स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, अवघ्या १२ तासांत बंद दुकानफोडीचा गुन्हा उघड : तीन आरोपीच्या अटकेसह चोरीचा मुद्देमाल जप्त (Local Crime Branch Action: Shop Burglary Case Solved in Just 12 Hours; Three Accused Arrested and Stolen Property Seized)
बल्लारपूर :- शहरातील बामणी परिसरात घडलेल्या बंद हार्डवेअर दुकान फोडीच्या गंभीर गुन्ह्याचा छडा लावत स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर पथकाने अवघ्या १२ तासांत मोठी कामगिरी बजावली आहे. या प्रकरणात तीन आरोपींना अटक करण्यात आली असून चोरीस गेलेला सुमारे ९७ हजार ७४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे देवांशू नरेंद्र धुर्वे रा. महाराणा प्रताप वॉर्ड, बल्लारपूर, अफरोज खान फिरोज खान पठाण रा. साईबाबा वॉर्ड, बल्लारपूर व रोहित किसन धुंडेले रा. फुलसिंग नाईक वॉर्ड, बल्लारपूर अशी आहेत. सदर प्रकरणी पोलीस स्टेशन बल्लारपूर येथे अपराध क्रमांक ५००/२६ अन्वये बीएनएस कलम ३३१(३), ३३१(४), ३०५(अ), ३(५) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला होता.
गुन्हा दाखल होताच पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजचा बारकाईने अभ्यास करत तपासाची चक्रे वेगाने फिरवली. मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार पथकाने तात्काळ कारवाई करत २३ एप्रिल रोजी रात्री आरोपींना अटक केली. सदर कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वाखाली सपोनि दिपक कांक्रेडवार, पोहवा. किशोर वैरागडे, पोलीस अंमलदार गोपीनाथ नरोटे, शेखर माथनकर व चापोअं. ऋषभ बारसिंगे यांच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली. विशेष म्हणजे पोलिसांनी आरोपींकडून चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रेमशाह सयाम करीत आहेत.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या