बल्लारपूर - राजकारणात आलो तेव्हापासून जनसेवेचे व्रत हाती घेतले आहे. सातत्याने गोरगरीब, सर्वसामान्य व कष्टकऱ्यांची सेवा करण्याचा ध्यास बाळगला आहे. जात, पात, धर्म न पाहता सेवेचा भाव मनात ठेवून कार्य केले. आंभोरा गावातील नागरिकांच्या मागणीनुसार, गावातील विविध विकासकामासाठी 1 कोटी रुपयाचा निधी मंजूर करून दिला असून यापुढेही आंभोरा गावाच्या विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. मतदारसंघातील प्रत्येक गावाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. आंभोरा (ऊर्जानगर) येथील नागरिकांशी संवाद साधताना ना.श्री. मुनगंटीवार बोलत होते. ते म्हणाले, ‘सर्वशक्तीने मतदारसंघाचा विकास करण्यासाठी मी उभा आहे. 2 वर्ष 8 महिने महविकास आघाडी सरकारमुळे या मतदारसंघातील विकासकामे पूर्णत: थांबली होती. मात्र, महायुतीच्या सरकारमुळे मतदारसंघाच्या विकासाला गती मिळाली आहे. येत्या पाच वर्षांत विविध प्रकारच्या विकासकामांतून या मतदारसंघाचे नाव महाराष्ट्रात आघाडीवर राहील अशी विकासकामे करण्यात येतील.’
‘आंभोरा, राजोली, विसापूर, कोठारी, चांदसुर्ला, गडीसुर्ला गावाच्या विविध विकासकामांसाठी निधी उपलब्ध करुन दिला. तसेच या मतदारसंघातील गरीब कुटुंबाना घरकुल देण्यात आली असून सर्वसामान्यांसाठी नमो आवास योजनेतंर्गत घरकुल उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यापुढे जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून गावातील नागरिकांचे प्रश्न व समस्या गावातच सोडविण्याचा प्रामाणिक प्रयत्न राहील, असे ना. मुनगंटीवार म्हणाले. गरजूंना विविध योजनांचा लाभ 4 लाख 72 हजार बहिणींना लाडकी बहीण योजनेद्वारे 1500 रुपये प्रतिमहा देण्यात येत आहे. 75 वर्षांवरील जेष्ठ नागरिकांना एसटी बसमधून मोफत प्रवास योजना, शेतकऱ्यांच्या खात्यात केंद्र आणि राज्य शासनाचे मिळून 12 हजार रुपये देण्यात येत आहे. या मतदारसंघात सिंचन सुविधा, महिला बचत गटासाठी मोठ्या प्रमाणात काम होणार आहे. जिल्ह्यात 5001 किलोमीटरचे पाणंद रस्त्याचे काम हाती घेण्यात आले आहे. पोंभुर्णा तालुक्यामध्ये 5 हजार एकरवर लक्ष्मी मित्तल ग्रुपचा आशियातील सर्वात मोठा उद्योग उभा राहत आहे. त्यामुळे येथील तरुणांचा प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगाराचा प्रश्न देखील सुटणार आहे. असेही ना. श्री. मुनगंटीवार म्हणाले.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
Post a Comment
0Comments