बल्लारपूर :- सामाजिक व राजकीय क्षेत्रात अलीकडच्या काळात महिलांचे प्रमाण कमी होत चालले आहे. उच्च शिक्षित महिला तर राजकारणात पाय ठेवायला तयार नाहीत. राजकारणाच्या दलदलीत फसण्याऐवजी आपण बरे व आपले कुटुंब बरे असे म्हणणारेच भरपूर. मात्र ही परिस्थिती असतानाही चंद्रपुरातील सुप्रसिद्ध वैद्यकीय व्यावसायिक डॉ. अभिलाषा गावतुरे-बेहेरे यांनी सामाजिक कार्यकर्ती ते राजकारणी हा मार्ग स्वीकारत आजच्या पिढीपुढे आदर्श निर्माण केला आहे.त्यांच्या कार्याची नोंद घेण्याची हीच खरी वेळ आहे. बल्लारपुर विधानसभा निवडणुकीत त्या अपक्ष म्हणून लढताना प्रस्थापित नेत्यांना जेरीस आणले आहे. ,एकच आशा अभिलाषा हे घोषवाक्य बल्लारपुर क्षेत्रात निनादत असून गोरगरीब कष्टकरी जनता त्यांचेकडे आशेने बघत आहे. त्यामुळे त्यांची दखल घेतानाच चंद्रपूर जिल्ह्यातील कर्तृत्ववान महिलांच्या कार्याचे अवलोकन करावे लागेल. राजकीय व सामाजिक क्षेत्रात फार कमी महिलांचे योगदान उल्लेखनीय राहिले आहे.70-80 च्या दशकात यशोधरा बजाज यांनी राजकारणात जम बसविला. त्या काळातील राजकारण्यांना पुरून उरणार व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांना ओळखले जात होते. त्यांनी सामाजिक व राजकीय क्षेत्रात आपला ठसा उमटवला. शैक्षणिक संस्था उभारून त्यांनी विकासाच्या दृष्टीने पायाभरणी केली.त्यांच्यानंतर शोभाताई फडणवीस यांनी जिल्ह्यातील राजकारणात आपला दबदबा निर्माण केला. याच काळात बल्लारपुरात एक नेतृत्व उदयास आले. डॉ. रजनी हजारे हे ते नाव. वैद्यकीय पदवी घेतलेल्या रजनीताई खरं तर सामाजिक कार्यकर्त्या. समाजातील गरीब लोकांना न्याय मिळवून देतानाच आपल्या वैद्यकीय सेवेतून त्या गोरगरिबांना अत्यल्प दरात उपचार करीत होत्या. बल्लारपूरच्या नगराध्यक्ष म्हणून त्यांची कारकीर्द गाजली.त्या बरीच वर्षे काँग्रेस मध्ये सक्रिय होत्या व त्याकाळात काँग्रेसची महिला विंग प्रभावशाली होती. अनेक महिला राजनीताईंच्या नेतृत्वाखाली काम करीत होत्या.मात्र अलीकडे काँग्रेसची महिला विंग आहे की नाही हा प्रश्न पडतो. आता खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या रूपाने एक महिला नेतृत्व तयार झालं आहे, मात्र त्यांना राजकारणाची कौटुंबिक पार्श्वभूमी आहे. सामाजिक क्षेत्रातून राजकारणात आलेल्या नाहीत. पण आता त्या जिल्ह्यातील राजकारणात दबंग राजकारणी ठरू लागल्या आहेत. या चार महिला नेत्यांच्या व्यतिरिक्त इतर महिलांचे कार्य सध्यातरी उल्लेखनीय दिसत नाही. याचाच अर्थ सामाजिक व राजकीय क्षेत्रात करिअर करायला कुणी धजावत नाहीत असाही होऊ शकतो. या एकंदर परिस्थितीत डॉ. अभिलाषा गावतुरे यांच्या हिमतीला दाद द्यावी लागेल. स्वतः चा अतिशय सुसज्ज वैद्यकीय व्यवसाय असताना, पती डॉ. राकेश गावतुरे हेही वलयांकित पाथलॉजिस्ट असताना, सारे वैभव पायाशी लोटांगण घालत असताना, डॉ. अभिलाषा यांनी वेगळी वाटेने जाण्याचा निर्णय घेणे कौतुकास्पद आहे. बरं, आज त्या निवडणूक लढवत आहेत म्हणून नोंद घ्यावी असंही नाही.