चंद्रपुरात 1 व 2 एप्रिलला साजरा होणार " पहिले राष्ट्रीय जयभीम साहित्य संमेलन " संमेलनात देशभरातील साहित्यिक, नाटककार, विचारवंत, चळवळीतील कार्यकर्त्यांची उपस्थिती लाभणार "First National Jaibhim Sahitya Sammelan" will be celebrated in Chandrapur on 1st and 2nd April. Literary, dramatists, intellectuals, activists from all over the country will be present in the meeting.
चंद्रपूर :- लोकजागृती नाट्यकला मंच सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक संस्था चंद्रपूरच्या वतीने १ आणि २ एप्रिलरोजी पहिल्या राष्ट्रीय जयभीम संमेलनाचे आयोजन स्थानिक प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृहात करण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष अनिरुद्ध वनकर, प्रा. इसादास भडके, भारत रंगारी यांनी मंगळवारी पत्रपरिषदेत दिली. साहित्य संमेलनात देशभरातील साहित्यिक, वैचारिक लोककलावंत, जलसाकार, नाटककार, वक्ते, चळवळीतील कार्यकर्ते, नेते, विचारवंत उपस्थित राहून वेगवेगळ्या विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत. त्यामुळे हे संमेलन चंद्रपूरकरांसाठी बौद्धिक मेजवानी ठरणार आहे. संमेलनाचे उद्घाटन १ एप्रिलरोजी सायंंकाळी ४ वाजता माजी मंत्री आमदार विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते होणार आहे. ज्येष्ठ साहित्यिक डॉ. रावसाहेब कसबे संमेलनाध्यक्ष असतील तर अनिरुद्ध वनकर स्वागताध्यक्ष राहतील. याप्रसंगी खासदार बाळू धानोरकर, आमदार सुभाष धोटे, आ. सुधाकर अडबाले, आ. अमोल मिटकरी, माजी राज्यमंत्री तथा आ. संजय बन्सोड, आशिष जाधव, गोंडवाना विद्यापीठाचे कुलसचिव अनिल हिरेखन, ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे, तहसीलदार कमलाकर मेश्राम आदींची प्रामुख्याने उपस्थिती राहणार आहे. उद्घाटनानंतर जयभीम कविसंमेलन होणार आहे. बुलडाणा येथील भाऊ भोजने यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित आणि लोकनाथ यशवंत यांच्या उपस्थिती होणाऱ्या या कविसंमेलनात राज्यातील आणि बाहेर राज्यातील नामांकित कवी सहभागी होतील. कविसंमेलनानंतर जयभीम परिसंवाद होणार असून, भारतीय लोकशाही आणि महाराष्ट्रातील सत्तांतर या विषयावरील परिसंवादात आमदार अमोल मिटकरी, माजी सनदी अधिकारी ई. झेड. खोब्रागडे, डॉ. इसादास भडके, मेघराज कातकर सहभागी होतील. रविवारी दुपारी ४ वाजता जयभीम जलसा कार्यक्र म होणार असून, आनंद किर्तने, अनिरुद्ध शेवाळे, धम्मजीत तिगोटे सहभागी होतील. तर प्राचार्य डॉ. रत्नाकर अहिरे, डॉ. पुरुषोत्तम निमसरकार, माजी नगराध्यक्ष सुनिता लोढीया मार्गदर्शन करणार आहेत. सायंकाळी ४.३० वाजता कवी संमेलन होणार आहे. सायंकाळी ५ वाजता आंबेडकरवादी चळवळीची आर्थिक स्थिती? या विषयावर परिसंवाद होणार असून, समाजकल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे मार्गदर्शन करतील. सायंकाळी ६ वाजता उषाकिरण आत्राम आणि डॉ. शुभांगी पाटील वेगवेगळ्या विषयावर एकपात्री नाटिका सादर करतील सांयकाळी ६ वाजता स्वागताध्यक्ष अनिरुद्ध वनकर यांची मुलाखत होणार आहे. सायंकाळी ७ वाजता सांगता होणार आणि रात्री ८ वाजता बुद्ध भीम गीतांचा महाजलसा होणार असल्याची माहिती यावेळी आयोजकांनी दिली. यासोबतच लोकजागृती नाट्यकला क्रीडा सांस्कृतिक, शैक्षणिक व सामाजिक संस्था चंद्रपूरच्या वतीने यावर्षीपासून जयभीम कला, साहित्य पुरस्कारांची घोषणा केली असून, यावर्षीचे पुरस्कारही संस्थेचे अध्यक्ष अनिरुद्ध वनकर यांनी या पत्रकार परिषदेत जाहीर केले आहेत. यावर्षीचा जयभीम कला पुरस्कार भारत रंगारी, जयभीम कविसाहित्य पुरस्कार खेमराज भोयर तर जयभीम सामाजिक, शैक्षणिक पुरस्कार रमेशचंद्र राऊत यांना जाहीर करण्यात आला. जयभीम साहित्य संमेलनात या पुरस्काराचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे. सन्मान राशी, शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्कार स्वरुप असेल अशी माहिती यावेळी अनिरुद्ध वनकर यांनी दिली.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्यूज), मो. 9421717068
Post a Comment
0Comments