प्रसार माध्यमे संवर्धनाशी संबंधित बाबींमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात - विनय गौडा, जिल्हाधिकारी चंद्रपूर (Media plays an important role in conservation related matters - Vinay Gowda, Collector Chandrapur)
चंद्रपूर :- महाराष्ट्र राज्यात वाघांची सर्वाधिक संख्या असलेल्या आणि विस्तीर्ण वनव्याप्ति असलेल्या चंद्रपुर जिल्ह्यात वन्यजीव पर्यटनाच्या व्यतिरिक्त इको पर्यटन आणि सांस्कृतिक पर्यटनाला चालना देण्याची गरज असून पत्रकारांनी पर्यटनाची क्षमता ही गोंंडकालीन मंदिरांमधील सांस्कृतिक पर्यटन, ऐतिहासिक स्थळे, गावांमधील खाद्यपदार्थ आणि जीवनशैली अशा बाबीमध्ये शोधण्याचे आवाहन करुन प्रसारमाध्यमे पर्यटनाला चालना देण्यासाठी तसेच संवर्धनाशी संबंधित बाबींमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात, असे प्रतिपादन चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी आज चंद्रपूर मध्ये केले. या एक दिवसीय प्रसार माध्यम कार्यशाळेची संकल्पना 'चंद्रपुरातील संवर्धन आणि विकासाच्या दिशेने प्रयत्न' अशी होती. याप्रसंगी उद्घाटकीय सत्राला केंद्रीय संस्कृत विद्यापीठाचे शैक्षणिक सल्लागार मंगेश इंदापवार, पत्र सूचना कार्यालयाचे माध्यम संवाद अधिकारी सौरभ खेकडे, धनंजय वानखेडे उपस्थित होते. विनय गौडा यांच्या हस्ते प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो पत्र सूचना कार्यालय (पीआयबी) नागपूरने आयोजित केलेल्या प्रसार माध्यम कार्यशाळेचे उद्घाटन झाले.
चंद्रपूर वन अकादमीच्या अतिरिक्त संचालक पियुषा जगताप (भारतीय वन सेवा) यांनी 'वन्यजीव संरक्षण आणि प्रसारमाध्यमांची भूमिका' या विषयावर पत्रकारांना संबोधित करताना सांगितले की, धारणा निर्माण करण्यात माध्यमांची भूमिका महत्त्वाची आहे. प्रसारमाध्यमांनी वनसंबंधित समस्यांच्या सकारात्मक आणि नकारात्मक बाजूंवर प्रकाश टाकावा. मनुष्य आणि प्राणी यांचेही संघर्षाव्यतिरिक्त सहअस्तित्व आहे, ज्याला प्रसारमाध्यमांनी चांगल्या वृत्तांकनाच्या माध्यमातून रेखांकित करणे गरजेचे आहे. इकोटूरिझमला चालना देणे, मांसाकरीता वन्यप्राण्याच्या शिकारीच्या दंडात्मक कारवाईबद्दल जागरूकता पसरवणे हे प्रसारमाध्यमांच्या वृत्तांकनासाठी काही रोचक पैलू आहेत ज्यामुळे वन्यजीव संरक्षणाबाबत महत्त्वपूर्ण जागरूकता निर्माण होऊ शकते, असेही जगताप यांनी सांगितले. जंगलावरील अवलंबित्व कमी करण्यासाठी प्रसारमाध्यमांनी 'पर्यायी उपजीविके' बद्दल संबंधितांमध्ये जागरूकता पसरवावी अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. केंद्रीय संस्कृत विद्यापीठ, नवी दिल्लीचे शैक्षणिक सल्लागार मंगेश इंदापवार 'वन्यजीव संरक्षण आणि माध्यमांची भूमिका' या विषयावरील तांत्रिक सत्राला संबोधित करताना म्हणाले की, पर्यावरणविषयक समस्यांवरील पत्रकारांनी केलेल्या वृत्तांकनामुळे पर्यावरणाशी संबंधित काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर सर्वोच्च न्यायपालिकेने स्वत:हून याचिका दखल घेतली आहे. वन्यजीव संरक्षण हे मानवी जीवनाइतकेच महत्त्वाचे आहे आणि प्रसारमाध्यमे या मुद्द्यांवर एक सजग प्रहरी म्हणून काम करत असल्याने असल्याने संबंधितांमध्ये प्रभावी बदल घडवून आणण्यास मदत होऊ शकते. पत्रकारांनी मानव वन्यजीव संघर्षाबाबत प्रश्न विचारले ज्याला श्रीमती जगताप यांनी त्यांच्या या क्षेत्रातील अनुभवांसह उत्तर दिले.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या