बल्लारपूरात उद्या १७ जून रोजी वाघ : संवर्धन आणि व्यवस्थापन या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन (A one-day workshop on the subject of "Tiger: Conservation and Management" is being organized in Ballarpur tomorrow, June 17.)
बल्लारपूर :- मध्य चांदा वनविभाग, चंद्रपूर यांच्या वतीने संरक्षित क्षेत्राबाहेरील वाघ : संवर्धन आणि व्यवस्थापन या विषयावर बुधवार, १७ जून रोजी एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ही कार्यशाळा कारवा बल्लारशाह पर्यटन सफारी परिसर, कारवा ता. बल्लारपूर येथे सकाळी १० वाजता आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळेत वन विभागाचे अधिकारी, वन्यजीव तज्ज्ञ, पर्यावरण अभ्यासक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर सहभागी होणार असून, वाघ संवर्धनाबाबत जनजागृती आणि समन्वय वाढविण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरणार असल्याचे वन विभागाने सांगितले आहे. वाढत्या वाघसंख्येमुळे संरक्षित क्षेत्राबाहेरील भागात वाघांचा वावर वाढत असून, त्यांच्या संवर्धनासोबतच मानव-वाघ संघर्ष कमी करण्याचे आव्हान निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या कार्यशाळेत वाघांच्या संवर्धनासाठी आवश्यक उपाययोजना, त्यांच्या हालचालींचे व्यवस्थापन, मानव-वाघ संघर्ष कमी करण्याचे प्रभावी मार्ग तसेच जनजागृती यांसारख्या विविध महत्त्वपूर्ण विषयांवर तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात येणार आहे. कार्यशाळेबाबत अधिक माहितीसाठी वनपरीक्षेत्र अधिकारी राजेंद्र घोरुडे यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
0 टिप्पण्या