पोक्सो कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पालक व शिक्षकांची भूमिका महत्त्वाची -सीईओ विवेक जॉन्सन (Role of parents and teachers is important for effective implementation of POCSO Act - CEO Vivek Johnson)

Vidyanshnewslive
By -
0
पोक्सो कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पालक व शिक्षकांची भूमिका महत्त्वाची -सीईओ विवेक जॉन्सन (Role of parents and teachers is important for effective implementation of POCSO Act - CEO Vivek Johnson)


चंद्रपूर : मुलांचे होत असलेले लैंगिक शोषण या विषयाकडे गांभीर्याने बघण्याची आवश्यकता आहे. बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण करण्यासाठी पोक्सो कायदा अस्तित्वात आला असून या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी पालक व शिक्षकांची भूमिका महत्त्वाची असल्याचे मत मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांनी व्यक्त केले. बाल संरक्षण कक्षाद्वारे बी.जे.एम.कारमल अकॅडमी, चंद्रपूर येथे लैंगिक शोषणापासून बालकांचे संरक्षण कायदा तसेच बालविवाह प्रतिबंध अधिनियम कायद्यावर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश समृद्धी भीष्म, बाल हक्क संरक्षण आयोगाचे सदस्य अड. संजय सेंगर, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव सुमित जोशी, पोलीस निरीक्षक प्रभा एकूरके, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी दीपक बानाईत, शिक्षणाधिकारी (माध्य.) अश्विनी सोनवणे, बालकल्याण समितीच्या अध्यक्षा क्षमा बासरकर, बाल न्याय मंडळाच्या सदस्या अॅड. मनीषा नखाते, रुदय संस्थेचे काशिनाथ देवगडे तसेच सायबर सेलचे मुजावर अली आदी उपस्थित होते

 
          मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन म्हणाले, शाळा आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना पोक्सो कायद्याची माहिती व्हावी, यासाठी महिला व बालविकास विभागाने शाळा, महाविद्यालय स्तरावर विशेष मेळाव्यांचे आयोजन करुन शाळा व्यवस्थापन समितीमधील सदस्यांना मेळाव्यात सहभागी करून घ्यावे. लोकांपर्यंत या कायद्याची माहिती पोहोचल्यास मुलांच्या लैंगिक शोषणाचे प्रमाण कमी होईल. पूर्वी विद्यार्थी मैदानात असायचे. आता मात्र, मोबाईलवर वेळ वाया घालतात, त्यामुळे त्यांच्यावर विपरीत परिणाम होतात. त्यामुळे पालकांनीही त्यांच्या मुलांप्रती जागृत असणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश समृद्धी भिष्म म्हणाल्या, जिल्ह्यातील प्रत्येक शाळा व महाविद्यालयांमध्ये जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या माध्यमातून विविध कायद्यांबाबत जनजागृती करण्यात आली आहे. बालकासोबत लैंगिक शोषणासारखा अनुचित प्रकार घडल्यास त्याच्या सवयीमध्ये बदल होतो. या सवयीची शिक्षकांनी नोंद घेऊन पालकांना माहिती द्यावी. पालक आणि मुले यांच्यात सुसंवाद आवश्यक असून शिक्षकांचाही विद्यार्थ्यांशी संवाद तितकाच महत्वाचा आहे. प्रत्येक पालकांनी मुलांच्या बाबतीत जागृत असणे गरजेचे आहे. त्यामुळे अशा प्रकारचे गुन्हे टाळता येऊ शकतात. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव सुमित जोशी म्हणाले, बालकांवरील लैंगिक अत्याचाराचे गुन्हे सातत्याने घडत आहेत. बालकांचे लैंगिक छळ आणि शोषण यापासून संरक्षणासाठी तसेच कायदेशीर तरतूद मजबूत करण्यासाठी पोक्सो कायदा तयार करण्यात आला. प्रत्येक शाळा व महाविद्यालयामध्ये 'गुड टच बॅड टच' बाबत जनजागृती करण्यात आली. बालकांच्या लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्याची माहिती असल्यास पोलिसांना द्यावी. पालक, शिक्षक तसेच नागरिकांनी जागृत राहून संवेदनशीलतेने कार्य केल्यास गुन्हे थांबविता येईल. लैंगिक अत्याचाराचे गुन्हे थांबविण्यासाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक असल्याचेही ते म्हणाले बाल हक्क संरक्षण आयोगाचे सदस्य अड. संजय सेंगर यांनी बालविवाहाचे दुष्पपरिणाम व बालविवाह प्रतिबंधक अधिनियम 2006 बाबत माहिती देवून उपस्थितांना मार्गदर्शन केले. तसेच जिल्ह्यात बालविवाह होत असल्यास त्याबाबतची माहिती पोलीस प्रशासन तथा जिल्हा बाल संरक्षण कक्षास द्यावी जेणेकरून बालविवाह थांबविता येतील. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा महिला व बालविकास अधिकारी दीपक बानाईत यांनी केले. संचालन प्रिया पिंपळशेंडे तर आभार बाल संरक्षण कक्ष अधिकारी अजय साखरकर यांनी मानले. या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित मार्गदर्शकांनी विविध कायद्याविषयी माहिती दिली. यावेळी बालकांशी निगडित कार्य करणाऱ्या संस्था, मुख्याध्यापक, शिक्षक तसेच सामाजिक क्षेत्रात कार्य करणारे विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो.9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)