स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, सावली बनावट तंबाखू कारखान्यावर धाड : ११.३१ लाखांचा मुद्देमाल जप्त (Local Crime Branch Action: Raid on Spurious Tobacco Factory in Savli; Contraband Worth ₹11.31 Lakhs Seized)
चंद्रपूर :- जिल्ह्यात प्रतिबंधित सुगंधित तंबाखूच्या अवैध उत्पादन व विक्रीच्या रॅकेटला मोठा धक्का देत स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी) चंद्रपूर, सावली पोलीस आणि अन्न सुरक्षा विभागाने संयुक्त कारवाईत बनावट तंबाखू निर्मिती केंद्राचा पर्दाफाश केला आहे. रयतवारी ता. सावली येथे टाकलेल्या धाडीत ११ लाख ३१ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एका आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांना मिळालेल्या माहितीनुसार, रयतवारी येथे विजय भिमाजी भांडेकर (वय ३३), रा. सामदा बु., ता. सावली हा शासनाने प्रतिबंधित केलेल्या सुगंधित तंबाखूचा साठा करून मशीनच्या सहाय्याने बनावट तंबाखू तयार करत असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीची पडताळणी केल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखा, सावली पोलीस आणि अन्न सुरक्षा विभागाच्या पथकाने संयुक्त छापा टाकला.
धाडी दरम्यान HOLA आणि EAGLE ब्रँडचा हुक्का शिशा तंबाखू, खुला सुगंधित तंबाखू, पॅकिंग साहित्य, उत्पादनासाठी वापरण्यात येणारी यंत्रसामग्री तसेच वाहन क्रमांक MH-34-CJ-9625 जप्त करण्यात आले. जप्त करण्यात आलेल्या सर्व साहित्याची किंमत ११.३१ लाख रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपीची चौकशी केली असता, तंबाखू निर्मितीसाठी लागणारा कच्चा माल व साहित्य गडचिरोली येथील गोकुळ वॉर्ड निवासी विनय गुप्ता याच्याकडून खरेदी केल्याची माहिती समोर आली. तपासात आरोपी मोठ्या प्रमाणावर बनावट तंबाखूचे उत्पादन करून त्याची बाजारात विक्री करत असल्याचे निष्पन्न झाले आहे.
सार्वजनिक आरोग्यास गंभीर धोका निर्माण करणाऱ्या या प्रकारामुळे अन्न सुरक्षा व मानके अधिनियम २००६ तसेच भारतीय न्याय संहिता (बीएनएस) अंतर्गत संबंधित कलमान्वये सावली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील पुरवठा साखळी, आर्थिक व्यवहार आणि इतर संबंधित आरोपींचा शोध घेण्याच्या दृष्टीने तपासाची व्याप्ती वाढविण्यात आली आहे. सदर कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सत्यजित आमले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे, सावलीचे पोलीस निरीक्षक प्रदीप पुल्लरवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक कॉक्रेटवार, बलराम झाडोकर, पोलीस उपनिरीक्षक विनोद भुरले, संतोष निंभोरकर, सर्वेश बेलसरे,सफौ. धनराज करकडे, पोहवा गणेश भोयर,चेतन गज्जलवार, संतोष येलपुलवार, जयसिंग, चापोहवा, दिनेश आराडे, पोअं. सुमित बरडे, प्रफुल गारघाटे, चापोअं. मिलिंद टेकाम, ऋषभ बारसिंगे सह सावली पोलीस तसेच अन्न सुरक्षा विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केले.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
0 टिप्पण्या