नवी दिल्लीच्या जंतर-मंतर विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीमार एका विद्यार्थिनीच्या मृत्यूची घटनेच्या विरोधात बल्लारपूरात महाविकास आघाडीचे जनआक्रोश आंदोलन (The Maha Vikas Aghadi staged a 'Jan-Aakrosh' (public outcry) protest in Ballarpur against the alleged lathi-charge on students at Jantar Mantar in New Delhi and the death of a female student.)
बल्लारपूर :- नवी दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान उपोषणाला बसलेल्या सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ आंदोलन करणाऱ्या युवक-युवती व विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीमार, एका विद्यार्थिनीच्या मृत्यूची घटना तसेच काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या अटकेच्या निषेधार्थ गुरुवारी बल्लारपूर येथे काँग्रेसच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय जनआक्रोश आंदोलन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या जवळ दुपारी १ वाजता सुरू झालेल्या या आंदोलनात काँग्रेस कार्यकर्त्यांसह विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी आणि मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. साडेतीन वाजेपर्यंत सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. आंदोलनकर्त्यांनी लोकशाही मार्गाने होणाऱ्या आंदोलनांवर कथितपणे करण्यात आलेल्या बलप्रयोगाचा निषेध नोंदवत या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.
सभेला संबोधित करताना विविध वक्त्यांनी शांततापूर्ण आंदोलन करणे हा प्रत्येक नागरिकाचा घटनात्मक अधिकार असल्याचे सांगितले. आंदोलनकर्त्यांचा आवाज दडपण्यासाठी बलप्रयोग करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. संबंधित घटनेची उच्चस्तरीय व निष्पक्ष चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी तसेच आंदोलनकर्त्यांच्या सुरक्षेची हमी देण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. या आंदोलनात नगराध्यक्षा डॉ. अलका वाढई, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख सिक्की यादव, काँग्रेस शहराध्यक्ष अब्दुल करीम शेख, नगर परिषदेचे उपाध्यक्ष देवेंद्र आर्य, माजी नगराध्यक्ष घनश्याम मुलचंदानी, सेवानिवृत्त प्राचार्या प्रकृती पाटील, अफसाना सैय्यद, डॉ. अनिल वाढई, मीनाक्षी गलगट, ज्योती गहलोत, कल्पना गोरघाटे, शिल्पा चुटे, प्रियंका थूलकर, रवी मातंगी, इस्माईल ढाकवाला, नर्सिंग रेब्बवार, ॲड. आय. आर. सय्यद यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी वक्त्यांनी आपल्या भाषणातून पंतप्रधान तसेच केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणीही केली. राष्ट्रगीताने या आंदोलनाची शांततापूर्ण वातावरणात सांगता करण्यात आली. सभेनंतर आंदोलनकर्त्यांनी तहसील कार्यालयापर्यंत मोर्चा काढून तहसीलदार रेणुका कोकाटे यांच्यामार्फत राष्ट्रपतींच्या नावे निवेदन सादर केले. निवेदनात कथित लाठीमाराची निष्पक्ष चौकशी, जबाबदार व्यक्तींवर कठोर कारवाई तसेच आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांवर तातडीने निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
0 टिप्पण्या