गेली काही वर्षे त्या सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांच्या फुले-शाहू-आंबेडकर यांचा गाढा अभ्यास आहे. ओजस्वी वाणी आणि तेवढ्यात ताकदीचे वक्तृत्व हे त्यांचे खास वैशिष्ट्य. सर्वसामान्य लोकांना भेडसावत असलेल्या समस्यांचा अभ्यास करून त्यावर उपाययोजना काय करावी,त्यासाठी कोणते आंदोलन उभारावे यापासून मैदानात उतरण्यास त्या तत्पर असतात.ग्रामीण भागात त्यांनी आदिवासी, गोरगरीब, विद्यार्थी, शेतकरी, शेतमजूर यांच्या समस्यांना वाचा फोडली. शिक्षणासाठी कुणाला मदत हवी असेल तर त्या धावून जातात. सामाजिक कार्य करता करता त्या राजकारणात प्रवेश कर्त्या झाल्या. काँग्रेस मधून उमेदवारी मिळेल ही त्यांची अपेक्षा होती,मात्र उच्च शिक्षित लोकांना राजकारणात किती स्थान दिले जाते याची जाणीव आता अनेकांना झाली आहे. जिल्ह्यातील दोन डाँक्टर यावेळी काँग्रेसचे उमेदवार म्हणून राहतील असे चित्र होते मात्र डॉ. गावतुरे यांचेसारखीच अवस्था सुप्रसिद्ध नेत्ररोग तज्ज्ञ डॉ.चेतन कुटेमाटे यांचीही झाली. काँग्रेसने या दोन उच्च शिक्षित उमेदवारांची बोळवण केली. व मात्र दोघेही मागे हटलेले नाहीत. डॉ. अभिलाषा बल्लारपुरात अतिशय तगडी लढत देत आहेत. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासारख्या मातब्बर नेत्याविरुद्ध शड्डू ठोकणे साधे नाही. मात्र प्रचंड जिद्द आणि चिकाटी, आत्मविश्वास याचे बळावर डॉ. अभिलाषा संपूर्ण मतदार संघ पिंजून काढत आहेत. गावागावात त्यांना मिळत असलेला प्रतिसाद प्रस्थापित नेत्यांना घाम फोडतो आहे. त्या जिंकणार की हरणार हा मुद्दा गौण ठरतो.'एकच आशा अभिलाषा' हे ब्रीद वाक्य त्यांच्या प्रचाराची टॅग लाईन ठरली आहे. पुरुषसत्ताक राजकारणात एखाद्या उच्च शिक्षित महिलेचं धाडस वाखाणण्याजोगे आहे. महिलांचे, त्यातही उच्च शिक्षित महिलांचे प्रमाण राजकारणात कमी असताना डॉ. गावतुरे यांनी दाखवलेली हिम्मत प्रेरणादायी आहे. अर्थात प्रत्येक यशस्वी पुरुषामागे स्त्रीचा हात असतो.इथे उलटे आहे. डॉ.अभिलाषा यांचे मागे त्यांचे पती डॉ. राकेश गावतुरे यांचे खंबीर पाठबळ आहे.दोघेही सामाजिक कार्यकर्ते असून विविध सामाजिक संघटनांच्या माध्यमातून ते कार्यरत असतात. या निवडणुकीत निकाल काय लागतो, त्या जिंकणार की हरणार, त्याहीपेक्षा एक महिलांचं सक्षम नेतृत्व तयार झालं, हे महत्त्वाचे. त्यांच्या सामाजिक व राजकीय वाटचालीस शुभेच्छा.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
Post a Comment
0Comments