नागभूमितून कॉकरोच जनता पार्टीचा एल्गार, केंद्रीय शिक्षण मंत्र्याच्या राजीनाम्याशिवाय माघार नाही ('Cockroach Janata Party' launches a battle cry from Nagbhumi; no backing down without the Union Education Minister's resignation.)

20 जून रोजी दिल्लीत मोठे आंदोलन होणार

नागपूर :- नीट पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, या मागणीसाठी कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांच्या नेतृत्वात सध्या देशव्यापी आंदोलन करण्यात येत आहे. 6 जून रोजी नवी दिल्ली येथील जंतरमंतरवर अभिजीत दिपके यांच्या नेतृत्वात आंदोलनाला सुरुवात करण्यात आली. यानंतर आता देशभर आंदोलन करण्यात येत आहे. अभिजीत दिपके यांनी आज (16 जून) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर येथील संविधान चौकात आंदोलन केले. दरम्यान आंदोलनापूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत अभिजीत दिपके यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतल्याशिवाय माघार नाही, असा इशारा दिला आहे. 
                यासंदर्भात पत्रकार परिषदेत अभिजीत दिपके म्हणाले की, 6 जून रोजी जंतर-मंतर येथे आंदोलन करून सरकारला अल्टिमेटम देण्यात आला होता. आज नागपुरात आंदोलन करण्यात येत आहे.
येत्या 20 जून रोजी दिल्लीत मोठे आंदोलन होणार असून केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घेतल्याशिवाय आम्ही परतणार नाही. कोणत्याही प्रकरणात जबाबदारी निश्चित होणे आवश्यक आहे, मात्र कोणीही जबाबदारी स्वीकारण्यास तयार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनंती आहे की, केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा. मोदी सरकारला सत्तेत 4 हजार दिवसांहून अधिक कालावधी झाला आहे. या काळात पेपर लीक न झालेल्या चार परीक्षा दाखवाव्यात. टेलिग्रामवर कारवाई करून काही फरक पडणार नाही. पाच विद्यार्थी आत्महत्या करतात आणि संबंधित अधिकाऱ्याची केवळ बदली केली जाते. विद्यार्थ्यांच्या जीवाची किंमत इतकीच आहे का? असा प्रश्न उपस्थित करत दिपके यांनी संताप व्यक्त केला. राजस्थान येथील जयपूरमध्ये झालेल्या हल्ल्याबाबत बोलताना अभिजीत दिपके म्हणाले की, माझ्यावर काल झालेला हल्ला हा बेरोजगारीच्या समस्येतून निर्माण झालेल्या परिस्थितीचा परिणाम आहे. हल्ला करणाऱ्या व्यक्तीकडे चांगली नोकरी असती, तर कदाचित असा प्रकार घडला नसता. आजवर सत्तेत आलेल्या सर्व पक्षांनी एकच केले आहे. मात्र सध्या जे सत्तेत आहेत, त्यांनाच आम्ही प्रश्न विचारणार आहोत, अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली. 
            अभिजीत दिपके म्हणाले की, एखाद्या मंत्र्याचा राजीनामा मिळवण्यासाठी राजकीय पक्ष स्थापन करावा लागतो, ही अत्यंत लाजिरवाणी बाब आहे. उद्या कोणाच्या घरात पाणी किंवा वीज आली नाही, तर त्यासाठीही राजकीय पक्ष स्थापन करावा लागणार का? असा प्रश्न उपस्थित करत अभिजीत दिपके म्हणाले की, देशात हिंदू-मुस्लिम मुद्यांवर राजकारण केले जाते. मात्र यातून युवकांना काय मिळते? तर काहीच नाही. त्यामुळे आमचे आंदोलन पूर्णपणे शांततापूर्ण असणार आहे. आम्हाला बांगलादेश किंवा नेपाळकडे पाहण्याची गरज नाही. महात्मा गांधी यांनी आंदोलनाच्या माध्यमातून परिवर्तन घडवले आणि भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले. त्यामुळे लोकशाहीत आंदोलनाला महत्त्वाचे स्थान आहे. माझ्या कुटुंबाप्रती जबाबदारी आहेच, पण देशाप्रती असलेली जबाबदारी त्याहून मोठी आहे. स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत नेमकी कोणती शहरे स्मार्ट झाली, हे दाखवावे, असे आवाहन करतानाच अभिजीत दिपके म्हणाले की, मी अनेक राज्यांमध्ये फिरलो आहे, मात्र कुठेही मला अपेक्षित स्वच्छता दिसली नाही. 

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068