Advertisement

Responsive Advertisement

Live cricket

"लविना" हा दगडावर कोरलेला शब्द नसून प्रियकराने आपल्या प्रेयसीच्या आठवणीत दगडावर कोरलं नाव....! ("Lavina" is not merely a word carved in stone; it is a name etched onto the stone by a lover in memory of his beloved...!)

"लविना" हा दगडावर कोरलेला शब्द नसून प्रियकराने आपल्या प्रेयसीच्या आठवणीत  दगडावर कोरलं नाव....! ("Lavina" is not merely a word carved in stone; it is a name etched onto the stone by a lover in memory of his beloved...!)

बल्लारपूर :- दगडावर कोरलेलं प्रेम... "मेरे महबूब कहीं और मिला कर..." या छायाचित्रातील "लविना" हा दगडावर कोरलेला शब्द माझ्यासाठी केवळ एक नाव नव्हतं; तो माझ्या बालपणाचा अविभाज्य भाग होता. चंद्रपूर मार्गावर, जुन्या पॉवर हाऊस जवळचा तो काळाकभिन्न दगड... राज्य परिवहनच्या बसच्या खिडकीतून तो दिसला की, "आपलं गाव आलं!" अशी जाणीव व्हायची. नंतर मित्रांसोबत सायकलवरून ये-जा करतानाही ती नजर नकळत त्या कोरीव अक्षरांकडे वळायची. मोठा झालो, तेव्हा समजलं कोणीतरी एका प्रियकराने आपल्या प्रेयसीच्या आठवणीत हे नाव दगडावर कोरलं होतं. आज प्रश्न पडतो... तो प्रेमी आता किती वर्षांचा असेल? ती "लविना" कुठे असेल? तिने कधी हा दगड पाहिला असेल का? हे प्रेम एकतर्फी होतं की दोघांचं ? आजच्या काळात प्रेमाला नकार मिळाला तर काही विकृत प्रवृत्ती ऍसिड हल्ले करतात, बदनामी करतात, जीव घेतात. पण त्या काळचा हा प्रेमी तसा नव्हता. त्याने आपल्या प्रेमाचा सूड घेतला नाही; उलट आपल्या वेदना दगडावर कोरल्या. त्या दगडाला जिवंत केलं. साधारण पन्नास वर्षांपूर्वी, सुनसान रस्त्यालगत, हातात छिन्नी आणि हातोडा घेऊन त्याने आपल्या मनाचा इतिहास दगडात लिहिला. त्या दगडाने अनेक उन्हाळे पाहिले, पावसाळे झेलले, हजारो प्रवाशांचे चेहरे निरखून पाहिले. काळ बदलला, माणसं बदलली, रस्ते बदलले; पण त्या अक्षरांमधलं प्रेम अविरत तसंच राहिलं.
           कधी ती "लविना" त्या रस्त्याने गेली असेल का? स्वतःचं नाव दगडावर पाहून तिच्या डोळ्यांत काय आलं असेल? आणि तो प्रेमी... आज नातवंडांबरोबर खेळत असताना, जर त्या जागेवरून गेला असेल, तर त्याच्या तारुण्याच्या आठवणींचा हुंदका त्याच्या मनात दाटून आला असेल का? तो श्रीमंत नव्हता. त्याच्याकडे ताजमहाल उभारण्या इतकी सत्ता, संपत्ती नव्हती. म्हणून त्याने प्रेमाचं स्मारक दगडात कोरलं. रस्ता रुंद झाला. विकास झाला. पण तो दगड गेला. जेसीबीच्या फटकाऱ्यांनी केवळ दगड फोडला नाही; अनेकांच्या आठवणींचाही एक तुकडा उध्वस्त केला. म्हणूनच साहिर लुधियानवींच्या ओळी पुन्हा आठवतात "एक शहंशाह ने दौलत का सहारा लेकर, हम गरीबों की मोहब्बत का उड़ाया है मज़ाक..." मेरे महेबूब कई और मिला कर मुझसे.अनगिनत लोगों ने दुनिया में मुहब्बत की है कौन कहता है कि सादिक़ न थे जज़्बे उनके.. आज काही जण म्हणतात, "लविना" हे नाव कदाचित काल्पनिक असेल. असू दे. नाव काल्पनिक असलं तरी त्या मागचं प्रेम काल्पनिक नव्हतं. त्या छिन्नीच्या प्रत्येक घावात एक धडधडणारं हृदय होतं. आजही त्या मार्गाने जाताना नकळत माझी नजर त्या जागेकडे वळते. दगड दिसत नाही, पण आठवणी दिसतात. आणि त्या आठवणींमध्ये मी स्वतःलाच शोधत राहतो. रस्ता रुंद झाला... पण आठवणींचा तो दगड हरवला. 'लविना' हे नाव पुसलं गेलं असेल, पण प्रेमाची ती खूण अजूनही हजारो मनांत कोरलेली आहे. माणूस दगडावर प्रेम कोरू शकतो; पण विकासाच्या नावाखाली त्या प्रेमाच्या खुणा पुसण्याचा अधिकार कोणाला आहे? 

संकलन :- पवन भगत, चंद्रपूर  9067611890

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या