ईव्हीएम वर ‘मॉकपोल’ करून जिल्हाधिकाऱ्यांनी स्वत: केली खात्री, स्ट्राँग रुमची पाहणी (Collectors made sure themselves by conducting 'mock poll' on EVM, inspection of strong room)

Vidyanshnewslive
By -
0
ईव्हीएम वर ‘मॉकपोल’ करून जिल्हाधिकाऱ्यांनी स्वत: केली खात्री, स्ट्राँग रुमची पाहणी (Collectors made sure themselves by conducting 'mock poll' on EVM, inspection of strong room)


चंद्रपूर :- विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने चंद्रपूर तहसील कार्यालयामध्ये मतदान यंत्र सज्ज करण्याच्या प्रक्रियेची जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी यांनी पाहणी करून एका मशीनवर स्वत: ‘मॉकपोल’ करून बघितले. यावेळी चंद्रपुरचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी संजय पवार, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार विजय पवार उपस्थित होते. मतदानासाठी आता केवळ नऊ दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. त्यामुळे निवडणुकीच्या कामाबाबत प्रशासनाची लगबग वाढली आहे. 20 नोव्हेंबर 2024 रोजी होणा-या मतदानासाठी ईव्हीएम, व्हीव्हीपॅट यंत्र तयार करण्याची प्रक्रिया चंद्रपूर तहसील कार्यालयात दोन दिवस पार पडली. आज (दि. 11) जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी तहसील कार्यालयाला भेट देत मतदान यंत्र सज्ज करण्याची प्रक्रिया पाहिली. तसेच उमेदवारांच्या नावासंदर्भात तपासणी करून घेतली. यावेळी त्यांनी एका मशीनवर ‘मॉकपोल’ करून व्हीव्हीपॅटद्वारे दिसणा-या चिठ्ठीचीसुध्दा स्वत: खात्री केली. मतदानानंतर लगेच तीन दिवसांनी म्हणजे 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी असल्याने जिल्हाधिका-यांनी मतमोजणी कक्षाच्या पुर्वतयारीची पाहणी केली. यावेळी त्यांनी मतमोजणी कक्ष ले-आऊट बद्दल तसेच सीसीटीव्हीमध्ये संपूर्ण परिसर कव्हर व्हायला पाहिजे, अशा सुचना संबंधितांना दिल्या. चंद्रपूर विधानसभा मतदारसंघात एकूण 936 बॅलेट युनीट, 468 कंट्रोल युनीट आणि 503 व्हीव्हीपॅट उपलब्ध आहेत. मशीन तयार करण्याच्या प्रक्रियेसाठी तहसील कार्यालय, चंद्रपूर येथे एकूण 30 टेबल लावण्यात आले. प्रत्येक टेबलवर 3 कर्मचारी याप्रमाणे एकूण 90 कर्मचा-यांमार्फत ईव्हीएम, व्हीव्हीपॅटसह मशीन सज्ज करण्यात आल्या. चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातील 390 मतदान केंद्रासाठी असलेल्या ईव्हीएमपैकी 5 टक्के म्हणजे 23 मशीन मॉक पोलकरीता रॅन्डम पध्दतीने निवडण्यात आल्या. प्रत्येक मशीनवर 1000 याप्रमाणे दोन दिवसांत 23 मशीनवर 23 हजार मॉक पोल घेण्यात आले.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)