तब्बल 11 वर्षाच्या प्रतिक्षेनंतर डॉ. नरेंद्र दाभोळकर हत्याकांडाचा निकाल, 2 आरोपीना जन्मठेपेची शिक्षा व प्रत्येकी 5 लाखाचा दंड (After waiting for 11 years Dr. Narendra Dabholkar murder verdict, 2 accused sentenced to life imprisonment and fined Rs 5 lakh each)
पुणे :- राज्यातील बहुचर्चित डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणी पुणे सत्र न्यायालयाने शुक्रवारी निकाल जाहीर केला. 11 वर्षांपूर्वी पुण्यातील ओंकारेश्वर पुलाजवळ 20 ऑगस्ट 2013 रोजी नरेंद्र दाभोलकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येनंतर तब्बल 11 वर्षांनी या खटल्याचा निकाल जाहीर होत असल्याने त्याबद्दल अनेकांना उत्सुकता होती. सकाळी 11 वाजताच्या सुमारास पुणे सत्र न्यायालयतील विशेष सीबीआय कोर्टाचे न्यायाधीश पी.पी. जाधव कोर्ट परिसरात दाखल झाले. यानंतर सीबीआयचे वकील प्रकाश सूर्यवंशी, बचावपक्षाचे वकील प्रकाश साळशिंगेकर, सीबीआयचे तपास अधिकारी कोर्टात दाखल झाले. आरोपी संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे हेदेखील यावेळी कोर्टात हजर होते. तर कोठडीत असलेल्या डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांना न्यायालयात आणण्यात आले. याप्रकरणी पाच जणांवर आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. यापैकी सचिन अंदुरे आणि शरद कळकर यांना सत्र न्यायालयाने दोषी ठरवले. तर दाभोलकर यांच्या हत्येच्या कटाचा आरोप असलेल्या वीरेंद्र तावडे , विक्रम भावे आणि संजीव पुनाळेकर यांची निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे. तर आरोपी क्रमांक दोन आणि तीन म्हणजे शरद कळसकर आणि सचिन अंदुरे यांना खंडपीठाने कलम 302 आणि कलम 34 अंतर्गत दोषी ठरवण्यात आले. या दोघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. या दोघांना प्रत्येकी पाच लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. दंड न भरल्यास आणखी एक वर्षाचा कारावास होईल, असे न्यायालयाकडून निकालपत्रात नमूद करण्यात आले. डॉ. दाभोलकर प्रकरणात न्यायालयाच्या निकालानंतर हमीद दाभोलकर यांचे वकील अभय नेवगी यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यांनी अकरा वर्षानंतर निकाल आल्यानंतर वकिलांनी नाराजी व्यक्त केली. या कटाच्या सूत्रधारापर्यंत पोहोचता आले नाही, हे आपल्या तपास यंत्रणांचं अपयश आहे. समाधान फक्त एवढं आहे की, ज्यांनी दाभोलकरांना गोळ्या घातल्या त्यांना शिक्षा मिळाली. पण कटाच्या मास्टरमाईंडपर्यंत अजूनही पोहोचता आलेले नाही. या प्रकरणाच्या तपासात हलगर्जीपणा होत असल्याबद्दल मी अगोदरच नाराजी व्यक्त केली होती. दाभोलकर हे समाजसेवक होते, त्यांच्यावर दिवसाढवळ्या गोळीबार झाला. आम्ही याचे अनेक पुरावे सादर केले. आता निर्दोष सोडण्यात आलेल्या आरोपींविरोधात आम्ही उच्च किंवा सर्वोच्च न्यायालयात धाव घेणार आहोत, असे नेवगी यांनी सांगितले.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या