्र बघून काळीज विव्हळते. क्रोधगणी मस्तकात जातो तरीही सर्व्हीस शक्ती एकवटून शांत होऊन आपल्या कार्यकर्त्यांना शांत राहण्याचा आदेश देतात नाही तर महाड सत्याग्रहाचा बाजूला दुसरा रक्ताचा तलाव व्हायला वेळ लागला नसता. सर्व कार्यकर्ते अतिशय चिडले, संतापले होते मात्र बाबासाहेबांचा आदेश झुगारुन लावू शकता नव्हते. हे आंदोलन तर यावेळी शांत झाले मात्र खरी लढाई इथून सुरू झाली. त्यानंतर ज्या धर्म ग्रंथाने असे नियम घालून दिले त्याधर्म ग्रंथाची होळी बाबासाहेब सहस्त्रबुद्धे या ब्राह्मण व्यक्तीच्या पुढाकाराने करतात. इकडे अस्पृश्य लोकांच्या मनात स्वाभिमानाची जागृती करतात, तर दुसरीकडे काही पुरोगामी सवर्ण सोबत घेऊन त्यांच्या हाताने त्यांच्याच धर्म कसा वाईट हे दाखवून देतात. महाड केस जवळपास 10 वर्षे कोर्टात लढतात आणि त्यात विजय संपादन करतात. त्यानंतर मंदिर प्रवेश करण्याचा पर्यत करतात. एक एक मानवी मूल्य मिळवून देण्याचा प्रयत्न बाबासाहेब करीत होते. ज्या लोकांनी राम कृष्ण पांढुरंग यांना पिढ्या नि पिढ्या आपला देव मानला व त्याची पूजा केली त्याच्या जवळ जाण्यास यांना मनाई कशी? बाबासाहेब अस्पृश्य लोकांना दाखवून देत होते की तुम्ही फक्त गुलाम आहेत तुम्हाला कवडीचाही स्वाभिमान नाही, इज्जत नाही. जागा होण्यास प्रवृत्त करीत होते. त्यानंतर मात्र बाबासाहेबांना याच मृत पडलेल्या मानसिक लोकांच्या मनात स्वाभिमानाची ज्योत पेटवली आणि मागे कधी वळून बघितले नाही. गोलमेज परिषदेत जाऊन आपल्या बांधवांची दैना मांडली. त्यांच्या साठी प्रतिनिधित्व मागितले. कारण गोलमेज परिषद ही कम्युनल ऍक्ट 1935 तयार होत होता. हेच भारताचे सविधान असणार होते म्हणून अतिशय पोटतिडकीने अस्पृश्यांच्या समस्या मांडल्या आणि अधिकार मिळवून घेतले. तेच नंतर संविधानात समाविष्ठ केले. भारतीय संविधानाने मूलभूत अधिकार तसेच राज्यासाठी निर्देशक तत्वे अशा दोन्ही पातळीवर देशात नागरिकांना आणि सत्तेला बांधून ठेवले. महाड सत्याग्रह हा सत्याग्रह नसून खऱ्या अर्थाने मानव मुक्तीचा लढा होता. मानवी मूलभूत अधिकाराचा लढा होय. माणसाला माणूस म्हणून जगण्यास प्रवृत्त करणारा लढा होय. शेवटी याच अस्पृश्य वर्गाला खरी माणूस म्हणून त्याची वेगळी ओळख करून देतात बौद्ध तू आता महार नाही किंवा हिंदू नाही तर तुझी स्वतंत्र ओळख आहे बौद्ध असा धर्म देतात ज्या धर्मांत समानता आहे. ईश्वर आत्म्याला जागा नाही जो विज्ञानवादी आहे. अशा पध्दतीने बाबासाहेब मृतगत पडलेल्या अस्पृश्य बांधवाला विज्ञानवादी विचार देऊन जगाशी जोडतात. त्याला मुक्त करतात. म्हणूनच हा अस्पृश्य समाज  बौद्ध बनून स्वाभिमानाने जगत आहे. दिवसाच्या निमित्ताने बाबासाहेबांनी समता,स्वातंत्र्य, न्याय, बंधुता, शिस्त, सामाजिक चळवळ, मानवी अधिकार, ज्ञान आणि जागृती करण्याचे धडे आपल्याला दिलेले आहेत. तेच आपल्याला आजच्या दिवशी  आपल्या आयुष्यात अंगिकरायच्या आहेत. 


विद्यांश न्युज च्या वतीने महाड संगर दिवसाच्या समस्त आंबेडकरी जनतेला खूप खूप मंगल सदिच्छा

अतिथी मार्गदर्शक :- आयु. उज्वला गणवीर, नागपूर 

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो.9421717068

                                    

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)