चंद्रपूर - एकीकडे सत्ताधाऱ्या कडून भारताला विश्वगुरू होण्याचे दिव्य स्वप्न दाखवले जात आहेत तर दुसरीकडे पुरोगामी महाराष्ट्रात वेळेत सुविधा मिळत नसल्यामुळे लोकांना आपला जीव गमवावा लागत आहे. अशीच एक धक्कादायक घटना चंद्रपूर जिल्ह्याच्या जिवती तालुक्यातील घोडनकप्पी गावातून समोर आली आहे. येथे खराब रस्त्यामुळे रुग्णवाहिका वेळेवर पोहोचलीच नाही. ज्यामुळे बाळाचा जन्म झाला, परंतू प्रसूतीनंतर मातेचा आपला जीव गमवावा लागला आहे. निवडणुकीच्या काळात सत्ताधाऱ्याकडून विकासाचे मोठ- मोठे दावे केले जातात, परंतू आदिवासी आणि दुर्गम भागात जमीनी स्तरावर या उलट चित्र आहे. कारण चंद्रपूर जिल्ह्यातील ग्रामीण व दुर्गम भागांमध्ये मूलभूत सुविधांचा अभाव दिसून आला. खराब रस्त्यामुळे घोडनकप्पी गावात वेळेत वैद्यकीय सुविधा न मिळाल्यामुळे एका महिलेची प्रसूती झाली. तिने बाळाला जन्म दिला, मात्र महिलेला आपला जीव गमवावा लागला. संगीता गेडाम असे या मृत महिलेचे नाव आहे. या घटनेमुळे गावकऱ्यामधून संताप व्यक्त केला जात आहे. जिवती तालुक्यातील घोडनकप्पी हे गाव तेलंगाणा सीमेवर असून अतिशय दुर्गम असलेल्या या गावात पक्का रस्ता नाही. रविवारी पहाटे संगीता यांना प्रसूती वेदना सुरू झाल्या. कुटुंबीयांनी त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न केला. परंतु गावाकडे जाणारा रस्ता अत्यंत खराब असल्याने रुग्णवाहिका मुख्य रस्त्यापर्यंतच येऊ शकली नाही. त्यामुळे कुटुंबियांनी तिला डोंगर उतरवून रस्त्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न केला; मात्र, वेदना असह्य झाल्याने त्यांना पुन्हा घरी आणावे लागले. घरातच झालेल्या प्रसूतीत संगीताने एका गोंडस बाळाला जन्म दिला. मात्र संगीता यांना प्रसूतीनंतर अतिरक्तस्राव सुरू झाला. माहिती मिळताच आरोग्य विभागाच्या पथकाने गावात पोहोचून उपचार सुरू केले. प्रकृती गंभीर होत असल्याने त्यांना खाजगी मालवाहू वाहनातून शंकर पठार येथे उभ्या असलेल्या रुग्णवाहिकेपर्यंत नेण्यात आले. मात्र, उपचारासाठी रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच वाटेत तिचा मृत्यू झाला. या महिलेची आरोग्य विभागाकडून नियमित तपासणी करण्यात येत होती. आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घोडनकप्पी गावात रस्ता नसल्यामुळे संबंधित महिलेला आधीच माहेरी जाण्याची किंवा पाटण येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात त्या महिलेची पूर्ण व्यवस्था करण्याची तयारी दर्शवली होती. मात्र, महिलेनेच माहेरी जाण्यास किंवा आरोग्य केंद्रात राहण्यास नकार दिला, अशी, माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
0 टिप्पण्या