चंद्रपूर -: चंद्रपूर येथील राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक आणि आर्थिक नुकसान रोखण्यासाठी पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार सरसावले असून त्यांनी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री ना. श्री. चंद्रकांत पाटील यांना लक्ष घालण्याची विनंती केली आहे. लोणारे (रायगड) येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तांत्रिक विद्यापीठाच्या काही विशिष्ट्य निर्णयांमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक आणि आर्थिक नुकसान होत आहे. त्यामुळे आपण स्वतः पुढाकार घेऊन समस्यांचे निराकरण करण्याबाबत संबंधितांना निर्देश द्यावेत, अशी मागणी ना. श्री. मुनगंटीवार यांनी ना. श्री. चंद्रकांत पाटील यांना पत्राद्वारे केली आहे. राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी यासंदर्भात निवेदनाद्वारे आपली व्यथा मांडली होती. पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी या समस्या समजून घेत उच्च व तंत्र शिक्षण मंत्र्यांना पत्र लिहिले. राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयातील वार्षिक सत्र २०२३-२४ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर तांत्रिक विद्यापीठाने रेमिडियल आणि कंबाईन पासिंग हटविले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक आणि आर्थिक नुकसान रोखण्यासाठी सर्व समस्यांचे निराकरण आवश्यक आहे. यामध्ये विशेषत्वाने ग्रेस पद्धतीने लावण्यात आलेला निकाल तात्काळ रद्द करून प्रत्येक विषयाचे गुण दर्शविणारा योग्य निर्णय द्यावा, अशी मागणी ना. श्री. मुनगंटीवार यांनी पत्राद्वारे केली आहे. याशिवाय कंबाईन पासिंग आणि रेमिडियल परीक्षा द्वितीय, तृतीय आणि अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी सुरू ठेवावी, असेही त्यांनी म्हटले आहे. जानेवारीमध्ये झालेल्या परीक्षांचे निकाल विलंबाने होत असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे, उत्तर पत्रिका योग्यप्रकारे तपासल्या गेल्या जात नाहीत, याकडेही त्यांनी लक्ष वेधले आहे. विद्यापीठाचे ईआरपी पोर्टल विद्यार्थ्यांसाठी सोयीचा पर्याय आहे. मात्र ईआरपी पोर्टलचे पैसे भरूनही गेल्या तीन महिन्यांपेक्षा जास्त कालावधीपासून पोर्टल बंद आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना जुने निकाल बघणे शक्य होत नाही. एकूणच विद्यापीठाचा मनमानी कारभार सुरू असून विद्यार्थ्यांवर नियम थोपविले जात आहेत. यामध्ये विशेषत्वाने रेमिडियल परीक्षा अचानक बंद करणे, कॉलेजला ग्रेड फॉरमॅटमध्ये रिझल्ट पाठविणे, फोटोकॉपीमध्ये गुण कमी असतील किंवा चुकीचे कॅलक्युलेशन झाले असेल तर अपील करण्याचा मार्ग न देणे अशा मनमानी नियमांचा समावेश आहे. त्यामुळे राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे हीत लक्षात घेऊन संबंधितांना आदेश प्रदान करावे, अशी मागणी पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी उच्च व तंत्र शिक्षण मंत्र्यांना केली आहे. मेलवर येते करप्टेड पीडीएफ कॉपी विद्यापीठ रिव्हॅल्युएशन आणि फोटोकॉपीचे फॉर्म काढतात. पण संपूर्ण निकाल आल्याशिवाय फोटो कॉपी आणि रिव्हॅल्युएशन फॉर्म ओपन करणे चुकीचे आहे. यामध्ये विद्यार्थ्यांचे नुकसान होत असून फॉर्म काढले तरीही विद्यार्थ्यांना रिव्हॅल्युएशनचा निकाल आणि फोटोकॉपी वेळेत मिळत नाही. तसेच विद्यार्थ्यांनी रक्कम भरल्यानंतरही त्यांना पोचपावती मेलवर प्राप्त होत नाही. विद्यार्थ्यांना मेलवर करप्टेड पीडीएफ कॉपी प्राप्त झाल्यानंतर संबंधित ई-मेलवर केलेल्या तक्रारीला उत्तर देखील मिळत नाही, या समस्यांकडे देखील ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी लक्ष वेधले.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या